समीर दि. शेख
एखाद्या प्रतिष्ठित आणि सुरक्षित सरकारी नोकरीवर पाणी सोडून स्वतःला समाजसेवेत झोकून देणे, हे नक्कीच सोपे काम नाही. पण समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी एका खंबीर महिलेने हे धाडस करून दाखवले. ते नाव म्हणजे डॉ. अबेदा इनामदार.
शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे सर्वात मोठे शस्त्र आहे, हे ओळखून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वेचले. शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात आज त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात मोलाचा वाटा असणारे पुण्यातील प्रसिद्ध ‘आझम कॅम्पस’घडवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
अबेदा इनामदार यांचा जन्म ४ जून १९४९ रोजी झाला. त्यांच्या घरातील दहा भावंडांपैकी त्या चौथे अपत्य. अगदी लहानपणापासूनच त्यांच्यावर अत्यंत सुसंस्कृत आणि तत्त्वनिष्ठ विचारांचे संस्कार झाले. शिक्षणाची मोठी आवड असल्यामुळे त्यांनी चिकाटीने आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.

पुणे विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी (M.Com.) मिळवली. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत मोठे यश मिळवले. या यशानंतर त्यांची 'केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमाशुल्क' (Customs and Central Excise) विभागात कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली.
पुढे त्यांनी पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली. एक सुरक्षित आणि प्रतिष्ठेची सरकारी नोकरी त्यांच्या हातात होती. १९७२ मध्ये त्यांचा विवाह पीरपाशा हुसैनी इनामदार यांच्याशी झाला.
लग्नानंतर काही वर्षांतच त्यांनी एका मोठ्या ध्येयासाठी आपल्या करिअरला वेगळी दिशा देण्याचा निर्णय घेतला. समाजासाठी काहीतरी भरीव काम करण्याच्या इच्छेने त्यांनी १९८१ मध्ये आपल्या केंद्र सरकारच्या नोकरीचा राजीनामा दिला. येथूनच त्यांच्या खऱ्या समाजकार्याला सुरुवात झाली.
"सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे. यावर माझा ठाम विश्वास आहे," असे त्यांचे स्पष्ट मत होते.

स्त्री शिक्षणाचा पाया आणि आझम कॅम्पसचा विस्तार
विशेषतः मुस्लिम आणि बहुजन समाजातील मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून खूप दूर आहेत,हे त्यांनी सुरुवातीलाच हेरले होते.
त्या म्हणतात, "महिला या आपल्या लोकसंख्येचा पन्नास टक्के भाग आहेत. मानवी विकासात त्या अत्यंत महत्त्वाचा घटक असून मानवी सभ्यतेच्या विकासाचा त्या मुख्य केंद्रबिंदू आहेत. कोणत्याही सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय समस्येचे मूळ कारण निरक्षरता असते. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. यामुळे जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यापक होतो."
त्या पुढे म्हणतात,"ज्ञान हीच शक्ती आहे. शिक्षण माणसाला बंधनातून मुक्त करते आणि योग्य दिशेने विचार करण्याची ताकद देते. म्हणूनच मुलींच्या शिक्षणात केलेली गुंतवणूक समाजाला सर्वात मोठा परतावा देते."
याच विचारातून त्यांनी पुण्यातील 'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'च्या (MCES - आझम कॅम्पस) माध्यमातून शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली. डॉ. पी. ए. इनामदार आणि अबेदा इनामदार या दांपत्याने या संस्थेचा पूर्णपणे कायापालट केला. सुरुवातीला केवळ चार शाळा असलेल्या या संस्थेने अल्पावधीतच मोठी गगनभरारी घेतली.

आज या शांत आणि हिरव्यागार २४ एकरांच्या परिसरात ३२ पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था दिमाखात उभ्या आहेत. कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, फार्मसी, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील ३० हजारांहून विद्यार्थी येथे उच्च शिक्षण घेत आहेत. त्यात मुस्लीम समाजातील मुला-मुलींचे प्रमाण उल्लेखनीय आहे. या संस्थेच्या ‘स्कॉलर बॅच’सारख्या यशस्वी उपक्रमांची दखल घेऊन इतर अनेक संस्थांनी असे उपक्रम राबवायला सुरुवात केली.
मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेऊन 'अबेदा इनामदार ज्युनियर आणि सीनियर कॉलेज फॉर गर्ल्स'ची स्थापना केली. त्यासाठी भरीव देणगीही दिली. आज या महाविद्यालयांमध्ये दहा हजारांहून अधिक मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभ्या राहत आहेत.
अल्पसंख्याक समाजाच्या, विशेषतः मुस्लिमांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी घेतलेल्या या अपार मेहनतीचे फळ आज स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांमुळे या समाजातील तब्बल दोन ते तीन पिढ्यांचे मोठे सामाजिक आणि आर्थिक उत्थान झाले आहे. आज या समाजातील हजारो तरुण-तरुणी उच्च शिक्षण घेऊन अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि सन्मानाच्या पदांवर काम करत आहेत.

अनेक संस्थांचे सक्षम नेतृत्व आणि विद्यापीठाची स्थापना
अबेदा इनामदार या केवळ आझम कॅम्पसपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्या इतरही अनेक महत्त्वाच्या संस्थांचे कामकाज अत्यंत समर्थपणे पाहतात. नुकत्याच स्थापन झालेल्या 'डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठा'च्या त्या संस्थापक सदस्या आहेत.
तसेच 'हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट', 'पी. ए. इनामदार एज्युकेशन ट्रस्ट' आणि 'पूना विमेन्स कौन्सिल' यांसारख्या अनेक मोठ्या संस्थांच्या माध्यमातून त्या तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी अहोरात्र काम करत आहेत.
सामाजिक सलोखा आणि मराठी भाषेच्या सन्मानासाठी अग्रेसर
अबेदा इनामदार यांच्या नेतृत्वाखालील आझम कॅम्पस केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना कायम सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण दिली.
मुस्लिम विद्यार्थ्यांना राज्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी त्यांनी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला. आझम कॅम्पसमध्ये हजारो मुस्लिम विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे धडे देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
याच कॅम्पसमध्ये दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध स्वरूपात साजरी केली जाते. हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत या शिवजयंतीत सहभागी होतात. या उपक्रमातून त्यांनी संपूर्ण राज्याला सामाजिक सलोख्याचा आणि एकतेचा एक अत्यंत महत्त्वाचा व सकारात्मक संदेश दिला आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनातील महत्त्वाची परंपरा असलेल्या ‘पंढरपूर वारी’साठी निघणाऱ्या अंत तुकाराम आणि संत ज्ञानदेव यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी असतात तेव्हा आझम कॅम्पसचे सर्व विभाग विशेषतः वैद्यकीय महाविद्यालयचे विद्यार्थी,डॉक्टर्स वारीसाठी आलेल्या भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा देतात.
मुलींच्या सर्वांगीण विकासावर भर
शिक्षणामुळे मुलगी केवळ साक्षर होत नाही, तर ती खऱ्या अर्थाने बंधनातून मुक्त होते. याविषयी बोलताना त्या म्हणतात, "मुलींच्या शिक्षणाचा वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे, कुटुंबाचे आरोग्य, समान आर्थिक वाढ आणि समाजातील दर्जा उंचावणे याच्याशी थेट संबंध आहे."
त्या म्हणतात,"शिक्षणामुळे मुलींना स्वतःच्या क्षमतेची जाणीव होते. त्यांना आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील निर्णय प्रक्रियेत समान सहभाग घेता येतो. यातूनच महिलांना रोजगाराच्या समान संधी आणि सामाजिक सुरक्षा मिळते."
याचा दूरगामी परिणाम सांगताना त्या म्हणतात, "सुशिक्षित महिलांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे चांगले व्यवस्थापन होते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. तसेच अंधश्रद्धांना आळा बसून समाजात मोठा बदल घडतो आणि स्त्री-पुरुष भेदभाव मोठ्या प्रमाणावर कमी होतो."
आझम कॅम्पसमध्ये अद्ययावत ग्रंथालये, आधुनिक वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि वाय-फायची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुला-मुलींसाठी सुरक्षित आणि सुसज्ज वसतिगृहे उभारली. क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना वाव देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'व्ही. एम. गणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' तयार केले.

त्यामुळे आज आझम कॅम्पस शिक्षणाबरोबरच इथल्या विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या क्रीडा क्षेत्रातील यशाबद्दल ओळखले जाते. क्रिकेट,फुटबॉल, हॉकी अशा अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळवले आहे.
'डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट'या एका शंभर वर्षे जुन्या वाचनालयाचे रूपांतर डॉ. इनामदार भव्य 'इन्फॉर्मेशन सेंटर'मध्ये केले. तिथे विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन देणारे केंद्र अत्यंत उत्तम प्रकारे चालवले जाते. याशिवाय आता माफक दरात स्पर्धा परीक्षांचे मागर्दर्शन देणारे केंद्रही कॅम्पसमध्ये सुरु करण्यात आले आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान
अबेदा इनामदार यांच्या या अफाट कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्यांनी नवी दिल्लीतील 'राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगा'च्या 'मुलींच्या शिक्षणावरील समिती'वर सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
जिनिव्हा येथील 'ग्रॅज्युएट विमेनइंटरनॅशनल'च्या त्या सक्रिय सदस्य होत्या. त्यांनी फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
महिला शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांच्या या महान आणि निस्वार्थी सेवेबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांना 'सावित्रीबाई फुले' पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच त्यांना 'मानवाधिकार पुरस्कार' आणि अमेरिकेच्या 'फाउंडेशन फॉर एक्सलन्स'कडून (FFE) 'बेस्ट फॅसिलिटेटर अवॉर्ड' मिळाला आहे.
प्रशासकीय सेवेतील एक मोठी नोकरी सोडून समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या डॉ. अबेदा इनामदार यांचा हा प्रवास खऱ्या अर्थाने थक्क करणारा आहे. एका खंबीर महिलेने मनात आणले, तर ती आपल्या दातृत्वातून आणि कष्टाच्या जोरावर हजारो घरांमध्ये शिक्षणाचा प्रकाश कसा पोहोचवू शकते, याचे त्या एक जिवंत आणि चालतेबोलते उदाहरण आहेत.
(लेखक ‘आवाज द व्हॉइस- मराठी’चे संपादक आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter