डावीकडून ट्रेनर तिनत अतिफा, शिक्षक तस्नीम अनवारी, शिक्षक महंमद सबा अल-अहमद, उद्योजिका रुना रफिक
दौलत रहमान
आंतरराष्ट्रीय योग दिन असो वा एखादी सामान्य सकाळ, आसाममधील मुस्लिम बांधवांची संख्या योगासनांकडे झपाट्याने आकर्षित होत आहे. त्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक समतोल राखण्यासाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग बनवले आहे.
मुस्लिमांसाठी योग ही कोणतीही धार्मिक पद्धत नसून आरोग्याकडे पाहण्याचा एक वैज्ञानिक आणि समग्र दृष्टिकोन आहे. आपल्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या आसाम राज्यात योगासने आता धार्मिक सीमा ओलांडून पुढे गेली आहेत. निरोगी आयुष्य, शिस्त आणि अंतर्गत शांतता मिळवण्यासाठी वेगवेगळ्या धर्माचे लोक या माध्यमातून एकत्र येत आहेत.
कधीकाळी काही लोकांकडून धार्मिक चष्म्यातून पाहिले गेलेले योगासन आज जगभरात शारीरिक आरोग्य, मानसिक स्पष्टता आणि सर्वांगीण कल्याणासाठी एक सिद्ध पद्धत म्हणून स्वीकारले गेले आहे. आसाममध्ये मुस्लिम समुदायातील डॉक्टर, शिक्षक, उद्योजक, प्रशिक्षक आणि सुशिक्षित तरुण योगाचा आपल्या जीवनशैलीत नियमित वापर करत आहेत.
अनेक मुस्लिम योग अभ्यासक सांगतात, की प्रार्थना आणि योग यांची उद्दिष्टे जरी वेगळी असली, तरी दोन्ही गोष्टी शिस्त, एकाग्रता, आत्मनियंत्रण आणि मानसिक शांततेला प्रोत्साहन देतात. या विचारसरणीमुळेच राज्यातील मुस्लिम समुदायामध्ये योगाचा स्वीकार आणि लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.
जगभरात रविवारी २१ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. या निमित्ताने आसाममधील अनेक मुस्लिम बांधवांनी योगामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. त्यांच्यासाठी योग हा केवळ वर्षातून एकदा साजरा करण्याचा उत्सव नसून रोजच्या जीवनात संतुलन राखणारा एक महत्त्वाचा सराव बनला आहे.
अशाच एका नियमित सराव करणाऱ्या साधक म्हणजे लीडरशिप कोच आणि ट्रेनर तिनत अतिफा मसूद या आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या योग प्रवासाची सुरुवात केली.
"माझे योगाशी असलेले नाते कोणत्याही बंधनातून निर्माण झालेले नाही. ते माझ्या आयुष्यासाठी, शरीरासाठी आणि मनासाठी असलेली एक प्रामाणिक बांधिलकी आहे. माझा प्रत्येक श्वास माझ्या शरीराशी होणारा एक मूक संवाद बनला आहे. प्रत्येक आसन माझ्या ताकदीचा आणि कमकुवतपणाचा आदर करण्याचे एक वचन वाटते", असे 'आयएमदबेस्ट लीडरशिप अकॅडमी'च्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तिनत अतिफा मसूद यांनी 'आवाज-द व्हॉईस'शी बोलताना सांगितले.
नियमित सरावामुळे त्यांना सूर्य नमस्काराची ताकद आणि चमत्कार अनुभवता आला, अशी आठवण तिनत यांनी सांगितली.
"मला सूर्य नमस्काराचे महत्त्व आधीपासूनच माहीत होते. परंतु योगाने मला एकाच वेळी शिस्त, संयम आणि आनंद शिकवला. मला अजूनही आठवते, मी अवघ्या २५ मिनिटांत सूर्य नमस्काराच्या १०८ फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. हा अनुभव माझ्यासाठी एकाग्रता आणि शारीरिक तंदुरुस्तीची एक जिवंत आठवण आहे", असे तिनत म्हणाल्या.
गेल्या एका वर्षापासून तिनत या प्रसिद्ध योग प्रशिक्षक सौरव बोथरा यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने योगाचा सराव करत आहेत.
"माझ्यासाठी दररोज सूर्य नमस्कार करणे म्हणजे शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्पष्टता राखत या सुंदर आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. योग केवळ शरीराची लवचिकता सुधारत नाही, तर मन अधिक शांत, स्थिर आणि खंबीर बनवतो", असे त्यांनी पुढे सांगितले.
आपल्या लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचा एक भाग म्हणून तिनत विद्यार्थ्यांना प्राणायाम शिकवतात.
"विद्यार्थ्यांचा अस्वस्थ श्वास हळूहळू शांत होताना पाहणे, त्यांचे ताणलेले खांदे सैल होणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांततेचा भाव येणे हे पाहणे मनाला खूप सुखावून जाते. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते, की योगाचे यश कठीण आसनांवर प्रभुत्व मिळवण्यात नाही. ते आपल्या श्वासाशी जोडले जाण्यात, वर्तमानात जगण्यात आणि एक दयाळू व धाडसी मन विकसित करण्यात आहे", असे तिनत म्हणाल्या.
त्यांनी सर्वांना नियमित योगासने करण्याचा आग्रह केला आहे.
"योगाकडे केवळ शरीर शिथिल करण्याचा मार्ग म्हणून पाहू नका. आपल्या शरीराने आपल्याला दिलेल्या अद्भूत शक्यतांचा तो एक उत्सव आहे. हळूहळू सुरुवात करा, जाणीवपूर्वक श्वास घ्या आणि योग तुम्हाला सुंदर जगण्याची कला शिकवेल", असा सल्ला तिनत यांनी दिला.
गुवाहाटी येथील शिक्षक तस्नीम अनवारी यांच्या मते, विविध प्रकारच्या व्यायामांची लोकप्रियता वाढली असली, तरी अजूनही अनेक लोकांना योगाच्या विविध फायद्यांची पूर्ण माहिती नाही.
"माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगायचे तर, शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यात नियमित योग सराव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो", असे ते म्हणाले. अनवारी यांच्या मते, शालेय स्तरापासूनच मुलांची योगाशी ओळख करून दिली पाहिजे.
"अनेक मुलांना शरीराच्या लवचिकतेच्या किंवा बसण्या-उठण्याच्या चुकीच्या पद्धतींच्या समस्यांचा सामना करावा लागतो. नियमित योगासने या समस्या दूर करण्यास मदत करतात. योग्य मार्गदर्शनाखाली योगासने केल्यास डोकेदुखी, मायग्रेन, मानसिक ताण आणि इतर अनेक आरोग्य समस्यांवर मात करता येते. म्हणूनच योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे", असे अनवारी यांनी सांगितले.
गेल्या जवळजवळ १५ वर्षांपासून योगाचा सराव करणाऱ्या अनवारी आता त्यांच्या शाळेत योग सत्रे घेतात.
"आम्ही विद्यार्थ्यांना सोपी योगासने, स्ट्रेचिंगचे व्यायाम आणि त्यांच्या वयाला साजेसे शारीरिक खेळ शिकवतो. प्रत्येक मुलाला योगाची कठीण तंत्रे लगेच समजणे शक्य नसते. त्यामुळे आम्ही त्यांना हळूहळू विविध आसने शिकवतो. नियमित सरावामुळे त्यांची लवचिकता सुधारते, एकाग्रता वाढते आणि ते शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय होतात", असे अनवारी म्हणाल्या.
अनवारी यांच्या मते, योग प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्रार्थना आणि योग या दोन्हीचे स्वतःचे वेगळे उद्दिष्ट आणि महत्त्व आहे. योग शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देतो. दुसरीकडे प्रार्थना ही एक उपासना पद्धत आहे, ज्यातून अनेक शारीरिक आणि भावनिक फायदे मिळतात. "जरी योगामध्ये 'ओम'चा उच्चार केला जातो आणि प्रार्थनेत तसे नसते, तरी दोन्ही गोष्टी शिस्त, आत्मनियंत्रण आणि संतुलित जीवनशैलीला प्रोत्साहन देतात", असे त्यांनी सांगितले.
गुवाहाटीच्या पानबाजार येथील डोन बॉस्को स्कूलचे वरिष्ठ इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक आणि कवी साख महंमद सबा अल-अहमद हे देखील योगाचे मोठे चाहते आहेत. त्यांच्या पहिल्या योग शिक्षिका जे. पी. मजुमदार यांनी त्यांना एका दशकापूर्वी योगाची ओळख करून दिली होती.
"त्यांच्या वर्गात नियमितपणे जाू लागल्यापासून अवघ्या एक-दोन महिन्यांतच मला स्वतःमध्ये एक विलक्षण बदल जाणवला. मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या मला टवटवीत वाटू लागले. आयुष्याला एक नवीन गती मिळाली आणि मला वीस वर्षे लहान आणि निरोगी असल्यासारखे वाटू लागले", असे अहमद म्हणाले.
कोविड-१९ साथीच्या आजाराच्या काळात सबा अल-अहमद यांनी ऑनलाईन पद्धतीने योगाचा सराव सुरू ठेवला. २०२१ मध्ये त्यांचे दुसरे योग मार्गदर्शक उज्ज्वल भट्टाचार्य यांनी त्यांना घरीच नियमित सत्रे घेण्यास मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
"विशेषतः प्राणायामाचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडला आहे. यामुळे माझ्या झोपेचा दर्जा सुधारला आहे आणि मनाला अधिक शांतता व भावनिक स्थिरता मिळाली आहे", असे अहमद यांनी सांगितले.
एक शिक्षक या नात्याने ते विद्यार्थ्यांना दररोज किमान ३० मिनिटे योगासाठी देण्याचा आग्रह करतात.
"युट्यूब किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून शिकता येणारे सोपे योग प्रकार एकाग्रता, स्मरणशक्ती आणि शैक्षणिक कामगिरी सुधारण्यास मदत करतात. जे विद्यार्थी नियमित सराव करतात, ते अधिक लक्ष केंद्रित करू शकतात आणि शिस्तबद्ध बनतात", असे ते म्हणाले.
आता ५२ वर्षांचे असलेले सबा अल-अहमद हे निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहेत. ते सहकारी, मित्र आणि विद्यार्थ्यांसोबत नेहमी योगाच्या फायद्यांची चर्चा करतात.
"योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नाही. तो निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनाचा एक संपूर्ण मार्ग आहे", असे त्यांनी सांगितले.
यशस्वी उद्योजिका रुना रफिक या देखील योगाच्या मोठ्या पुरस्कर्त्या आहेत. त्या गेल्या जवळजवळ दोन दशकांपासून नियमित सराव करत आहेत आणि योगाच्या परिवर्तनकारी ताकदीवर त्यांचा दृढ विश्वास आहे.
"जेव्हा योगाचा योग्य आणि सातत्याने सराव केला जातो, तेव्हा तो केवळ निरोगी शरीराचा विकास करत नाही, तर एक शांत, स्थिर आणि सकारात्मक मानसिकता देखील तयार करतो", असे त्या म्हणाल्या.
रफिक यांच्या मते, शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि मानसिकदृष्ट्या संतुलित व्यक्ती समाजात सकारात्मक योगदान देऊ शकते.
"एक निरोगी समाज हा निरोगी व्यक्तींमधूनच उभा राहतो. त्यामुळे योगाचा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून स्वीकार केला पाहिजे", असे त्यांनी सांगितले.
रफिक मानतात, की आधुनिक काळात योगाचे महत्त्व खूप वाढले आहे. आजच्या काळात ताणतणाव आणि चिंता सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करत आहेत. "योग आपल्याला मनाचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकवतो आणि हा प्रवास आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्यापासून सुरू होतो. योगासोबत श्वास घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शरीर निरोगी ठेवण्यास आणि मनाला तणावमुक्त ठेवण्यास मदत करतात", असे त्या म्हणाल्या.
रफिक यांच्या मते, शरीर आणि मन यांच्यात सुसंवाद निर्माण करणे हाच योगाचा खरा गाभा आहे. "केवळ शरीर निरोगी असणे पुरेसे नाही. मनही शांत आणि संतुलित राहिले पाहिजे. हे संतुलन कसे साध्य करायचे, हे योग आपल्याला शिकवतो."
पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर इलियास अली हे देखील वैद्यकीय दृष्टिकोनातून योगाचे जोरदार समर्थन करतात.
"एक डॉक्टर म्हणून माझा योगाच्या फायद्यांवर पूर्ण विश्वास आहे. तथापि, याकडे केवळ एक ट्रेंड किंवा सोशल मीडियाच्या प्रसिद्धीचे माध्यम म्हणून पाहिले जाऊ नये. जर लोकांना याचे खरे शारीरिक आणि मानसिक फायदे मिळवायचे असतील, तर योगाकडे सर्वसमावेशकपणे पाहिले पाहिजे आणि योग्य पद्धती व मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याचा सराव केला पाहिजे."
या सर्व शिक्षक, उद्योजक आणि प्रशिक्षकांचे अनुभव हेच दर्शवतात, की योग हा धार्मिक ओळखीच्या पलीकडे जाऊन एक जागतिक कल्याणकारी पद्धत म्हणून विकसित झाला आहे. आसाममधील अनेक मुस्लिम बांधवांसाठी योग हे आरोग्य, मानसिक शांतता आणि भावनिक लवचिकता टिकवून ठेवण्याचे एक व्यावहारिक व प्रभावी साधन बनले आहे.
त्यांचा संदेश अगदी साधा आहे: योग हा धर्माशी संबंधित नसून आरोग्याशी संबंधित आहे. आणि या वाढत्या तणावाच्या जगात, त्याची शाश्वत तत्त्वे प्रत्येकाला अधिक निरोगी, शांत आणि संतुलित जीवनाचा मार्ग दाखवतात.
(लेखक आवाज-द-व्हॉईस आसामचे संपादक आहेत.)