सतानंद भट्टाचार्जी
श्रीभूमी (पूर्वीचे करीमगंज) जिल्ह्यातल्या धालीबिल गावातील तासीर अली हे सध्या अभिमानी पिता ठरले आहेत. त्यांच्या सातपैकी चक्क पाच मुलांनी देशसेवेचा गणवेश अंगावर चढवला आहे. ही पाचही मुलं आपल्या देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र काम करत आहेत. पहिल्यांदा पाहिल्यावर तासीर अली अगदी साधे आणि सामान्य व्यक्ती वाटतात. ते रामकृष्ण नगर मार्केटमध्ये स्वतःचं छोटंसं कपड्यांचं दुकान चालवतात. पण या साध्या जीवनामागे मोठी प्रेरणादायी कहाणी दडलेली आहे. या कहाणीने संपूर्ण आसामच्या लोकांची मनं जिंकून घेतली आहेत.
तासीर अली यांची तब्बल चार मुलं भारतीय सैन्यात आपली सेवा बजावत आहेत. तर त्यांचा पाचवा मुलगा आसाम पोलिसांत कार्यरत आहे. स्वतःच्या मुलांनी देशाच्या सेवेसाठी आणि रक्षणासाठी आयुष्य समर्पित केल्याचं पाहून या पित्याला प्रचंड अभिमान वाटतो. सैन्यात असलेल्या चार मुलांपैकी दोघे जण थेट काश्मीर खोऱ्यात तैनात आहेत आणि तिसरा मुलगा पंजाबमध्ये आपलं कर्तव्य बजावत आहे. आसाम पोलिसांत भरती झालेला मुलगा सध्या हैलाकांडी जिल्ह्यात आपली सेवा देत आहे. त्यांचा सर्वात लहान मुलगा सध्या कॉलेजमध्ये आपले शिक्षण घेत आहे. त्यांच्या मुलीचं लग्न झालं असून ती स्वतःच्या संसारात स्थिरावली आहे.
स्वतःच्या मुलांचं हे यश पाहण्यासाठी पत्नी आज जिवंत नाही, या विचाराने तासीर अली दुःखी होतात. तिने खूप लवकर या जगाचा निरोप घेतला, याचीच त्यांना खंत वाटते. स्वतःच्या मुलांच्या यशाबद्दल बोलताना तासीर अली भावूक होऊन जातात. त्यांच्या मुलांचा हा प्रवास असंख्य तरुणांना सशस्त्र दलात सामील होण्याची प्रेरणा नक्कीच देईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. या उदाहरणातून अनेक तरुण राष्ट्रनिर्मितीमध्ये मोठं योगदान देतील, असं त्यांना वाटतं.

या कहाणीत आणखी एक विशेष गोष्ट दडलेली आहे. या कुटुंबाकडे कोणतेही विशेष कोचिंग, महागडे प्रशिक्षण कार्यक्रम किंवा कोणत्याही खास संधी उपलब्ध नव्हत्या. सर्व मुलांनी सामान्य स्थानिक शाळांमध्येच शिक्षण पूर्ण केलं. पक्का निश्चय, शिस्त, कठोर मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली प्रबळ इच्छाशक्ती यांच्याच जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. भारतीय सैन्य आणि आसाम पोलिसांच्या अतिशय कठीण भरती प्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे पार केल्या.
या संपूर्ण प्रवासाची आठवण सांगताना तासीर अली आवर्जून सांगतात, “माझ्या मुलांनी साध्या आणि सामान्य शाळांमध्ये शिक्षण घेतलं. माझ्या मुलांच्या करिअरमधून इतर तरुणांनीही प्रेरणा घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांनीसुद्धा या देशाचं रक्षक बनून राष्ट्रनिर्मितीत सामील व्हावं, अशी मला वाटतं. माझी मुलं मोठी होऊन नक्कीच काहीतरी अर्थपूर्ण काम करतील, असा मला विश्वास वाटायचा.”
धालीबिल गावातल्या लोकांना या गोष्टीचं खूप अप्रुप आहे. कुटुंबातील इतक्या सदस्यांनी एकत्र देशाच्या संरक्षण आणि पोलीस दलात सेवा बजावणं, ही या परिसरातील एकमेवाद्वितीय गोष्ट आहे. तासीर अलींच्या कुटुंबाने घालून दिलेला हा आदर्श स्थानिक तरुणांना आयुष्यात सकारात्मक मार्गावर चालण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करेल, असा ग्रामस्थांचा विश्वास आहे. यातूनच अनेक तरुण देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करतील, असं त्यांना मनापासून वाटतं.

या कुटुंबाच्या उल्लेखनीय कहाणीची बातमी सोशल मीडियावर पसरताच, सर्वत्र त्यांचं मोठं कौतुक आणि चर्चा सुरू झाली. समाजातील सर्व थरांतील लोकांनी या कुटुंबाची त्यागाची भावना, देशभक्ती आणि जनसेवेचं अगदी भरभरून कौतुक केलं आहे. स्वतःच्या सुखापेक्षा देशसेवेला प्राधान्य देणारी मुलं घडवल्याबद्दल अनेकांनी तासीर अलींना मानाचा मुजरा केला आहे.
आजच्या काळात अनेक तरुण स्वतःसाठी योग्य 'रोल मॉडेल' शोधत असतात. अशा वेळी धालीबिलमधील या साध्या कुटुंबाची कहाणी सांगते की, कठोर मेहनत, जिद्द आणि देशभक्तीच्या जोरावर अगदी सामान्य कुटुंबंही असाधारण गोष्टी साध्य करू शकतात. एवढंच नाही, तर ते समाजावर आपला कायमस्वरूपी मोठा ठसा उमटवू शकतात.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -