माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि त्यांचे निकटवर्ती सहयोगी सृजनपाल सिंह
मलिक असगर हाशमी
जगाच्या पाठीवर असे फार थोडे लोक असतात, ज्यांची शेवटची इच्छा पूर्ण होताना हे जग पाहते. पण आयुष्याचा शेवटचा क्षण जगतानाही आपली इच्छा पूर्ण करत या जगाचा निरोप घेणारी एखादी व्यक्ती असू शकते, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.
दिग्गज अन् प्रेरणादायी व्यक्तींच्या आयुष्यातील मनाला स्पर्श करणाऱ्या प्रसंगांचा पट आपण 'एक कहाणी' या खास मालिकेतून उलगडत आहोत. आजची कथा आहे भारतरत्न, माजी राष्ट्रपती अन् मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील एका अत्यंत खास प्रसंगाची!
युवा पिढीला विचार करायला लावणारा तो एक प्रश्न
डॉ. कलाम यांचे नाव घेताच आपल्या डोळ्यांसमोर काय येते? एक महान शास्त्रज्ञ? भारतीय मिसाईलचे जनक? पोखरणची अणूशक्ती? की लोकांचे लाडके राष्ट्रपती पीपल्स प्रेसिडेंट? या अफाट कर्तृत्वाच्या पलीकडे जाऊन या महामानवाची स्वतःची शेवटची इच्छा काय असेल, असा विचार कधी आपण केला आहे का?
या रहस्यावरून पडदा उठवला आहे त्यांचे निकटवर्ती सहयोगी सृजनपाल सिंह यांनी. सृजनपाल हे २००९ ते २०१५ या काळात डॉ. कलाम यांचे सल्लागार होते. सृजनपाल सांगतात, डॉ. कलाम रोज त्यांच्यासोबत काम करणाऱ्या तरुणांना एकच प्रश्न विचारायचे, "भविष्यकाळात लोकांनी तुमची आठवण कोणत्या कारणासाठी ठेवावी असे तुम्हाला वाटते?"
हा प्रश्न विचारून ते थांबायचे नाहीत. तर "या उत्तराची आणखी एक चांगली आवृत्ती सांगा," अशी जोड द्यायचे. तरुणांनी स्वतःचा शोध घ्यावा अन् स्वतःचे ध्येय उंचावावे, हाच यामागील मूळ उद्देश असायचा.
पर्याय D नाही तर पर्याय E...
रोज तोच प्रश्न ऐकून एक दिवस सृजनपाल यांनी धीर एकवटून डॉ. कलाम यांनाच उलट प्रश्न विचारला, "सर, आधी तुम्ही सांगा, भविष्यात लोकांनी तुमची आठवण कशी ठेवावी?"
कलाम साहेबांना वाईट वाटू नये म्हणून सृजनपाल यांनी लगेच चार पर्याय पुढे ठेवले :
पर्याय A: स्पेस मॅन ऑफ इंडिया
पर्याय B : मिसाईल मॅन ऑफ इंडिया
पर्याय C : न्यूक्लियर मॅन ऑफ इंडिया
पर्याय D : पीपल्स प्रेसिडेंट
हे ऐकून डॉ. कलाम यांच्या चेहऱ्यावर मनमोकळे हास्य आले. त्यांनी अत्यंत शांतपणे सांगितले, "सृजन, माझे उत्तर या चार पर्यायांपैकी एकही नाही!"
सृजनपाल चक्रावून गेले. मग कलाम साहेब पुढे म्हणाले, "या प्रश्नाचा आणखी एक पर्याय आहे, पर्याय E. 'E' म्हणजे एज्युकेशन (Education). जगाने माझी आठवण एक शिक्षक म्हणून ठेवावी, हीच माझी एकमेव इच्छा आहे!"
शिक्षकाचे स्थान सर्वांत उच्च
शिक्षक का बनायचे आहे, हे सांगताना डॉ. कलाम म्हणाले, "शिक्षक दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाशाची ज्योत पेटवतो. शिक्षकच राष्ट्राची उभारणी करतात. डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभियंता, राजकीय नेते आणि सनदी अधिकारी घडवण्याचे काम शिक्षकच करत असतात. द्रोणाचार्यांनीच अर्जुनाला घडवले होते, म्हणून राष्ट्राने माझी आठवण एक शिक्षक म्हणून ठेवावी असे मला वाटते."
राष्ट्रपती भवनातून बाहेर पडल्या पडल्या, डॉ. कलाम दुसऱ्याच दिवशी चेन्नईला रवाना झाले. शिकवणे हा त्यांचा खरा श्वास होता. आयआयएम शिलाँग, आयआयएम अहमदाबाद, आयआयएम इंदूर, अण्णा युनिव्हर्सिटी अशा अनेक ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अखेरच्या क्षणापर्यंत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत राहिले. २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम शिलाँगमध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पद, प्रतिष्ठा अन् यश एका बाजूला, पण एका शिक्षकाचा सन्मान सर्वतोपरी असतो, हा धडा कलाम साहेबांचे आयुष्य आपल्याला शिकवून जाते.