RSS च्या दत्तात्रेय होसाबळे यांच्या विधानाला मेहबूबा मुफ्तींचा पाठिंबा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी पाकिस्तानसोबतची कोंडी फोडण्यासाठी जनतेमधील थेट संपर्क महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेचे 'पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी'च्या (PDP) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी स्वागत केले असून संवादाचे दरवाजे नेहमी खुले असले पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे.

संवादातूनच काश्मीर प्रश्नावर तोडगा

श्रीनगर येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुफ्ती म्हणाल्या की, काश्मीर प्रश्नावरील तोडगा संवादात आणि राज्यघटनेच्या चौकटीतच दडलेला आहे. आपल्याला जे काही साध्य करायचे आहे ते दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधूनच करावे लागेल. आमचा संवादावर विश्वास असून आम्हाला सन्मानाने शांतता हवी आहे. होसाबळे यांच्या या विधानाला माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनीही पाठिंबा दिला आहे. आरएसएसचे सरकार्यवाह होसाबळे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाने भारताचा विश्वास गमावला आहे. आता तिथल्या नागरी समाजाने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे, कारण आपले सांस्कृतिक संबंध आहेत.

पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेण्याची अपेक्षा

पीडीपीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांनीही शेवटच्या श्वासापर्यंत याच भूमिकेचा पुरस्कार केला होता, याची आठवण मेहबूबा यांनी करून दिली. त्या म्हणाल्या की, काश्मीरच्या पलीकडे पाकिस्तान, चीन आणि मध्य आशियाकडे जाणारे रस्ते खुले केले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर शांततेसाठी आपले नाव कोरायचे असेल, तर त्यांनी काश्मीर प्रश्न सोडवावा आणि या प्रक्रियेत पाकिस्तानलाही सामावून घ्यावे. पंतप्रधान मोदींनी २०१६ मध्ये लाहोरला भेट देऊन पुढाकार घेतला होता, पण त्यानंतर पठाणकोट हल्ला झाला. त्यामुळे भारताच्या कोणत्याही सकारात्मक प्रयत्नांना पाकिस्तानलाही योग्य प्रतिसाद द्यावा लागेल. दिल्लीला काश्मिरी जनतेचा आवाज ऐकावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.

कैद्यांच्या सुटकेची मागणी

येत्या ईदच्या पार्श्वभूमीवर राजकीय कैद्यांची सुटका करावी, अशी मागणी मुफ्ती यांनी केली. कैद्यांची सुटका हे विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरेल आणि काश्मीरच्या जनतेला सलोख्याचा सकारात्मक संदेश जाईल, असे त्या म्हणाल्या. माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनीही सामान्य माणसाचा राजकारणाशी काही संबंध नसून दोन व्यक्तींमधील मैत्री दोन राष्ट्रांमधील मैत्रीत बदलू शकते, असे सांगत जनतेमधील संपर्काचे महत्त्व अधोरेखित केले आहे.