अरिफुल इस्लाम
नुकताच सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला. गुवाहाटीच्या 'डॉन बॉस्को स्कूल'मध्ये तस्नीम रहमान हिने अव्वल स्थान पटकावले आहे. तिचे हे यश केवळ अभ्यासापुरते मर्यादित नाही. ती राष्ट्रीय पातळीवरील बास्केटबॉल खेळाडूही आहे. खेळ आणि अभ्यास या दोन्हींचा अत्यंत उत्तम मेळ घालत तस्नीमने इतर टॉपर्सपेक्षा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दहावीच्या परीक्षेत तस्नीमने तब्बल ९७ टक्के गुण मिळवले. या घवघवीत यशाने तिने आपल्या शाळेची मान अभिमानाने उंचावली आहे. तिला इंग्रजीत १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयात ९९, समाजशास्त्रात ९८, विज्ञानात ९२, गणितात ९४ आणि आसामी भाषेत ९४ गुण मिळवून तिने आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे.
गुवाहाटीतील लचित नगर भागात तस्नीम राहते. तिचे वडील दौलत रहमान हे 'आवाज द व्हॉईस'शी जोडलेले ज्येष्ठ पत्रकार आहेत. तिची आई मेहबुबा बेगम या शिक्षिका आहेत. तस्नीमने केवळ कुटुंबाचेच नाही, तर संपूर्ण परिसराचे नाव रोशन केले आहे.
तिने राष्ट्रीय पातळीवरील अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये आसामचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे.
'आवाज द व्हॉईस'शी बोलताना तस्नीमने आपला आनंद व्यक्त केला. "मी खूप खुश आहे. मला अपेक्षेप्रमाणेच यश मिळाले आहे. पावलोपावली खंबीर साथ दिल्याबद्दल मी माझ्या आई-वडिलांचे खूप आभार मानते. माझ्या शिक्षकांनीही मला मोठी मदत केली. मी 'डॉन बॉस्को स्कूल'मध्ये सलग दहा वर्षे शिकले. ही शाळा माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखीच आहे. माझ्या वर्गमित्रांनाही खूप चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे माझा आनंद आणखी दुणावला आहे," अशा भावना तिने व्यक्त केल्या.
परीक्षेपूर्वी तस्नीम दररोज सुमारे दहा तास अभ्यास करायची. शाळा सुटल्यानंतर ती शिकवणीला जायची आणि त्यानंतर स्वतःचा अभ्यास करायची. या सगळ्या धावपळीतही ती बास्केटबॉलसाठी आवर्जून वेळ काढायची. अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी या खेळाची खूप मोठी मदत झाल्याचे ती अगदी अभिमानाने सांगते.
तस्नीम सांगते, "बास्केटबॉल खेळून आल्यावर मला थकवा जाणवायचा. अशा वेळी मी साधारण दोन तास झोप काढायची. त्यानंतर उठून पुन्हा अभ्यासाला बसायची. दहावीत गेल्यावर मी लगेच अभ्यासाची वेळ वाढवली. मी जेव्हा मैदानावर असते, तेव्हा फक्त खेळाचाच विचार करते. तिथे इतर कोणताही विचार माझ्या मनात नसतो. खेळताना मी माझ्या मैत्रिणींना भेटते. यातून माझा मानसिक ताण खूप कमी होतो. याच कारणामुळे मला अभ्यासावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करता आले."
वेळेचे योग्य नियोजन केल्यास सर्व काही शक्य असते. या हुशार विद्यार्थिनीने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. "मला आसाम आणि देशासाठी काहीतरी भरीव आणि अर्थपूर्ण काम करायची खूप मोठी इच्छा आहे. आपण सर्व बाजूंनी प्रगती केली, तरच इतरांना मदत करू शकतो. समाजाची सेवा करण्यासाठी आधी स्वतःला प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे लागते. आमच्या शाळेत या गोष्टीला खूप महत्त्व दिले जाते. अभ्यासासोबतच माणुसकीच्या सेवेसाठी आम्हाला नेहमीच प्रोत्साहन दिले जाते," असे तस्नीम म्हणाली.
भविष्यातील योजनांबद्दल विचारल्यावर तस्नीमने आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. "मी यापूर्वीच अनेकदा आसामचे प्रतिनिधित्व केले आहे. बास्केटबॉलमध्ये यापुढेही अशीच चांगली कामगिरी करण्याची मला आशा आहे. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचे तर, अकरावी-बारावीसाठी मी वाणिज्य शाखा (Commerce) निवडण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य शाखेत बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), कंपनी सेक्रेटरी (CS) असे अनेक उत्तम पर्याय आहेत. पण बारावीत चांगले यश मिळवल्यानंतरच मी माझ्या करिअरचा अंतिम निर्णय घेणार आहे," असे तिने स्पष्ट केले.
तस्नीमच्या आई-वडिलांनी तिला अभ्यासात आणि खेळात नेहमीच भक्कम पाठिंबा दिला.
तिची आई मेहबुबा बेगम म्हणाल्या, "आमच्या मुलीने परीक्षेत मिळवलेले यश आमच्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. इतर सर्व पालकांप्रमाणेच आमच्याही तिच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. पण देवाने आमच्या अपेक्षांपेक्षाही खूप जास्त यश तिला दिले आहे."
तस्नीमची खेळाची आवड पाहिल्यानंतर पालकांनी तिला पूर्ण मोकळीक दिली. त्या पुढे म्हणाल्या, "आम्ही तिला खेळासाठीही प्रोत्साहन दिले. तिने तिथेही अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. सर्व पालकांनी आपल्या मुलांना पुरेसा वेळ द्यायला हवा, असे मला वाटते. आपण सर्वजण आपापल्या कामात कितीही व्यस्त असलो, तरी मुलांसोबत वेळ घालवणे खूप गरजेचे आहे."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter