साताऱ्यात स्वातंत्र्यदिनी होणार ‘मिसाल वतन से मुहब्बत की’ पुरस्काराने कर्मयोग्यांचा बहुमान

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 17 h ago
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र

 

भक्ती चाळक

स्वातंत्र्यसंग्रामात साताऱ्याच्या भूमीपुत्रांचे मोठे योगदान राहिले आहे. याच भूमीत देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या अनेक मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग दडलाय. साताऱ्यातील गेंडामाळ कब्रस्तानमध्ये विसावलेल्या या वीरांचे योगदान केवळ रणांगणापुरते मर्यादित नव्हते. स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतरही शिक्षण, न्याय, सहकार, साहित्य अन् क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रनिर्मितीची बीजे रोवली.

त्यांच्या याच देशप्रेमाची आठवण जपत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी १५ ऑगस्टला साताऱ्यात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘खिदमत-ए-खल्क’ आणि ‘जमीयतुल उलमा वल हुफ्फाज’ या संस्थांच्या वतीने ‘मिसाल वतन से मुहब्बत की २०२६’ या पुरस्कारांचे वितरण स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने केले जाणार आहे.

इतिहासाला वर्तमानाशी जोडणारी कडी
सीमेवर शस्त्र हाती घेऊन लढणे ही देशसेवा आहेच, पण समाजात अन्यायाविरुद्ध कायद्याची मशाल घेऊन उभे राहणे, निराधारांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे, तुटणारी कुटुंबे सावरणे आणि उपेक्षितांना आधार देणे ही देखील देशप्रेमाचीच रूपे आहेत.

२०२५ पासून सुरू झालेला हा उपक्रम म्हणजे भूतकाळातील स्वातंत्र्यसैनिकांचे विचार अन् त्याग आजच्या तरुण पिढीच्या मनात रुजवणारी एक जिवंत चळवळ आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या-ज्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले, त्याच क्षेत्रात आज माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या आजच्या कर्मयोग्यांचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे.

‘मिसाल वतन से मुहब्बत की’ चे मानकरी 
या वर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० कर्तृत्ववान मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पत्रकारिता व साहित्य क्षेत्र : स्वातंत्र्यसैनिक इम्तियाज मिर्झा मास्तर यांच्या साहित्यिक व कविता क्षेत्रातील योगदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार व लेखक विनोद सूर्यनारायण कुलकर्णी यांची निवड झाली आहे. त्यांनी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात आयोजित करून शहराचा नावलौकिक जगभरात पोहोचवला.
क्रीडा क्षेत्र : स्वातंत्र्यसैनिक पैलवान उमर बाळाभाई खाटिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
माजी सैनिक : स्वातंत्र्यसैनिक इब्राहिम फरास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी सैनिक शंकर माळवदे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
न्याय क्षेत्र : स्वातंत्र्यसैनिक व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निकटवर्ती ॲड. इस्माईल साहेब मुल्ला यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ॲड. मनीषाताई बर्गे यांना हा सन्मान दिला जाणार आहे.
शिक्षण क्षेत्र : स्वातंत्र्यसैनिक महिताप शेख मास्तर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श शिक्षक जावेद अर्शद सय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
व्यापार क्षेत्र : स्वातंत्र्यसैनिक अब्दुल जब्बार हकीम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवीण कांबळे यांचा बहुमान केला जाणार आहे.
सामाजिक क्षेत्र : स्वातंत्र्यसैनिक शेखकाका बंडू इनामदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माहेश्वरी समाजाचे माधव सारडा यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सामाजिक कार्य : स्वातंत्र्यसैनिक शफी शेख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्येष्ठ समाजसेवक वसंतशेठ जोशी यांचा सन्मान होणार आहे.
ऑटोमोबाईल व सामाजिक कार्य : स्वातंत्र्यसैनिक इस्माईल हकीम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बागवान जमियतच्या माध्यमातून कार्यरत असलेले परवेज बागवान यांची निवड झाली आहे.
वैद्यकीय जनसेवा : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय जनसेवेबद्दल डॉ. कौशिक पाटील यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
 

तरुण पिढीच्या मनात खऱ्या देशप्रेमाची बीजे रोवण्याचा ध्यास!
या सोहळ्याची मूळ संकल्पना आणि त्यामागील भूमिका मांडताना ‘खिदमत-ए-खल्क’ संस्थेचे अध्यक्ष सादिक दिलावर शेख यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “आजकाल समाजात देशप्रेमाच्या केवळ मोठ्या गप्पा मारल्या जातात. परंतु, खऱ्या अर्थाने देशप्रेम काय असते, हे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाकडे पाहिल्यावरच समजते. ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, त्यांच्या स्मृती जर आपण तरुण पिढीच्या मनात पुन्हा जागवल्या, तरच देशासाठी जगणारी नवी निष्ठावान पिढी तयार होईल.”

ते पुढे म्हणाले की, “आमच्या साताऱ्यात ॲड. इस्माईल साहेब मुल्ला यांच्यासारखे महान स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले, जे रयत शिक्षण संस्थेचे मानद सचिव होते. त्यांच्या नावाने आज लॉ कॉलेज आहे. मिर्झा मास्तर, उमर पैलवान यांच्यासारख्या वीरांनी आपापल्या क्षेत्रात मोलाचे कार्य केले. तीन वर्षांपूर्वी आम्ही या शहीद वीरांच्या नातेवाईकांचा सन्मान केला होता. आता त्यांच्याच नावाने आजच्या समाजसेवकांना आणि कर्मयोग्यांना सन्मानित करत आहोत. तरुण पिढीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि राष्ट्रहिताची भावना रुजवणे हाच आमचा मूळ उद्देश आहे.”

सातारकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन
१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. त्यामुळे सर्व सातारकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतींना अभिवादन करावे आणि आजच्या कर्मयोग्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन ‘खिदमत-ए-खल्क’ सामाजिक संस्था आणि ‘जमीयतुल उलमा वल हुफ्फाज’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter