Iran War Update: अमेरिकन नौदलाच्या जहाजांवर इराणचे हल्ले; प्रत्युत्तरात अमेरिकेचा इराणच्या लष्करी तळांवर मारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि सध्या सुरू असलेली युद्धबंदी शुक्रवारी पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. 'स्ट्रेच ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) मध्ये अमेरिकन नौदलाच्या तीन जहाजांवर इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देताना अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केले असून, यामुळे आखाती प्रदेशातील तणाव कमालीचा वाढला आहे.

होर्मुझच्या समुद्रधुनीत संघर्ष

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणने विनाकारण अमेरिकन नौदलाच्या जहाजांवर हल्ले केले. अमेरिकेने स्वसंरक्षणार्थ हे हल्ले हाणून पाडले असून यात एकाही जहाजाचे नुकसान झाले नाही. मात्र, या हिंसेमुळे २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या आणि एप्रिलमध्ये काही प्रमाणात शांत झालेल्या युद्धाला पुन्हा तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, युएईच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या नागरिकांना हवाई संरक्षण यंत्रणेमुळे पडलेल्या कोणत्याही अवशेषांना स्पर्श न करण्याचा सल्ला दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

या ताज्या संघर्षानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक भूमिका घेतली आहे. ट्रम्प म्हणाले की, "इराणने हे समजून घेतले पाहिजे की, जर त्यांनी शांतता करारावर स्वाक्षरी केली नाही, तर त्यांना भविष्यात खूप मोठ्या वेदना सहन कराव्या लागतील." इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा सध्या पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू आहे. इराणचे परराष्ट्र मंत्रालय पाकिस्तानने दिलेल्या प्रस्तावांचा आढावा घेत असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

इराणचा होर्मुझवर नवा 'टॅक्स'

एकीकडे युद्ध सुरू असतानाच इराणने 'पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटी' नावाची नवीन सरकारी संस्था स्थापन केली आहे. या माध्यमातून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जागतिक जहाजांवर कर लादण्याचा आणि त्यांच्या तपासणीचा प्रयत्न इराण करत आहे. या समुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते. इराणच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर गगनाला भिडले असून जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.