केतन अग्रवाल केस; आरोपी प्रेयसी आणि प्रियकराने ६ महिन्यांत केले २,००० कॉल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
केतन अग्रवाल हत्याकांडाचा उलगडा; आरोपी प्रेयसी आणि प्रियकराने रचला होता हत्येचा कट
केतन अग्रवाल हत्याकांडाचा उलगडा; आरोपी प्रेयसी आणि प्रियकराने रचला होता हत्येचा कट

 

पुणे 

पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल (२६) याचा लोहगड किल्ल्यावर झालेला मृत्यू एक अपघात नसून, तो त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचलेला एक पूर्वनियोजित कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या दोघांनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल २,००४ वेळा फोनवर संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे, ज्यातून हा हत्येचा कट रचला गेल्याचा पोलिसांचा संशय आहे.

२३८ तासांचे कॉल रेकॉर्ड्स

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी गेल्या सहा महिन्यांत एकूण २३८ तास फोनवर संवाद साधला होता. काही संभाषणे तर २ ते ३ तास चालली होती. हत्येच्या दिवशी हे दोघे एका कॅफेमध्ये भेटले होते आणि तिथेच त्यांनी केतनला दरीत ढकलण्यासाठी लोहगड किल्ल्यावर एक योग्य ठिकाण निवडले होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

लग्नापूर्वीच हत्येचा कट

केतन आणि सिया यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये उदयपूरमध्ये त्यांचा भव्य विवाह होणार होता. मात्र, सिया आणि चेतन यांना केतन त्यांच्या नात्यातील अडथळा वाटत होता, त्यामुळे त्यांनी त्याला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला. याआधी ६ जून रोजी विमानतळावर जाताना सियाने केतनचा पासपोर्ट मुद्दाम गायब केला होता, जेणेकरून त्यांची बाली येथे होणारी प्री-वेडिंग फोटोशूटची सहल रद्द व्हावी.

तसेच, १४ जून रोजी देखील सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने एका झुडपाला धरून जीव वाचवला. त्यावेळी सापाचे निमित्त करून तिने स्वतःचा बचाव केला होता. अखेर १८ जून रोजी चेतनच्या मदतीने त्यांनी केतनला लोहगडवरून दरीत ढकलून त्याची हत्या केली. सीसीटीव्हीमध्ये चेतन हुडी घातलेला दिसला, ज्यावरून या संपूर्ण प्रकरणाचा सुगावा पोलिसांना लागला. सध्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.