GEN Z PROTEST: जेन झी च्या भावनांशी प्रामाणिक राहणे गरजेचे, आंदोलनांवर सरसंघचालक मोहन भागवतांचे मत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 35 m ago
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत.

 

मुंबई

जेन झी (Gen Z) मधील तरुणांचे प्रश्न आणि मागण्या न्याय्य असून त्यांच्या प्रामाणिकपणावर आपला विश्वास असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. आंदोलने करणाऱ्या तरुणांना 'देशविरोधी' ठरवता येणार नाही, असे स्पष्ट करत लोकशाहीत संवादाचा मार्ग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी गुरुवारी मुंबईत सांगितले.

मुंबईतील एका कार्यक्रमात सुमारे २ हजार जेन झी आणि जेन अल्फा सदस्यांशी संवाद साधताना भागवत बोलले. नुकत्याच झालेल्या परीक्षांमधील पेपर लीकच्या विरोधातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. देशातील शिक्षण प्रणालीबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या चिंता योग्य असून या क्षेत्रावरील खर्च जीडीपीच्या ६ टक्के पर्यंत वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लोकशाहीत मतभेद मिटवण्यासाठी आणि एकमतावर पोहोचण्यासाठी आंदोलन हा संवादाचा एक कायदेशीर मार्ग असल्याचे ते म्हणाले.

समलिंगी विवाह आणि आरक्षण प्रणालीवर भाष्य

या संवादादरम्यान सरसंघचालकांनी एलजीबीटीक्यूआयए+ (LGBTQIA+) समुदायावरही आपले विचार मांडले. हा समुदाय समाजाचा एक अविभाज्य भाग आहे, परंतु विवाहात बदल केल्यास त्याचे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात, असे सांगत त्यांनी समलिंगी जोडप्यांसाठी स्वतंत्र कायदेशीर फ्रेमवर्क तयार सुचवले. तसेच जोपर्यंत समाजात असमानता आणि भेदभाव कायम आहे, तोपर्यंत आरक्षण सुरू राहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, आरक्षणाचा लाभ घेऊन सक्षम झालेल्यांनी स्वेच्छेने इतरांसाठी त्याचा त्याग करण्याचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी वर्तवली.