नवी दिल्ली
इथॅनॉल मिश्रित इंधन (E20) वापरल्यामुळे वाहनांचा विमा अवैध ठरू शकतो, अशा चर्चांना केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. भारताचा इथॅनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख असून, E20 इंधनाचा वापर केल्याने वाहन विमा पॉलिसीवर कोणताही परिणाम होत नाही, असे स्पष्टीकरण तेल मंत्रालयाने दिले आहे.
E20 इंधनामुळे विमा पॉलिसी अवैध ठरत असल्याच्या दाव्यांची तेल मंत्रालयाने दखल घेतली आहे. संबंधित भागधारकांशी चर्चा केल्यानंतर हे दावे चुकीचे असल्याचे समोर आले आहे. इथॅनॉल मिश्रित इंधन वापरणे ही एक जागतिक स्तरावर स्वीकारलेली पद्धत असून अमेरिका, ब्राझील आणि जपान यांसारख्या अनेक देशांमध्ये ती यशस्वीपणे राबवली जात आहे. विशेषतः ब्राझीलमध्ये E27 इंधनाचे मिश्रण दीर्घकाळापासून मानक म्हणून वापरले जात आहे.
केंद्र सरकारने या कार्यक्रमाच्या फायद्यांकडे लक्ष वेधले आहे. कच्च्या तेलाची आयात कमी करून भारताने आतापर्यंत १.४ लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन वाचवले आहे. तसेच, इथॅनॉल निर्मितीमुळे शेतीमालाला मोठी मागणी निर्माण झाली असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. ऊर्जा सुरक्षा वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि देशातील स्वच्छ इंधन प्रवासाला गती देणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे हा कार्यक्रम पारदर्शकपणे राबवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.