अमेरिका आणि चीन यांच्यात महत्वपूर्ण चर्चा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

 

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बीजिंगमध्ये भव्य स्वागत केले. यावेळी बोलताना जिनपिंग यांनी २०२६ हे वर्ष चीन-अमेरिका संबंधांसाठी ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या या प्रमुखांमध्ये दोन दिवस चालणाऱ्या चर्चेच्या फेऱ्यांना बीजिंगमधील ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे सुरुवात झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प काल रात्री बीजिंगमध्ये दाखल झाले. एअर फोर्स वन विमानातून त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा एरिक, सून लारा आणि टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क हे देखील चीनमध्ये आले आहेत. चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांनी स्वतः विमानतळावर जाऊन ट्रम्प यांचे स्वागत केले, जे राजनैतिक प्रोटोकॉलच्या दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि सन्माननीय मानले जाते.

व्यापार आणि तंत्रज्ञानावर भर
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेतील आघाडीचे उद्योगपतीही चीनमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये ॲपलचे टिम कूक, एनव्हीडियाचे (Nvidia) जेन्सेन हुआंग, टेस्लाचे इलॉन मस्क आणि ब्लॅकरॉकचे लॅरी फिंक यांचा समावेश आहे. 

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले की, "मी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना चीनला खुले करण्याची विनंती करणार आहे, जेणेकरून हे प्रतिभावान लोक आपली जादू दाखवून चीनला अधिक उंचीवर नेण्यास मदत करू शकतील." विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्याबाबत दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे.

जागतिक युद्धाच्या सावटाखाली चर्चा
हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा पश्चिम आशियात, विशेषतः इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा संकट गडद झाले आहे. जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेत इराणमधील युद्ध, तैवानचा प्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि व्यापारातील टेरिफ (Tariffs) हे कळीचे मुद्दे असतील. 

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील कोंडी फोडण्यासाठी या समिटमधून काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

या भेटीदरम्यान उभय देशांमधील व्यापारविषयक मतभेद सोडवण्यासाठी एक 'बोर्ड ऑफ ट्रेड' स्थापन करण्याचीही योजना आहे. ट्रम्प यांनी चीनकडून अधिक अमेरिकन अन्नपदार्थ आणि विमाने खरेदी करण्याचे करार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.