कट्टरतावादाविरोधात अजमेर दर्ग्याचे प्रमुख राबवणार 'मेरा मुल्क मेरी पहचान’ उपक्रम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
अजमेर शरीफ दर्ग्याचे प्रमुख सय्यद नसीरुद्दीन चिश्ती
अजमेर शरीफ दर्ग्याचे प्रमुख सय्यद नसीरुद्दीन चिश्ती

 

वाढता द्वेष, कट्टरतावाद आणि दुहीच्या वातावरणाचा सामना करण्यासाठी विविध दर्ग्यांचे प्रमुख आणि मुस्लिम धर्मगुरूंनी सुफी विचारांचा प्रसार करावा, असे आवाहन अजमेर शरीफ दर्ग्याचे प्रमुख सय्यद नसीरुद्दीन चिश्ती यांनी केले आहे. 'ऑल इंडिया सुफी सज्जादानशीन कौन्सिल'चे अध्यक्ष असलेले सय्यद नसीरुद्दीन चिश्ती दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.

'मेरा मुल्क मेरी पहचान' या मोहिमेअंतर्गत दिल्लीत 'डायलॉग: सुफीझम फॉर ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड' या विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत बोलताना त्यांनी सुफी परंपरेचे महत्त्व विशद केले. हा संवाद म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून मानवतेच्या रक्षणासाठी दिलेली आध्यात्मिक साद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजचे जग अशांतता, युद्ध, द्वेष आणि धार्मिक कट्टरतावादाशी संघर्ष करत आहे. मानवी मूल्यांचा ऱ्हास होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुफी विचार हीच जगासाठी मोठी आशा

माणूस भौतिकदृष्ट्या प्रगती करत असला तरी लोकांच्या मनातून प्रेम, संयम, करुणा आणि माणुसकी यांसारखे गुण कमी होत आहेत. अशा कठीण काळात सुफी विचार हीच जगासाठी सर्वात मोठी आशा म्हणून समोर येते. सुफी विचार कोणत्याही विशिष्ट धर्म, जात किंवा समुदायापुरते मर्यादित नाहीत. तो माणुसकी, प्रेम, करुणा आणि बंधुत्वाचा संदेश देतो. हाच मार्ग मने जोडतो, समाज मजबूत करतो आणि जगात शांतता प्रस्थापित करतो, असे चिश्ती यांनी नमूद केले.

हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी अजमेरच्या मातीतून संपूर्ण जगाला 'सर्वांवर प्रेम करा, कोणाचाही द्वेष करू नका' हा साधा पण सखोल संदेश दिला होता. त्यांनी भुकेल्यांना अन्न दिले, दुःखी लोकांना आधार दिला आणि प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला जवळ केले. हेच सुफी परंपरेचे खरे वैशिष्ट्य आहे. महान सुफी संतांनी नेहमीच मानवतेच्या सेवेला सर्वोच्च उपासना मानले आहे आणि समाजात प्रेम, सहिष्णुता आणि बंधुत्वाचा पाया मजबूत केला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तरुण पिढीला सुफी शिकवण देणे गरजेचे

महान सुफी संतांनी स्थापन केलेल्या दर्गा आणि खानकाहचे (आध्यात्मिक केंद्रे) प्रमुख म्हणून आजच्या धर्मगुरूंवर मोठी जबाबदारी आहे. समाजात पसरत असलेल्या नकारात्मकतेला तोंड देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपण द्वेष, कट्टरतावाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. माणसाला अधिक चांगला माणूस बनवणारी सुफी शिकवण आपण तरुण पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. जर जगाला शांतता हवी असेल, समाजाला एकता हवी असेल आणि माणुसकी टिकवायची असेल, तर आपण सुफीवादाच्या आध्यात्मिक शक्तीचा पुरस्कार केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

भारताची संमिश्र संस्कृती, सामायिक वारसा आणि सांप्रदायिक सौहार्दाच्या परंपरा जतन करण्यावर त्यांनी भर दिला. भारताची 'गंगा-जमुनी तहजीब' टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. शतकानुशतके सुफी संतांचे दर्गा आणि खानकाह हे शांतता, प्रेम आणि मानवी एकतेचे केंद्र राहिले आहेत. तिथे प्रत्येक धर्माचे आणि सामाजिक स्तराचे लोक कोणताही भेदभाव न करता एकत्र येतात. हीच भारताची खरी ताकद आहे आणि तोच सुफी संदेशाचा गाभा आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व धर्मगुरूंनी द्वेषाला प्रेमाने, हिंसेला शांततेने आणि दुहीला बंधुत्वाने उत्तर देण्याची शपथ घेतली. हीच सुफी संतांची शिकवण असून तोच मानवतेचा मार्ग आहे. भारताची एकता आणि लोकांमधील सौहार्द टिकून राहावे यासाठी यावेळी सर्वांनी प्रार्थना केली.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter