व्हिक्टोरिया
हिंदी महासागर केवळ व्यापाराचा मार्ग नसून तो 'संधींचा महासागर' (Ocean of Opportunity) बनावा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्स दौऱ्यात केले. भारत आणि सेशेल्स हे सागरी शेजारी असून, या दोन्ही देशांची सुरक्षा आणि समृद्धी एकमेकांवर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांनी १९ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी या वेळी आपल्या 'महासागर' (MAHASAGAR - Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) या व्हिजनचा पुनरुच्चार केला. हिंदी महासागर हे आपले सामायिक घर असून त्याची सुरक्षा आणि शाश्वत विकास ही आपली सामायिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. भारत आणि सेशेल्सची सुरक्षा अविभाज्य असून या भागात शांतता राखण्यासाठी दोन्ही देश मिळून काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल पेमेंट्स, अवकाश संशोधन, आरोग्य, शेती आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये यूपीआय (UPI) आधारित डिजिटल पेमेंट्सला चालना देणे, अंतराळातील शांततापूर्ण सहकार्य, प्रत्यार्पण करार (Extradition Treaty) आणि नवीन नॅशनल हॉस्पिटल उभारण्याबाबतचे करार महत्त्वाचे आहेत. भारताने सेशेल्सला एक गस्ती नौका, १० युटिलिटी वाहने आणि ५ बोट्स भेट दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींच्या हरित नेतृत्वाचा आणि 'ब्लू इकॉनॉमी'ला दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांना अध्यक्ष हर्मिनी यांनी 'गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन' या विशेष सन्मानाने गौरविले. भारत आणि सेशेल्समधील संबंध केवळ सरकारी पातळीवर नसून तेथील तरुणांमध्ये योग आणि भारतीय चित्रपटांची असलेली लोकप्रियता हे सांस्कृतिक बंध दृढ करत असल्याचेही मोदींनी नमूद केले. गेल्या ५० वर्षांतील हा विश्वास आता भविष्यात नवोन्मेष आणि शाश्वत प्रगतीकडे नेण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.