नईमा खातून : अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
नाईमा खातून
नाईमा खातून

 

शाह ताज खान

प्राध्यापक नईमा खातून यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) पहिल्या महिला कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला आहे. ही नियुक्ती शैक्षणिक विश्वातील एक ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे. सर सय्यद अहमद खान यांनी पाहिलेल्या स्वप्नांची ही पूर्ती आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे देशातील विविध स्तरांवरील मुस्लीम महिलांचा सहभाग आता अधिक स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे.

प्राध्यापक खातून या क्लिनिकल, आरोग्य, उपयोजित सामाजिक आणि आध्यात्मिक मानसशास्त्रातील नामवंत तज्ज्ञ आहेत. त्यांनी आतापर्यंत ६ महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. प्रदीर्घ शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभवासोबतच त्यांनी १५ शोधनिबंधांचे (पीएचडी) यशस्वी पर्यवेक्षण केले आहे. त्यांनी मध्य आफ्रिकेतील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ रवांडा येथे एक वर्ष अध्यापन सेवा दिली. 

एएमयूमध्ये मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी १५ संशोधन प्रबंधांचे मार्गदर्शन केले. अमेरिकेतील लुईसविले विद्यापीठ, रोमानियातील अल्बा युलिया विद्यापीठ, बँकॉकचे चुलालॉन्गकॉर्न विद्यापीठ, इस्तंबूलचे हॉलिग्ज सेंटर आणि बोस्टन येथील हॉलिग्ज सेंटर फॉर इंटरनॅशनल डायलॉग येथे त्यांची व्याख्याने झाली आहेत.
 

नईमा खातून यांनी 'राजकीय मानसशास्त्र' विषयात आपली पीएचडी पूर्ण केली आहे. यासाठी त्यांनी दिल्लीतील 'सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज' आणि एएमयूमध्ये संशोधन केले. त्यांचा प्रबंध हिंदू आणि मुस्लीम तरुणांमधील राजकीय अलिप्तता आणि सामाजिक-मानसशास्त्रीय संबंधांच्या तुलनात्मक अभ्यासावर आधारित आहे. यावरून त्यांची गुंतागुंतीच्या सामाजिक प्रश्नांची सखोल समज दिसून येते.

प्राध्यापक नईमा खातून यांच्यापूर्वी १९२० मध्ये बेगम सुलतान जहान यांची एएमयूच्या पहिल्या महिला चॅन्सेलर (कुलपती) म्हणून नियुक्ती झाली होती. एक शतकापूर्वी त्यांनी महिलांसाठी मार्ग मोकळा केला होता. तरीही कुलगुरू पदापर्यंत पोहोचण्यासाठी महिलांना १०० वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. २२ एप्रिल २०२४ हा दिवस एएमयूच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला, कारण याच दिवशी नाईमा खातून यांना कुलगुरू होण्याचा मान मिळाला. 

२४ मे १८७५ रोजी सर सय्यद अहमद खान यांनी 'मुहम्मदन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज'ची स्थापना केली होती. मुस्लीम विद्यार्थ्यांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात विज्ञानाचे पुस्तक असावे, हे सर सय्यद यांचे स्वप्न होते. त्यांच्या मृत्यूनंतर २२ वर्षांनी म्हणजेच १९२० मध्ये भारत सरकारने या शैक्षणिक मोहिमेला विद्यापीठाचा दर्जा दिला.
 

व्यावसायिक जीवनाची सुरुवात
प्राध्यापक नईमा खातून यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात एएमयूमध्ये मानसशास्त्र विभागातील व्याख्याता म्हणून केली. त्यांचा जन्म १९६१ मध्ये ओडिशात झाला. त्यांचे उच्च शिक्षण आणि प्रदीर्घ कारकीर्द एएमयूशीच जोडलेली आहे. ऑगस्ट १९८८ मध्ये त्या व्याख्याता झाल्या, त्यानंतर एप्रिल १९९८ मध्ये सहयोगी प्राध्यापक आणि जुलै २००६ मध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली. 

कुलगुरू होण्यापूर्वी त्या जुलै २०१४ पासून एएमयूच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. याशिवाय त्यांनी कौशल्य विकास आणि करिअर प्लॅनिंग केंद्राच्या संचालक आणि डेप्युटी प्रॉक्टर यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

साहित्याचा वारसा

प्राध्यापक नईमा खातून यांनी प्रामुख्याने मानसशास्त्र, सामाजिक वर्तन आणि वैद्यकीय विषयांवर लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेली ६ महत्त्वाची पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:

१. जनरल सायकॉलॉजी (२०११-२०१२): मानवी वर्तनाचा वैज्ञानिक अभ्यास आणि मूलभूत मानसशास्त्रीय सिद्धांतांचे दैनंदिन जीवनावरील परिणाम यात मांडले आहेत.
२. चाइल्ड सायकॉलॉजी (२०१२): जन्मापासून पौगंडावस्थेपर्यंतचा मुलांचा विकास, शिकण्याची प्रक्रिया आणि वर्तणुकीतील आव्हाने यावर हे पुस्तक प्रकाश टाकते.
३. मॅनेजिंग स्ट्रेस - अ प्रॅक्टिकल गाईड (२००३): मानसिक तणावाचा सामना करण्याच्या व्यावहारिक पद्धतींची यात सविस्तर चर्चा केली आहे.
४. अंडरस्टँडिंग स्पिरिच्युअलिटी (२०१२): मानसशास्त्र आणि आध्यात्मिकता यांचा संबंध तसेच मानवी व्यक्तिमत्त्वावर होणारा त्याचा परिणाम यात तपासला आहे.
५. हेल्थ सायकॉलॉजी (२०११-२०१२): आरोग्य आणि आजारपणाचे मानसशास्त्रीय पैलू तसेच शारीरिक आरोग्यावर तणावाचा होणारा परिणाम याचा आढावा यात घेतला आहे.
६. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ पॉलिटिकल एलियनेशन ऑफ हिंदू अँड मुस्लीम यूथ (१९९८): त्यांच्या पीएचडी संशोधनावर आधारित या पुस्तकात हिंदू आणि मुस्लीम तरुणांच्या राजकीय मानसिकतेचे तुलनात्मक विश्लेषण केले आहे.

पुस्तकांशिवाय त्यांचे ५० हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. एएमयूच्या मानसशास्त्र विभागातील आध्यात्मिक मानसशास्त्राच्या विशेष सहाय्य कार्यक्रमाच्या त्या उप-समन्वयक म्हणूनही कार्यरत होत्या.
 

प्रतिष्ठित सन्मानांच्या मानकरी
प्राध्यापक नईमा खातून यांची 'इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी'च्या (इन्सा) फेलो म्हणून निवड झाली आहे. हा भारतीय वैज्ञानिक समुदायातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो. १९३५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था आपल्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या विद्वानांची निवड करते. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांना महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक नेतृत्वासाठी राज्यपाल 'वंदे मातरम' उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मैलाचा दगड 
त्यांची नियुक्ती हा एएमयूच्या इतिहासातील एक क्रांतिकारी बदल आहे. शतकानुशतके चालत आलेली परंपरा मोडीत काढून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विभागांचे पुनरुज्जीवन झाले आणि अध्यापनाचा दर्जा सुधारला. शिक्षण मंत्रालयाकडून नवीन अध्यापन पदे मंजूर करून घेणे, हे त्यांच्या कारकीर्दीतील मोठे यश आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) नुसार त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षणावर भर दिला आहे. 'स्वयम' पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरबसल्या जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी वेब डिझाइनिंग, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, टेक्स्टाईल डिझाइन, अंतर्गत सजावट, इंग्रजी संभाषण आणि शॉर्टहँड यांसारखे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

भविष्याचा वेध
प्राध्यापक नईमा खातून या एक दूरदृष्टी असलेल्या शिक्षणतज्ज्ञ आणि प्रशासक म्हणून समोर आल्या आहेत. आधुनिक कौशल्य विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी एएमयूला २१ व्या शतकाच्या गरजांशी जोडले आहे. त्या केवळ प्रशासकीय भूमिकेत अडकून न राहता विद्यापीठाचे आधुनिकीकरण आणि विद्यार्थी कल्याणासाठी कार्यरत आहेत. 

एएमयूचा समृद्ध वारसा जतन करत असतानाच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यापीठाला स्पर्धात्मक बनवणे, हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. आजच्या शैक्षणिक आव्हानांच्या काळात त्यांनी अलिगड मुस्लीम विद्यापीठाला एक गतिमान आणि भविष्यवेधी संस्था म्हणून उभे केले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter