देशात इंधन दरवाढीचे सत्र सुरूच असून, रविवारी सीएनजीच्या (CNG) दरात प्रति किलो १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. गेल्या एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे, ज्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
दिल्लीत ८० रुपयांचा टप्पा पार
देशातील सर्वात मोठी गॅस पुरवठादार कंपनी असलेल्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) दिलेल्या माहितीनुसार, या दरवाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सीएनजीचा दर आता ८०.०९ रुपये प्रति किलो झाला आहे.
यापूर्वी गेल्या गुरुवारीच सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली होती. म्हणजेच अवघ्या चार दिवसांत सीएनजीच्या किमतीत एकूण ३ रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, घरगुती स्वयंपाकघरांमध्ये पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजीच्या (PNG) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
डॉलरची वाढ आणि उत्पादन खर्च कारणीभूत
आयजीएलने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे की, सीएनजीचे नवे दर १७ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून कंपनीच्या सर्व भौगोलिक क्षेत्रांमध्ये लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.
या दरवाढीनंतरही, सध्याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींच्या तुलनेत सीएनजी वाहनांचा वापर चालकांसाठी जवळपास ४५ टक्क्यांपर्यंत किफायतशीर ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे.