झिया फराह इस्लाम ठरली आसामच्या निकालातील 'सुपरस्टार'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
झिया फराह इस्लाम
झिया फराह इस्लाम

 

रिपुनजॉय दास 

अफाट जिद्द आणि कठोर मेहनत असेल, तर कोणतेही ध्येय सहज गाठता येते. पूर्व आसाममधील दिब्रुगड शहरात राहणाऱ्या एका हुशार मुलीने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. झिया फराह इस्लाम हिने आसाम माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSLC) दहावीच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. शुक्रवारी या परीक्षेचे निकाल जाहीर झाले.

झिया केवळ अभ्यासातच हुशार नाही, तर ती एक अत्यंत अष्टपैलू मुलगी आहे. हस्तकला, स्वयंपाक आणि बागकाम अशा विविध क्षेत्रांत तिने स्वतःचे कौशल्य सिद्ध केले आहे. या छंदांमुळेच तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच सर्जनशील झळाळी मिळाली आहे.

झिया फराह इस्लाम ही दिब्रुगडमधील 'लिटल फ्लॉवर हायर सेकंडरी स्कूल'ची विद्यार्थिनी आहे. ती येथील मिलन नगर भागातील रतनपूरची रहिवासी आहे. सादेकुल इस्लाम आणि जास्मिन बेगम यांची ती एकुलती एक मुलगी आहे. तिचे आई-वडील दोघेही पेशाने शिक्षक आहेत. यामुळेच तिला घरात सुरुवातीपासून शिक्षणाचे अत्यंत उत्तम वातावरण मिळाले. झियाचे हे यश तिच्यातील शिस्त आणि समर्पणाचे खरे दर्शन घडवते.

झिया ही केवळ अभ्यासू मुलगी नाही, तर ती अष्टपैलू प्रतिभेची धनी आहे. ती सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार राहिली असून आपल्या शाळेत नेहमीच 'टॉपर' राहिली आहे. प्रत्येक परीक्षेत तिने आपले वर्चस्व कायम ठेवले. अभ्यासाच्या धावपळीतही ती फावल्या वेळेत हस्तकला, स्वयंपाक आणि बागकाम अत्यंत आवडीने करते. याच गोष्टी तिला इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप वेगळे ठरवतात.

आपल्या या मोठ्या यशाचे श्रेय तिने आई-वडिलांसोबतच शाळेतील शिक्षकांनाही दिले आहे. आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो, अशा भावना तिने व्यक्त केल्या.

भविष्यात तिला एक यशस्वी डॉक्टर व्हायचे आहे. शिक्षणाचा खरा उद्देश माणसाला समाजाप्रती जबाबदार बनवणे आणि माणुसकीच्या नात्याने सेवा करणे हा आहे, असे ती मानते. डॉक्टर होऊन समाजातील गरजूंची सेवा करणे, हेच तिचे अंतिम ध्येय आहे.

झियाच्या या यशाने संपूर्ण परिसरात आनंदाची मोठी लाट उसळली आहे. तिचे हे यश केवळ एका कुटुंबासाठी अभिमानास्पद नाही, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठीही ती एक मोठी प्रेरणा आहे. झिया फराह इस्लामच्या या प्रवासाने हे सिद्ध केले आहे की, खरी जिद्द आणि मेहनत असेल तर जगात काहीही अशक्य नाही.

या निकालात पश्चिम आसाममधील 'पाटाचारकुची शंकरदेव शिशु निकेतन'च्या ज्योतिर्मय दास याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर हवजन येथील 'अंबिकागिरी रॉय चौधरी नॅशनल स्कूल'च्या आकांक्षा भुयान हिने दुसरा क्रमांक मिळवला. नलबारी येथील 'लिटल फ्लॉवर स्कूल'च्या सुरजित अख्तरने चौथा क्रमांक पटकावला आहे.

यावर्षी एकूण ४,२९,२४९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामध्ये १,८६,४६८ मुले आणि २,४२,७८१ मुलींचा समावेश होता. एकूण २,८१,७०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ६५.६२ टक्के इतकी लागली आहे.

आसाम माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता हा निकाल जाहीर केला. या निकालांनुसार, ८५,१८९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (६० टक्क्यांहून अधिक गुण), १,५०,१६७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी (४५ ते ६० टक्के) आणि ४६,३४५ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत (३० ते ४५ टक्के) यश मिळवले आहे.

जिल्हानिहाय निकालात 'दिमा हसाओ' जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ८८.२३ टक्के लागला आहे. तर 'कचार' जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ४९.१३ टक्के लागला. शिवसागर जिल्ह्याचा निकाल ८४.०८ टक्के आणि दिब्रुगड जिल्ह्याचा निकाल ७८.४६ टक्के इतका लागला आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter