Bakri Eid 2026: मुंबईकरांसाठी कुर्बानीची परवानगी आता एका क्लिकवर; 'MyBMC' ॲपवरून असा करा ऑनलाईन अर्ज

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भक्ती चाळक

यंदा बकरी ईद (ईद-उल-अजहा) २८ मे रोजी देशभरात साजरी होतेय. या सणाच्या काळात वैध जनावरांची कुर्बानी देण्याची धार्मिक प्रथा आहे. मात्र गेल्या काही वर्षांत आपण पाहतोय की, कुर्बानीच्या मुद्द्यावरून बरेच वादविवाद उकरून काढले जातात. या धार्मिक प्रथेला नाहक राजकीय रंग दिला जातो. यामुळे प्रामाणिकपणे सण साजरा करणाऱ्या सामान्य मुस्लिमांना बऱ्याचदा प्रशासकीय आणि सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागते. हीच बाब ओळखून, मुंबईतील मुस्लिम समुदायाला कायदेशीर पद्धतीने आणि कोणत्याही विनाअडथळा कुर्बानी यावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) यंदा एक मोठा निर्णय घेतलाय.

बृहन्मुंबईच्या या निर्णयामुळे आता कुर्बानीच्या परवानगीसाठी पालिकेत जाण्याची अजिबात गरज लागणार नाहीये. कारण पालिकेने 'MyBMC' मोबाईल ॲप आणि आपल्या अधिकृत वेबसाईटवर घरबसल्या ऑनलाईन परवानगी मिळवण्याची सोय केली आहे. पालिकेने यंदा मुंबईत धार्मिक कुर्बानीसाठी एकूण १०९ जागा निश्चित केल्या आहेत. येत्या २८ ते ३० मे दरम्यान नागरिकांना या ठरवून दिलेल्या जागांवर कुर्बानी देता येईल. परंतु यासाठी पालिकेच्या ॲपवरून ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सणाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यंदा पालिकेने ऑनलाईन अर्जाची व्यवस्था तर केलीच आहे. तसेच देवनार कत्तलखान्यात १७ मे ते ३० मे या कालावधीत म्हशी आणि बकऱ्यांचा मोठा बाजारही भरवला आहे. तर पालिकेच्या नियमांनुसार म्हशींसारख्या मोठ्या प्राण्यांची कुर्बानी केवळ देवनार कत्तलखान्यातच करता येईल. मुंबईत इतर कुठेही याला सक्त मनाई आहे. यासाठी पालिकेच्या वेबसाईटवर प्राण्यांच्या आयातीचा परवाना आणि वेळेचे बुकिंग ऑनलाइन करता येईल.

२४ तास नियंत्रण कक्ष आणि सुरक्षा व्यवस्था

सणाच्या काळात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि तातडीच्या मदतीसाठी पालिकेने २४ तास सुरू असणारा विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. देवनार कत्तलखान्यात प्राण्यांसाठी सुमारे १ लाख १० हजार चौरस मीटर जागेवर शेड उभारण्यात आले आहेत. याशिवाय म्हशींच्या धार्मिक कुर्बानीसाठी १० हजार चौरस मीटरची स्वतंत्र जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

या संपूर्ण कालावधीत पालिकेने अतिरिक्त पाणीपुरवठा, तात्पुरती आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, पशुवैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेचे चोख नियोजन केले आहे. या सण उत्सवाच्या काळात देवनार कत्तलखाना आणि परिसरातातून सुमारे ७ हजार ५०० मेट्रिक टन कचरा निघण्याची शक्यता आहे. हा कचरा साफ करण्यासाठी दररोज २०० हून अधिक स्वच्छता कामगार आणि आधुनिक यंत्रसामग्री तैनात केली जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी देवनार कत्तलखान्यात ५०० पोलीस कर्मचारी, २०० पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत.

बोगस कारभाराला बसणार चाप

आता तुम्ही विचार कराल की मागच्या वर्षी तर अशी काही मोठी सक्ती नव्हती, मग यंदाच का? तर पालिकेच्या जुन्या ऑनलाईन यंत्रणेत काही त्रुटी होत्या. त्याचा फायदा घेऊन काही लोकांनी बोगस किंवा खोटे अर्ज दाखल केले होते. यामुळे पालिकेच्या प्रशासकीय कामात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हाच बोगस कारभार थांबवण्यासाठी पालिकेने आता अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक सिस्टीम आणली आहे. या नव्या प्रणालीमुळे तुमचे अर्ज कमीत कमी वेळेत नोंदवले जातील आणि तुम्हाला तात्काळ मंजुरी मिळेल.

कुर्बानी करणाऱ्यांना अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, पुढील स्टेप्स फॉलो करा - 

स्टेप १ : 'MyBMC' ॲप डाउनलोड करा

तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर जा. तिथे 'MyBMC' टाईप करून पालिकेचे अधिकृत ॲप इन्स्टॉल करा. जर ॲप वापरताना काही अडचण आली, तर तुम्ही पालिकेच्या www.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट देऊनही फॉर्म भरू शकता.

स्टेप २ : पर्याय निवडा

ॲपच्या मुख्य स्क्रीनवर सर्वात शेवटी असलेला Sheep/Goat Religious Slaughter आणि Slot Booking For Religious Slaughter हे पर्याय दिसतील. त्यापैकी तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा. 

स्टेप ३ : नोंदणी करा

स्लॉट बुकिंगचा पर्याय निवडल्यावर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि इमेल टाकून रजिस्ट्रेशन करा. तुमच्या नंबरवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.

स्टेप ४ : माहिती भरा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा

फॉर्ममध्ये तुमचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर अचूक भरा. पालिकेने ठरवलेल्या १०९ जागांपैकी तुमच्या जवळची जागा निवडा. जर तुम्ही तुमच्या खाजगी जागेत किंवा सोसायटीत कुर्बानी देणार असाल, तर सोसायटीचे 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) जोडणे आवश्यक आहे. तुम्ही किती प्राण्यांची कुर्बानी देणार आहात ती संख्या आणि तारीख व वेळेचा स्लॉट निवडा. शेवटी तुमचा ओळखपुरावा (जसे की पॅन कार्ड किंवा ओळखपत्र) स्कॅन करून अपलोड करा.

स्टेप ५ : डिजिटल परवाना मिळवा

सर्व नियम मान्य करून अर्ज सबमिट करा. अर्ज मंजूर झाल्यावर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही ॲपमधूनच क्यूआर कोड असलेला डिजिटल परवाना डाउनलोड करू शकता. कुर्बानीच्या वेळी ही पावती सोबत ठेवणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे.

मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक:

सणादरम्यान नागरिकांच्या सुविधेसाठी आणि तक्रारी निवारणासाठी पालिकेने विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तुम्हाला काहीही अडचण आल्यास तुम्ही खालील क्रमांकांवर कधीही संपर्क साधू शकता -

९०७६०००४८१ / ९०७६०००४८२ / ९०७६०००४८३ / ९०७६०००४८४


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter