डॉ. तन्वीर नसरीन : मालदीवमध्ये भारतीय संस्कृतीचा डंका वाजवणारे बहुआयामी व्यक्तिमत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
डॉ. तन्वीर नसरीन
डॉ. तन्वीर नसरीन

 

शोम्पी चक्रवर्ती पुरकायस्थ

इतिहास, संस्कृती, अधिकार आणि समन्वय या चार महत्त्वाच्या प्रवाहांचा संगम सय्यद तन्वीर नसरीन यांच्या आयुष्यात आणि कार्यात पाहायला मिळतो. त्या एका बाजूला इतिहासकार आणि शैक्षणिक संशोधक आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्या सांस्कृतिक मुत्सद्दी आणि महिला हक्क चळवळीतील एक विवेकी आवाज आहेत. सर्वधर्मीय सहअस्तित्व आणि मानवी एकता ही त्यांची नैसर्गिक जीवनमूल्ये आहेत. या वैविध्यपूर्ण ओळखीमुळे आजच्या भारतामध्ये त्या एक महत्त्वाच्या विचारवंत म्हणून प्रस्थापित झाल्या आहेत.

सध्या प्राध्यापक डॉ. सय्यद तन्वीर नसरीन बर्दवान विद्यापीठात इतिहास विभागात कार्यरत आहेत. यासोबतच त्या वूमन स्टडीज विभागाच्या प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. अध्यापन आणि संशोधनासोबतच त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक मुत्सद्देगिरीसाठी समर्पित होता. 

२०१९ ते २०२३ या काळात त्यांनी मालदीवची राजधानी माले येथील भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालक म्हणून काम पाहिले. या काळात भारत आणि मालदीवमधील लोकांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांनी भारतीय कला आणि संस्कृतीचा प्रसार करून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ केले. अत्यंत संवेदनशील राजनैतिक परिस्थितीत त्यांनी संस्कृतीचा वापर संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून केला.
 

एक विदुषी म्हणून त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत भक्कम आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून 'भारतातील मुस्लीम महिलांची ओळख' या विषयावर आपली पीएच.डी. पूर्ण केली. या संशोधनाने त्यांच्या पुढील वैचारिक प्रवासाची दिशा ठरवली. लिंगभाव, अल्पसंख्याक ओळख आणि महिलांचा राज्य व समाजाशी असलेला संबंध हे त्यांच्या संशोधनाचे मुख्य विषय आहेत. त्यांनी आतापर्यंत ३ पुस्तके लिहिली असून ५ खंडांचे संपादन केले आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांच्या कार्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व. या कौशल्याचा वापर करून त्यांनी प्राचीन भारतीय धार्मिक ग्रंथांचे सखोल वाचन केले आहे. त्याद्वारे त्यांनी भारतीय समाजातील स्त्रियांच्या स्थानाचे परीक्षण केले आणि चिंतनाचे नवे मार्ग खुले केले. याव्यतिरिक्त त्यांनी श्रीपत-श्रीखंड भागात जतन केलेल्या संस्कृत-बंगाली हस्तलिखितांची एक सूची तयार केली आहे. इतिहासकार आणि साहित्यिकांसाठी हा एक मौल्यवान ठेवा मानला जातो.

केवळ शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित न राहता गेल्या काही वर्षांत प्राध्यापक नसरीन सामाजिक चळवळी आणि धोरणात्मक चर्चेत सक्रिय झाल्या आहेत. भारतीय मुस्लीम महिलांच्या घटनात्मक आणि मानवी हक्कांच्या बाबतीत त्यांनी नेहमीच स्पष्ट आणि विवेकी भूमिका घेतली आहे. 'इन्स्टंट ट्रिपल तलाक'च्या विरोधातील चळवळीत त्यांनी बजावलेल्या सक्रिय भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. संशोधन आणि सामाजिक चळवळ यांच्यातील या निकटच्या संबंधामुळे त्यांच्या कामाला केवळ तात्त्विक खोलीच नाही तर व्यावहारिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
 

मालदीवमधील वास्तव्यात त्यांनी भारत-मालदीव संबंध, प्रादेशिक राजकारण आणि चीनचा प्रभाव या विषयांवर सातत्याने आपली मते मांडली. सांस्कृतिक मुत्सद्देगिरीच्या अनुभवाने त्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवला. राजकीय भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रभाव अधिक खोलवर आणि दीर्घकाळ टिकणारा असतो, याची त्यांना प्रचिती आली.

त्यांच्या ओळखीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दिसतो. प्राध्यापक डॉ. सय्यद तन्वीर नसरीन या एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहेत आणि त्यांना नाटकांची प्रचंड आवड आहे. कलेची ही ओढ त्यांच्या संशोधनात आणि सामाजिक विचारांमध्ये सहज मिसळून गेली आहे. धार्मिक सलोख्याच्या बाबतीत त्यांचे स्वतःचे आयुष्य एक जिवंत उदाहरण आहे. त्यांचे पती सुमन भट्टाचार्य हे एक सुप्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. वेगवेगळ्या धार्मिक पार्श्वभूमी असूनही त्यांचे कौटुंबिक जीवन परस्पर आदर आणि सहअस्तित्वाचे प्रतीक आहे.
 

दुर्गा पूजेदरम्यान त्या बंगालच्या या मोठ्या उत्सवात मनापासून सहभागी होतात. सप्तमीपासून दशमीपर्यंत त्या या उत्सवात मग्न असतात. त्याच वेळी त्यांच्या घरी आयोजित केल्या जाणाऱ्या जगद्धात्री पूजेच्या तयारीतही त्या तितक्याच उत्साहाने सामील होतात. भावाला टिळा लावण्यापासून ते विजयादशमीला नातेवाईकांना शुभेच्छा देण्यापर्यंतच्या सर्व प्रथा त्या पाळतात. हे सर्व त्यांच्या पालकांनी दिलेल्या सांस्कृतिक शिक्षणाचे आणि मानुसकीचे प्रतिबिंब आहे. धर्म, जात किंवा पंथाच्या पलीकडे जाऊन त्या मानवी नातेसंबंधांना आणि उत्सवांना आयुष्याच्या केंद्रस्थानी ठेवतात.

विद्वत्ता, सांस्कृतिक मुत्सद्देगिरी आणि हक्कांची चळवळ यांच्या एकत्रित प्रवासामुळे प्राध्यापक डॉ. सय्यद तन्वीर नसरीन यांनी समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे आयुष्य म्हणजे ज्ञान, माणुसकी आणि सहअस्तित्व एकमेकांना कसे पूरक ठरू शकतात याचे एक उत्तम उदाहरण आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter