'इन्किलाब झिंदाबाद' ही घोषणा म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा जान होती. पण या न्याऱ्याचे निर्माते कोण? भगतसिंगांनी तो अजरामर केला हे १०० टक्के खरं, पण त्याचे मूळ जनक होते- मौलाना हसरत मोहानी.
सैयद फजल-उल-हसन म्हणजेच 'हसरत मोहानी'. एकीकडे पाच वेळचे नमाजी असलेले कट्टर मुस्लिम, तर दुसरीकडे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक! एकीकडे उर्दू साहित्यातील महान गझलकार, तर दुसरीकडे मथुरेला जाऊन न चुकता जन्माष्टमी साजरी करणारे.. आजच्या काळात एकाच माणसात हे सगळं असणं जवळपास अशक्य वाटतं. आज १३ मे हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने याच युनिक व्यक्तिमत्त्वाचे काही खास आणि अज्ञात पैलू आज आपण उलगडणार आहोत.
१. 'पूर्ण स्वराज्य' आणि 'इन्किलाब झिंदाबाद'चा नारा
१९२१ सालचे राष्ट्रीय काँग्रेसचे अहमदाबाद अधिवेशन. तेव्हा त्या काँग्रेसच्या व्यासपीठावर उभं राहून सर्वात आधी 'पूर्ण स्वराज्या'ची धाडसी मागणी करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे हसरत मोहानी! स्वामी कुमारानंद यांच्या साथीने त्यांनी हा ठराव मांडला होता.
त्याच वर्षी त्यांनी 'इन्किलाब झिंदाबाद' (क्रांती चिरायू होवो) हा नारा दिला. पुढे याच नाऱ्याने हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनला (HSRA) आणि पर्यायाने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली.
२. सुफी, कम्युनिस्ट मुसलमान
हसरत मोहानी स्वतःला अभिमानाने 'सुफी मोमीन' आणि 'इश्तराकी मुस्लिम' (कम्युनिस्ट मुस्लिम) म्हणवून घेत असत. १९२५ साली कानपूर इथं 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया'ची (CPI) स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भगवान श्रीकृष्णाविषयी त्यांना आस्था आणि कुतूहल होते. त्यांना श्रीकृष्ण हे प्रेमाचं आणि क्रांतीचं प्रतीक वाटायचं. मथुरेला जाऊन ते कृष्ण जन्माष्टमीत उत्साहाने सामील होत असत. शिवाय त्यांनी श्रीकृष्णावर अनेक सुंदर उर्दू कविता आणि गझलाही लिहिल्या आहेत. धर्माच्या आणि राजकीय विचारधारेच्या भिंती ओलांडणारा असा अफाट दृष्टिकोन त्यांच्याकडे होता.
३. 'चुपके चुपके रात दिन...' - एक रोमँटिक गझलकार
भारतीय राजकारणात ते जितके जहाल होते, उर्दू साहित्यात ते तितकेच हळवे होते. गझल सम्राट गुलाम अली यांनी गायलेली आणि बी. आर. चोप्रा यांच्या 'निकाह' (१९८२) चित्रपटात वापरलेली ती अजरामर गझल त्यांनीच लिहिली आहे.
"चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है...
हम को अब तक आशिक़ी का वो ज़माना याद है"
ब्रिटिशांच्या कैदेत रोज एक मण धान्य हाताने दळण्याची सक्तमजुरी करतानाही त्यांनी आपली काव्यरचना थांबवली नाही. 'कुलियात-ए-हसरत' या त्यांच्या काव्यसंग्रहातून त्यांच्या प्रतिभेची साक्ष मिळते.
४. भारतीय संविधानावर स्वाक्षरी करण्यास त्यांनी नकार का दिला?
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हसरत मोहानी हे संविधान सभेचे सन्माननीय सदस्य होते. त्यांनी संविधान मसुद्यावरच्या अनेक चर्चांमध्ये विशेषतः जमीनदारी निर्मूलन आणि अल्पसंख्याकांचे अधिकार अशा विषयांवरील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

तिथल्या कामकाजादरम्यान मोहानी यांनी बाबासाहेबांच्या अनेक प्रस्तावांवर विशेषतः भक्कम केंद्र सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती. मात्र, दोघांच्या या टोकाच्या वैचारिक संघर्षात कधीही वैयक्तिक कटुता आली नाही. अनेकदा इतर सदस्य मोहानींच्या सततच्या हरकतींवर वैतागत असत, पण डॉ. आंबेडकरांनी मात्र कायम अतिशय संयमाने आणि संसदीय आदराने त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं दिली. हा माणूस आपल्या तत्त्वांशी किती प्रामाणिक आणि तडजोड न करणारा होता, याचं हे मोठं उदाहरण आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानावर अंतिम स्वाक्षरी करण्याची वेळ आली, तेव्हा मोहानी यांनी स्पष्ट नकार दिला! हे संविधान राज्यांना पुरेसे अधिकार देत नाही आणि केंद्राला जास्त शक्तिशाली बनवते, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यांना सोव्हिएत युनियनच्या धर्तीवर भारताची कन्फेडरल रचना अपेक्षित होती. आपल्या राजकीय तत्त्वांसाठी संपूर्ण प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध एकटं उभं राहण्याची हिंमत त्यांच्यात होती. फाळणीलाही त्यांचा कडाडून विरोध होता, आणि पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतरही त्यांनी भारतातच राहणं पसंत केलं.
५. तत्त्वांसाठी थंडीत कुडकुडणे पसंत!
स्वातंत्र्यलढ्यात अनेकदा तुरुंगवास भोगूनही त्यांनी कधीही कोणाकडे मदतीची याचना केली नाही. ते कायम रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास करत. ते 'स्वदेशी'चे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी अलीगढमध्ये स्वदेशी वस्तूंचं एक दुकानही सुरू केलं होतं.
त्यांच्या साधेपणाचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. एकदा डिसेंबरच्या कडाक्याच्या हिवाळ्यात ते एका कार्यालयात झोपले होते. तिथं त्यांना पांघरायला परदेशी बनावटीचं ब्लँकेट देण्यात आलं. पण मोहानी यांनी ते परदेशी ब्लँकेट नाकारलं आणि रात्रभर थंडीत कुडकुडत झोपले. त्यांच्याकडे स्वतःची सुटकेसदेखील नसायची; ते आपले थोडेफार कपडे साध्या कापडी पिशवीत घेऊन फिरायचे.
१३ मे १९५१ रोजी लखनौमध्ये या वादळी व्यक्तिमत्त्वाने अखेरचा श्वास घेतला. दुर्दैवाने आज आपण त्यांना एका घोषणेपुरतं मर्यादित ठेवलं आहे. पण मौलाना हसरत मोहानी यांचं जीवन राजकीय किंवा धार्मिक चौकटीत बसणारं नव्हतं. देशभक्त, क्रांतिकारक, राजकारणी, कवी, कम्युनिस्ट आणि आध्यात्मिक संत असं ते बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे काळाच्या ओघात त्यांचे विचार आणि कार्य मागे न पडता उलट अधिकाधिक रीलेव्हंट होत गेलं आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter