पुणे शहराच्या हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी संध्याकाळी बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या वस्तूमध्ये कमी तीव्रतेची स्फोटके असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, पोलिसांनी तत्परतेने ती वस्तू निकामी केली आहे.
हडपसर येथील उषकिरण रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात एका डॉक्टरला ही संशयास्पद वस्तू आढळली. या वस्तूला घड्याळ, टायमर आणि काही तारा जोडलेल्या होत्या. ही बाब लक्षात येताच रुग्णालयाने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले.
सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट
पोलिसांनी तातडीने रुग्णालय परिसरातील सुरक्षा वाढवली आणि ती वस्तू जवळच असलेल्या ग्लायडिंग सेंटरच्या मैदानात नेली. तिथे बीडीडीएस पथकाने अत्यंत कौशल्याने या स्फोटकाची विल्हेवाट लावून ते निकामी केले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या माहितीला दुजोरा दिला असून पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
तपासासाठी विविध पथके तैनात
या घटनेनंतर पुणे पोलीस, गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) समांतर तपास सुरू केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून ही वस्तू तिथे कोणी आणि कधी ठेवली, याचा शोध घेतला जात आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, या घटनेचा तपास सर्व बाजूंनी केला जात असून यात दहशतवादी कट होता का, याचीही पडताळणी केली जात आहे.
रुग्णालयातील डॉक्टर विलास गायकवाड यांनी सांगितले की, संध्याकाळी ७:३० च्या सुमारास एका बॉक्समध्ये ही वस्तू दिसली होती. सुदैवाने वेळीच माहिती मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.