आरियन झीशान अहमद : दोन लघुग्रहांचा शोध लावणारा १९ वर्षीय तरुण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
आरियन झीशान अहमद
आरियन झीशान अहमद

 

आरिफुल इस्लाम

आसाममधील कामरुप जिल्ह्यातील रंगिया या एका छोट्याशा शहरात राहणाऱ्या आरियन झीशान अहमद या तरुणाने हे देदिप्यमान यश संपादन केले आहे. अंतराळ संशोधनातील या ऐतिहासिक कामगिरीमुळे केवळ आसामच नाही, तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

परंतु, आरियनचे स्वप्न फक्त नव्या ग्रहांच्या शोधापुरते मर्यादित राहिलेले नाही. सध्या तो सौरचक्र आणि सौर वादळांचा (Helio-Solar Storms) अभ्यास करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि मशिन लर्निंगच्या अत्याधुनिक मॉडेल्सवर वेगाने काम करतोय.

'मेक इन इंडिया'द्वारे अंतराळाचा वेध
आरियन हा संशोधन प्रकल्प त्याचा मित्र अन् सहकारी तन्फा याकीन नूर याच्यासोबत स्वतंत्रपणे राबवतो आहे. भारताच्या स्वतःच्या सौर वेधशाळांमधील डेटा वापरून अवकाशातील हवामानाचा अंदाज वर्तवणारी एक अद्ययावत प्रणाली विकसित करणे, हा या दोघांचा मुख्य उद्देश आहे.

आपल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी बोलताना आरियन सांगतो, "हा प्रोजेक्ट सूर्य आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. भारतीय सौर वेधशाळांच्या मदतीने अंतराळातील हवामानाचा अचूक अंदाज बांधू शकेल, अशी एक प्रगत 'मेक इन इंडिया' सिस्टीम तयार करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे."
 

दोन नव्या ग्रहांचा शोध अन् 'नासा'कडून मोठी मान्यता
इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबोरेशनच्या विशेष उपक्रमांतर्गत आरियनने लघुग्रहांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत १७ डिसेंबर रोजी 'नासा'ने अधिकृतपणे त्याच्याशी संपर्क साधून या शोधाला मान्यता दिली.

सध्या या दोन नव्या लघुग्रहांचे तात्पुरते नामकरण '2024 VE8' आणि '2024 VC23' असे करण्यात आले आहे. नासाचे शास्त्रज्ञ पुढील एक ते दीड वर्ष या दोन्ही लघुग्रहांच्या वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास करतील. संशोधन पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही ग्रहांना स्वतःचे नाव देण्याचा दुर्मिळ अन् ऐतिहासिक सन्मान आरियनला मिळणार आहे.

बालपणातील ध्यास अन् छतावरून अवकाशाची सफर
रंगिया शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये राहणारा आरियन हा जयंतीपूर योगेश्वर विद्यापीठ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मिराजुल इस्लाम आणि रुमा नाझरीन यांचा मुलगा आहे. रंगियातील फातिमा कॉन्व्हेंट स्कूलमधून प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो सध्या युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मेघालय (USTM) येथे संगणक विज्ञान (B.Tech Computer Science) शाखेच्या पहिल्या सत्रात शिकत आहे.

आपल्या या आवडीबद्दल 'आवाझ-द-व्हॉईस'शी संवाद साधताना आरियन सांगतो, "लहानपणापासूनच मला खगोलशास्त्र आणि अंतराळातील ग्रहांच्या हालचालींचे प्रचंड आकर्षण होते. आकाशाकडे पाहताना मला एक वेगळाच आनंद मिळायचा, त्यामुळे मी खगोलशास्त्रावरची अनेक पुस्तके वाचून काढली."
 

आठवीत असतानाच त्याने अंतराळ विज्ञानातील बारकावे समजून घेण्यास सुरुवात केली होती. अकरावीत असताना त्याने स्वतःची पहिली टेलिस्कोप खरेदी केली. आज त्याच्याकडे दोन अतिशय शक्तिशाली टेलिस्कोप असून, रात्रीच्या वेळी तो घराच्या छतावरून तासनतास अवकाशाचे निरीक्षण करतो.

'इस्रो'मध्ये जाण्याचे स्वप्न अन् वडिलांचा अभिमान
आरियनचे पुढील मुख्य ध्येय भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत म्हणजेच इस्रो मध्ये रुजू होऊन देशाची सेवा करण्याचे आहे. त्या दृष्टीने त्याने आतापासूनच अभ्यासाची तयारी सुरू केली आहे.

मुलाच्या या अफाट यशाने गहिवरलेले त्याचे वडील मिराजुल इस्लाम भावुक होऊन सांगतात, "आमच्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील, रंगियासारख्या लहान शहरातील मुलाने एवढे मोठे यश मिळवणे ही खरोखरच प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे! भविष्यात त्याने एक यशस्वी खगोलशास्त्रज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी, यासाठी सर्वांनी त्याला आशीर्वाद द्यावेत."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter