ASSAM FLOOD: पुरामुळे ९५ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
आसाममधील पूरस्थिती अत्यंत गंभीर
आसाममधील पूरस्थिती अत्यंत गंभीर

 

गुवाहाटी

आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील सुमारे १ लाख ६० हजार नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत, तर गेल्या २४ तासांत ६ नवे मृत्यू झाल्याने या काळातील एकूण मृतांचा आकडा ९५ वर पोहोचला आहे. पुराचा सर्वाधिक फटका शिवसागर जिल्ह्याला बसला असून तिथे ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आलेल्या अहवालात शिवसागर आणि विश्वनाथ जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर गोलाघाट आणि मोरीगाव जिल्ह्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. चराईदेव जिल्ह्यात २१, जोरहाटमध्ये ९ आणि गोलाघाटमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४ जिल्ह्यांमध्ये १ लाख ६० हजारहून अधिक लोक प्रभावित असून शिवसागर, गोलाघाट आणि जोरहाट हे जिल्हे सर्वाधिक ग्रस्त आहेत.

केंद्रीय मंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी बुधवारी आसाममधील अतिशय प्रभावित झालेल्या शिवसागर जिल्ह्यातील नेपाळीखुटी भागाचा दौरा केला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. नुकसानीचे प्रमाण मोठे असल्याने पूर्वपदावर यायला वेळ लागेल, असे सांगत केंद्रातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सध्या राज्याभरात १०० हून अधिक मदत छावण्या सुरू असून ४४ हजारांहून अधिक नागरिकांना तिथे आश्रय देण्यात आला आहे.