केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफने घवघवीत यश मिळवल्यानंतर, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व्ही. डी. सतीशन यांनी सोमवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांनी ईश्वराच्या नावाने शपथ घेतली असून त्यांच्यासोबत २० सदस्यीय मंत्रिमंडळानेही पदभार स्वीकारला आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन, डाव्या पक्षांचे नेते आणि भाजपचे प्रतिनिधीही या सोहळ्याला हजर होते. तसेच, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आपल्या नेत्याला शपथ घेताना पाहण्यासाठी संपूर्ण केरळमधून हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजधानीत मोठी गर्दी केली होती.
१४० सदस्यांच्या केरळ विधानसभेसाठी ९ एप्रिल रोजी मतदान झाले होते आणि ४ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट'ने (UDF) १०२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. तर 'लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट'ला (LDF) ३५ आणि भाजपला ३ जागांवर समाधान मानावे लागले. या मोठ्या विजयानंतर आज केरळमध्ये अधिकृतरीत्या नव्या सरकारचा कारभार सुरू झाला आहे.