US-Iran War : इराणचा प्रस्ताव ट्रम्प यांनी धुडकावला; दोन्ही देशांमधील संघर्षाचे ढग पुन्हा गडद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

मध्य पूर्वेतील दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध थांबवण्याचा इराणचा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. इराणच्या अटी 'पूर्णपणे अमान्य' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या नकाराने गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या वाटाघाटींवर पाणी फिरले असून, पुन्हा एकदा संघर्षाची शक्यता वाढली आहे.

ट्रम्प यांची भूमिका आणि इशारा

अमेरिकेतील वाढत्या देशांतर्गत दबावाचा सामना करत असलेल्या ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, इराण 'लष्करीदृष्ट्या पराभूत' झाला आहे. तसेच ज्या अणुकार्यक्रमामुळे हे युद्ध सुरू झाले, त्यावर आता अमेरिकेचे नियंत्रण आले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर एका छोट्या पोस्टमध्ये हा प्रस्ताव फेटाळत असल्याचे स्पष्ट केले. "मी नुकतंच इराणच्या तथाकथित 'प्रतिनिधींचे' उत्तर वाचले. मला ते आवडले नाही -- ते पूर्णपणे अमान्य आहे!" असे ते म्हणाले.

पत्रकार शेरिल अ‍ॅटकिन्सन यांच्याशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका इराणच्या युरेनियम साठ्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. "आम्ही 'स्पेस फोर्स'च्या मदतीने तिथे पाळत ठेवली आहे. जर कोणी त्या जागेजवळ गेले, तर आम्हाला लगेच कळेल आणि आम्ही त्यांना उडवून देऊ. एखादी व्यक्ती तिथे गेली तर स्पेस फोर्स तुम्हाला त्याचे नाव, पत्ता आणि बॅज नंबरही सांगू शकेल," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

इराणचा प्रस्ताव आणि अमेरिकेला उत्तर

'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, इराणने मध्यस्थ पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्या होत्या. यात उच्च प्रतीचे युरेनियम सौम्य करणे आणि उरलेले युरेनियम तिसऱ्या देशात हलवणे यांचा समावेश होता. मात्र, वाटाघाटी फिस्कटल्यास किंवा अमेरिकेने करारातून माघार घेतल्यास हे युरेनियम परत मिळण्याची हमी इराणने मागितली होती.

अमेरिकेने हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर इराणनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेने नवा हल्ला केल्यास प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीत आणखी परदेशी युद्धनौका येऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचा नवा प्रस्ताव म्हणजे 'शरणगती' असल्याचे सांगत इराणने तो धुडकावून लावला आहे. त्याऐवजी अमेरिकेकडून युद्ध नुकसानभरपाई, होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे पूर्ण सार्वभौमत्व, निर्बंध हटवणे आणि जप्त केलेली इराणी मालमत्ता परत करणे, या अटी इराणने ठेवल्या आहेत.

इराणच्या नेत्यांची आक्रमक भूमिका

पडद्यामागे मुत्सद्देगिरी सुरू असली तरी, इराणने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. "आम्ही शत्रूसमोर कधीही झुकणार नाही. चर्चा किंवा वाटाघाटींचा अर्थ शरण जाणे किंवा माघार घेणे असा होत नाही," असे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.

युद्धाला सुरुवात झाल्यापासून सार्वजनिक ठिकाणी न दिसलेले इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनीही लष्करी कमांडच्या प्रमुखांची भेट घेतली. "शत्रूशी ताकदीने लढा देण्याच्या आणि कारवाया सुरू ठेवण्याच्या नव्या सूचना" त्यांनी दिल्याचे इराणच्या सरकारी वाहिनीने सांगितले.

नेतान्याहू यांचा दावा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत इराणमधील युरेनियम हलवले जात नाही आणि अणुप्रकल्प नष्ट केले जात नाहीत, तोपर्यंत हे युद्ध संपणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याने इराणवर हल्ले सुरू केले होते. '६० मिनिट्स' या कार्यक्रमात बोलताना नेतान्याहू म्हणाले की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचीही अशीच भूमिका आहे. त्यांनी मला खासगीत सांगितले आहे की, त्यांना आत घुसून ही कारवाई करायची आहे."


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter