आयपीएल २०२६ च्या रंगतदार सामन्यात आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाद झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शने खेळलेल्या ३८ चेंडूंतील ९० धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर लखनऊने चेन्नईचे १८८ धावांचे आव्हान अगदी सहज पार केले.
चेन्नई सुपर किंग्ससाठी हा पराभव अत्यंत महागडा ठरणार असून, १२ सामन्यांत १२ गुणांसह आता त्यांना प्ले-ऑफ गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आणि इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहणे भाग आहे.
मार्श आणि इंग्लिसची वादळी सुरुवात
चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कार्तिक शर्माच्या ७१ धावांच्या जोरावर ५ बाद १८७ धावांचा मजबूत धावसंख्या उभारली होती. लखनऊसाठी हे आव्हान सोपे नव्हते, पण मिचेल मार्श आणि जोश इंग्लिस (३६) यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या चेंडूंमध्ये १३५ धावांची भागीदारी करून चेन्नईच्या गोलंदाजीची दाणादाण उडवून दिली.
मार्शने अंशुल कंबोजच्या एकाच षटकात सलग ४ षटकार आणि १ चौकार ठोकत २८ धावा कुटल्या. मार्शने अवघ्या २१ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर स्पेंसर जॉन्सनलाही त्याने लक्ष्य करत धावांचा पाऊस पाडला. इंग्लिस आणि मार्श बाद झाल्यानंतर निकोलस पूरनने (१७ चेंडूंत ३२ धावा) अंशुल कंबोजला पुन्हा सलग ४ षटकार मारत सामना १६.४ षटकांतच संपवला.
कार्तिक शर्माची झुंजार खेळी
तत्पूर्वी, चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. लखनऊचा वेगवान गोलंदाज आकाश सिंगने (३/२६) अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि उरवील यांना स्वस्तात बाद करून चेन्नईला अडचणीत आणले होते. मात्र, २० वर्षीय कार्तिक शर्माने (४२ चेंडूंत ७१ धावा) आणि डेवाल्ड ब्रेव्हिसने (२५) चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करून संघाला सावरले.
कार्तिकने शाहबाज अहमद आणि प्रिन्स यादव यांच्या गोलंदाजीवर मोठे षटकार ठोकले. शेवटी शिवम दुबेने १६ चेंडूंत ३२ धावांची वेगवान खेळी करत चेन्नईला १८७ धावांपर्यंत पोहोचवले, पण मार्शच्या वादळापुढे ही धावसंख्या अपुरी ठरली.