PAKISTAN TERRORISM: पाकिस्तानची अफगाणिस्तान सीमेवर मोठी कारवाई; २९ दहशतवाद्यांचा खात्मा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 13 h ago
पाकिस्तानची अफगाणिस्तान सीमेवर मोठी कारवाई; २९ दहशतवाद्यांना कंठस्नान
पाकिस्तानची अफगाणिस्तान सीमेवर मोठी कारवाई; २९ दहशतवाद्यांना कंठस्नान

 

इस्लामाबाद 

कराचीतील पॅरामिलिटरी रेंजर्सच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवर मोठी लष्करी कारवाई केली आहे. या कारवाईत किमान २९ दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी केला आहे.

कारवाईचे मुख्य कारण

माहिती मंत्री अत्ता तरार यांनी सोमवारी ही माहिती दिली. शनिवारी कराचीमध्ये रेंजर्सच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी जमात-उल-अहरार या प्रतिबंधित संघटनेने स्वीकारली होती. या हल्ल्यात पाकिस्तानचे तीन सैनिक शहीद झाले होते, तर सुरक्षारक्षकांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. तपासादरम्यान, पकडलेल्या एका दहशतवाद्याने आपण अफगाणिस्तानचे नागरिक असल्याचे कबूल केले असून, हा हल्ला अफगाणिस्तानातूनच नियोजित करण्यात आला होता, असे समोर आले आहे.

ऑपरेशन गझब लिल-हक

पाकिस्तानने २८ जून रोजी खैबर पख्तूनख्वामधील बाजौर जिल्ह्यात गुप्तचर माहितीच्या आधारे ही मोठी मोहीम राबवली. 'ऑपरेशन गझब लिल-हक'चा भाग म्हणून अफगाणिस्तानच्या सीमेवरील पाक्तिया, पाक्तिका आणि कुनार या भागात अचूक लक्ष्य करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे शस्त्रसाठेही नष्ट झाले आहेत.

पाकिस्तान गेल्या काही काळापासून अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीवर त्यांच्या सीमेवरून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप करत आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील वाढत्या दहशतवादी घटनांमुळे पाकिस्तानने आता सीमेपलीकडील तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.