उष्माघातामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणार - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 

देशातील उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू येत्या काही वर्षांत शून्यावर आणण्यासाठी गृह मंत्रालयाने विशेष आराखडा तयार केला आहे. आपत्ती आल्यावर प्रतिसाद देण्यापेक्षा, आपत्ती येण्यापूर्वीच सज्ज राहण्याच्या धोरणावर सरकार भर देत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केले.

गाझियाबाद येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) ८ व्या बटालियनच्या संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अमित शाह यांच्या हस्ते एनडीआरएफला प्रेसिडेंट कलर प्रदान करण्यात आला. सैन्य किंवा पोलीस दलाने केलेल्या अतुलनीय सेवेबद्दल हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. २००६ मध्ये स्थापन झालेल्या एनडीआरएफने आपल्या २० वर्षांच्या प्रवासात देश-विदेशातील बचाव कार्यांतून जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

आपत्ती व्यवस्थापनात भारत ग्लोबल लीडर
अमित शाह म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे उद्दिष्ट चक्रीवादळ, भूकंप आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये 'झिरो कॅज्युअल्टी' (शून्य मृत्यू) आणि मालमत्तेचे किमान नुकसान सुनिश्चित करणे हे आहे. भारताने आपत्ती व्यवस्थापनात जागतिक स्तरावर नेतृत्व सिद्ध केले असून कोणत्याही संकटात भारत 'फर्स्ट रिस्पॉन्डर' म्हणून ओळखला जात आहे."

उष्णतेच्या लाटेवर विशेष लक्ष
देशासमोर सध्या उष्णतेच्या लाटेचे मोठे आव्हान आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी गृह मंत्रालयाने तयार केलेल्या प्लॅनमुळे येत्या काळात उष्णतेमुळे एकाही नागरिकाचा जीव जाणार नाही, अशी व्यवस्था निर्माण केली जाईल. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे उद्भवणाऱ्या नवनवीन संकटांसाठी एनडीआरएफने स्वतःला तयार ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

एनडीआरएफचे महासंचालक पीयूष आनंद यांनी सांगितले की, दलाच्या स्थापनेपासून आतापर्यंत १२,००० हून अधिक यशस्वी बचाव मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. सध्या देशात एनडीआरएफच्या १६ बटालियन कार्यरत असून सुमारे १८,००० जवान तैनात आहेत.