JAC 12th Result : कोचींगशिवाय रशीदा नाज आली झारखंड राज्यात पहिली!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
रशीदा नाज तिच्या कुटुंबासोबत आनंद व्यक्त करताना
रशीदा नाज तिच्या कुटुंबासोबत आनंद व्यक्त करताना

 

ओनिका माहेश्वरी

"मेहनतीच्या आणि शिस्तीच्या जोरावर बंद दरवाजे उघडता येतात." फारशा सोयीसुविधा नाहीत आणि पैशांची चणचण... पण अशाही परिस्थितीत तुमचे इरादे जर पक्के असतील तर यश हमखास मिळतेच. धनबादच्या रशीदा नाजने हेच सिद्ध करून दाखवलंय.

झारखंड अकॅडमिक कौन्सिलच्या (JAC) १२ वी सायन्स शाखेच्या परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवलंय. ती डीएवी प्लस टू हायस्कूल, पाथरडीहची विद्यार्थिनी आहे. तिने ५०० पैकी तब्बल ४८९ गुण मिळवत संपूर्ण झारखंडमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे धनबादसोबतच संपूर्ण राज्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

रशीदाचं यश खास आहे. तिला कुठलेही कोचिंग किंवा शिकवणी लावलेली नव्हती. 'सेल्फ स्टडी', शिस्तशीर दिनचर्या आणि यूट्यूबच्या मदतीने तिने हे शिखर गाठलं. आज ती हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा बनली आहे.

सामान्य कुटुंबातील मुलीची असामान्य झेप
रशीदाचे वडील मोहम्मद रुस्तम अन्सारी हे पश्चिम बंगालमधील नियामतपूर येथील चीनाकुडीमध्ये एका कंपनीत कंत्राटी मजूर म्हणून काम करतात. तिची आई गुलअफ्शा परवीन या गृहिणी आहेत. रशीदाच्या घरची परिस्थिती बेताची आहे. पण स्वतःच्या मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

तिचा मोठा भाऊ मोहम्मद जुनैद अली बीसीए आणि बीएचं शिक्षण घेत आहे. मोठी बहीण कनीज फातिमा बीएड करत असून शिक्षिका बनण्याची तयारी करत आहे. रशीदा आपल्या मोठ्या बहिणीला आपला आदर्श मानते. भविष्यात तिलाही शिक्षिका बनून समाजाची सेवा करायची आहे.

सात किलोमीटरचा टेम्पो प्रवास
रशीदा पूर्वी भुलन बरारी येथे राहायची. पण आता तिचे कुटुंब जामाडोबा रमजानपूर येथील सामुदायिक भवनाजवळ राहते. ती रोज शाळेत जाण्यासाठी सुमारे सात किलोमीटर टेम्पोने प्रवास करायची. कितीही गैरसोय असली तरी तिने अभ्यासाशी कधीच तडजोड केली नाही.

तिने सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवलं. तिचं संपूर्ण लक्ष केवळ अभ्यासावर होतं. यश मिळवण्यासाठी एकाग्रता आणि शिस्त महत्त्वाची असते, असा तिचा ठाम विश्वास आहे.

पहाटे ४ वाजता सुरू व्हायचा अभ्यास
रशीदाची दिनचर्या शिस्तबद्ध होती. ती रोज पहाटे चार वाजता उठून अभ्यासाला बसायची. ती दररोज ८ ते १० तास अभ्यास करायची. परीक्षेच्या दिवसांत हा वेळ आणखी वाढायचा. थंडीच्या दिवसांत ती अनेकदा रात्री एक वाजेपर्यंत जागत असे.

एकेका विषयात आपल्याला किती गुण मिळाले पाहिजेत, हे तिने आधीच ठरवून ठेवलं होतं. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा तिने सतत सराव केला. यामुळे तिची तयारी चांगली झाली. काही अडचण आल्यास ती शिक्षकांशी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधायची.

कोचिंगशिवाय मिळवले मोठे यश
आजकाल बहुतांश विद्यार्थी महागड्या कोचिंग आणि ट्यूशनवर अवलंबून असतात. पण रशीदाने 'सेल्फ स्टडी' आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या मदतीने 'स्टेट टॉपर' होण्याचा मान मिळवला. तिने यूट्यूबचा वापर अभ्यासासाठी आणि कठीण विषय समजून घेण्यासाठीच तेवढा केला.

"विद्यार्थी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करतील आणि त्यानंतर नियमित सराव करतील, तर त्यांना यश नक्कीच मिळेल," असा मोलाचा सल्ला रशीदाने इतर विद्यार्थ्यांना दिला आहे.

शाळा आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण
रशीदाच्या या यशानंतर तिच्या कुटुंबात आणि शाळेत आनंदाची लाट उसळली आहे. डीएवी प्लस टू हायस्कूल पाथरडीहचे मुख्याध्यापक अरविंद कुमार पांडे यांच्यासह सर्व शिक्षकांनी तिचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. "रशीदाला लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी आहे, आपल्या ध्येयावरून ती कधीही हटत नाही," असं तिच्या घरच्यांनी सांगितलं.

रशीदा नाजला विविध विषयांत मिळालेले गुण :
इंग्रजी – ९८
भौतिकशास्त्र (Physics) – ९७
रसायनशास्त्र (Chemistry) – ९९
गणित – ९८
रिटेल – ९७
कॉम्प्युटर सायन्स – ७९

विद्यार्थ्यांसाठी बनली प्रेरणा
आर्थिक चणचण आणि अपुरी साधनं यशाच्या मार्गात कधीच अडथळा बनू शकत नाहीत, हे रशीदाच्या यशाने दाखवून दिलं आहे. प्रबळ इच्छाशक्ती, सततची मेहनत आणि शिस्तीच्या बळावर कोणतंही ध्येय साध्य करता येतं.

धनबादच्या या लेकीने संपूर्ण झारखंडचं नाव रोशन केलं आहे. "तुमची स्वप्नं मोठी असतील, तर त्यासमोर कसलीही परिस्थिती नमतेच नमते," हाच संदेश तिने आपल्या यशातून दिला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter