मुंबई
मुंबईत अनंत चतुर्दशीनिमित्त होणाऱ्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण शहर कडेकोट सुरक्षेच्या छावणीत असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. गत १४ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या लाडक्या बाप्पाला शुक्रवारी निरोप दिला जाणार आहे.
विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लखो भाविकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. अधिकृत माहितीनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने ६ सहपोलिस आयुक्त, ९ अप्पर पोलिस आयुक्त, ३८ पोलीस उपायुक्त (DCP), ६६ सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP), ३ हजार २१३ पोलीस अधिकारी, १८ हजार ९४० अंमलदार आणि १ हजार ५० प्रशिक्षणार्थी पोलीस तैनात असणार आहेत.
शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF), राज्य राखीव पोलीस दल (SRPF), फोर्स वन, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), दंगल नियंत्रण पथक (RCS), अँटी-ड्रोन पथक आणि होमगार्ड्सना तैनात केले गेले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी सहपोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी संयम बाळगून पोलिसांना सहकार्य करण्याचे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ १०० किंवा ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.