महिला टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ६ गडी राखून विजय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
मारिझान कॅपची शानदार खेळी; भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव
मारिझान कॅपची शानदार खेळी; भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव

 

मॅंचेस्टर 

आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या अ गटातील सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मारिझान कॅप हिने केलेल्या शानदार नाबाद ८१ धावांच्या खेळीमुळे भारताचे विजयाचे स्वप्न भंगले.

मारिझान कॅप ठरली सामन्याची हिरो

प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या. भारताची सुरुवात चांगली झाली होती, मात्र मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारताचा वेग मंदावला. दीप्ती शर्माने २९ धावा, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने २४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. हरमनप्रीत कौरने या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील २०० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा विक्रमही नोंदवला.

१५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अडखळत झाली होती. भारताच्या श्री चरणीने पॉवरप्लेमध्ये दोन महत्त्वाचे बळी घेत आफ्रिकेवर दडपण निर्माण केले होते. मात्र, त्यानंतर मारिझान कॅप आणि तझमीन ब्रिट्स (४०) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९७ धावांची भागीदारी करत सामना भारताच्या हातातून काढून घेतला.

क्षेत्ररक्षणातील चुका भारताच्या अंगलट

भारतीय क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात अत्यंत सुमार कामगिरी केली. मारिझान कॅप हिला क्षेत्ररक्षक राधा यादवने दोनदा जीवदान दिले, ज्याचा फायदा घेत तिने ४५ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८१ धावा ठोकल्या. या सोप्या झेल सुटल्याने भारताला सामना गमवावा लागला. दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकांत ४ गडी गमावून आवश्यक धावा पूर्ण करत विजय साजरा केला. या विजयानंतर गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेने तिसरे स्थान पटकावले आहे, तर भारत दुसऱ्या स्थानी कायम आहे.