सायकलिंग जगतात इतिहास रचत १९ वर्षीय हर्षिता जाखड झळकली टूर डी फ्रान्स फेममध्ये

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 13 h ago
स्वाित्झर्लंडमधील आग्ले येथे 'टूर डी फ्रान्स फेम' मध्ये सहभागी झालेली भारताची पहिली महिला सायकलपटू हर्षिता जाखड.
स्वाित्झर्लंडमधील आग्ले येथे 'टूर डी फ्रान्स फेम' मध्ये सहभागी झालेली भारताची पहिली महिला सायकलपटू हर्षिता जाखड.

 

आग्ले

युवा सायकलपटू हर्षिता जाखड हिने सायकलिंगच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नाव नोंदवत 'टूर डी फ्रान्स फेम' (Tour de France Femmes) मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान मिळवला आहे. स्विमझर्लंडमधील आग्ले येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

रविवारी पार पडलेल्या या खडतर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याच्या औपचारिक सुरुवातीवेळी १९ वर्षीय हर्षिताने अफगाणिस्तान, अल्जेरिया, चिली, इथिओपिया, नामिबिया आणि युगांडा येथील आठ प्रतिभावान सायकलपटूंच्या तुकडीचे नेतृत्व केले. ही स्पर्धा १ ऑगस्ट रोजी लॉझान येथे सुरू झाली असून ९ ऑगस्ट रोजी निस येथे संपणार आहे. युसीआय (UCI - Union Cycliste Internationale) द्वारे निवडण्यात आलेल्या या संघाने डब्ल्यूपीसीसी रोड टीमच्या काही रायडर्ससह ४.५ किलोमीटर अंतर पार केले.

UCI अध्यक्षांकडून कौतुक

स्पर्धेच्या सुरुवातीच्या मंचावर युसीआयचे अध्यक्ष डेव्हिड लॅपोर्टियंट यांनी सर्व रायडर्सची भेट घेतली आणि भारताच्या हर्षिता जाखडच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, भारताची प्रतिभावान खेळाडू आमच्या प्रतिष्ठित यूसीआय वर्ल्ड सायकलिंग टॅलेंट प्रोग्रामचा भाग असल्याचा आम्हाला आनंद आहे. ती लवकरच मुख्य स्पर्धेतही सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वडिलांमुळे लहानपणापासूनच सायकलिंगच्या प्रेमात पडलेली हर्षिता म्हणाली की, टूर डी फ्रान्समध्ये खेळण्याचे माझे स्वप्न होते. युसीआयने मला ही संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. राजस्थानच्या हर्षिताने कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात अनेक पदके जिंकली असून पतियाळा येथील साई राष्ट्रीय उत्कृष्ट केंद्रात ती तिचे वडील आणि प्रशिक्षक राकेश जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.