आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांचे ,मंत्रिमंडळ
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांचे ,मंत्रिमंडळ

 

आसाममध्ये भाजपप्रणित एनडीए सरकारने सलग तिसऱ्यांदा सत्तेची सूत्रे हाती घेतली असून, मंगळवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबत चार मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यामध्ये राज्याच्या इतिहासातील प्रदीर्घ काळ आमदार राहिलेल्या महिला नेत्या, चहा मळ्यातील समुदायाचे ज्येष्ठ नेते आणि मित्रपक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी भाजप नेत्या अजंता नेओग आणि रामेश्वर तेली यांच्यासह 'आसाम गण परिषद'चे (AGP) अतुल बोरा आणि 'बोडोलँड पीपल्स फ्रंट'चे (BPF) चरण बोरो यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मंत्रिमंडळातील महत्त्वाचे चेहरे

अजंता नेओग या गोलाघाट मतदारसंघातून सलग सहावेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. २००१ पासून त्या सातत्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०२१ मध्ये त्या आसामच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या होत्या. यापूर्वी त्या तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्येही मंत्री होत्या. २०२० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दुसरे महत्त्वाचे मंत्री म्हणजे रामेश्वर तेली. ते चहा मळ्यातील समुदायाचे मोठे नेते आहेत. यापूर्वी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी डुलियाजन मतदारसंघातून विधानसभेत पुनरागमन केले आहे.

मित्रपक्षांनाही स्थान

आसाम गण परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. ते २०१४ पासून या प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व करत आहेत. पाच वेळा आमदार राहिलेल्या बोरा यांनी मागील सरकारमध्ये कृषी आणि आसाम करार अंमलबजावणी यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती.

खालच्या आसाममधील एकमेव मंत्री म्हणून चरण बोरो यांचा समावेश झाला आहे. ते बोडोलँड पीपल्स फ्रंटचे नेते असून माझबाट मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. गेल्या वर्षी बीपीएफने भाजपसोबत युती केल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. या सर्व मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.