नवी दिल्ली
भूकंपामुळे भीषण संकटात सापडलेल्या व्हेनेझुएलाला भारताने मदतीचा हात दिला आहे. 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) अंतर्गत भारताने पाठवलेली ६६ टन मदतसामग्री व्हेनेझुएलामध्ये पोहोचली आहे. यात फील्ड हॉस्पिटल, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली असून, ही मदत तिथल्या बचावकार्याला गती देईल, असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय वायुसेनेच्या दोन सी-१७ ग्लोबमास्टर (C-17 Globemaster) विमानांनी दिल्ली ते काराकास असा १४,००० किलोमीटरचा प्रवास करून ही मदत पोहोचवली. अवघ्या २३ तासांच्या धावपळीनंतर ही विमाने माईक्वेटिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झाली. या मदतीमध्ये ४१ सदस्यीय बचाव पथक, ३५ टनांहून अधिक मदतसामग्री आणि दोन 'भीष्म' क्यूब्सचा (BHISHM Cubes) समावेश आहे. हे क्यूब्स आपत्कालीन वैद्यकीय उपचारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
व्हेनेझुएलामध्ये बुधवारी ७.२ आणि ७.५ तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप झाले होते. गेल्या शतकातील हे सर्वात मोठे भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत यात १,४३० जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेपत्ता आहेत. या कठीण काळात भारत व्हेनेझुएलाच्या सरकार आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जागतिक स्तरावर एक जबाबदार आणि विश्वासार्ह मानवतावादी भागीदार म्हणून भारताने पुन्हा एकदा आपली भूमिका सिद्ध केली आहे.