एकही मुस्लिम नसलेल्या महाराष्ट्रातील गावाने जपलीये मोहरमची परंपरा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
महाराष्ट्रातील बेरडवाडीतील रामोशी समुदायाकडून मोहरमच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन
महाराष्ट्रातील बेरडवाडीतील रामोशी समुदायाकडून मोहरमच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन

 

भक्ती चाळक

मोहरम हा इस्लामी कॅलेंडरमधील पहिला महिना. त्याच्या पहिल्या दहा दिवसांत करबलाची घटना आणि प्रेषित मुहम्मद यांचे नातू इमाम हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांना यांना वीरमरण आल्याने हा काळ मातमचा म्हणजे दुःखाचा समजला जातो.  विशेषतः शिया समुदायामध्ये मोहरमच्या दहाव्या दिवशी मातम करण्याची प्रथा आहे. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात सुन्नी मुस्लीमसुद्धा पारंपरिक पद्धतीने मोहरम करतात. महाराष्ट्रातील मोहरमचा विशेष म्हणजे यामध्ये हिंदू समुदायही मोठ्या संख्येने सहभागी होतो.  

महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात हिंदू-मुस्लीम समाज एकत्र येवून शेकडो वर्षांपासून मोहरममध्ये सहभागी होतात. मात्र महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे एकही मुस्लिम नाही तर रामोशी (बेरड) समुदायाकडून मोहरम केला जातो. हे गाव म्हणजे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक आणि स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांचा शौर्यवारसा रक्तामध्ये बाळगणाऱ्यांची बेरडवाडी (भुसणीवाडी)!

इतिहासात आपल्या पराक्रमाने अजरामर ठरलेल्या रामोशी समाजाची ही वस्ती. या गावाची खरी ओळख म्हणजे, इथे एकही मुस्लिम घर नसतानाही पिढ्यानपिढ्या मोहरमचा लोकोत्सव केला जातो. हा उत्सव गेल्या कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांच्या सांस्कृतिक एकतेचा भाग बनला आहे. 

मस्जिद नसतानाही घुमतोय इमाम साहेबांचा जयघोष!
भुसणी-भुसणीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या या गावात अनेक वर्षांपासून एक वेगळीच रीत पाहायला मिळते. मोहरमच्या काळात संपूर्ण गाव बारा इमाम आणि काशीम इमाम साहेबांच्या भक्तीत लीन होतं. विशेष म्हणजे, पीर पूजनाचा विधी अगदी योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी शेजारच्या गावातून मुस्लिम मुजावरांना सन्मानाने बोलावलं जातं. त्यांच्या हस्ते इस्लाम धर्मपद्धतीनुसार विधी केले जातात. तसेच तरुण एकत्रित येऊन कर्बलचा (लेजीम) खेळ खेळतात. परंपरेचा मान राखणारा सर्वधर्म समभावाचा हा संदेश खरोखरच कौतुकास्पद आहे.

लोकोत्सवाला सामाजिक परिवर्तनाची जोड
रामोशी समाजाचा इतिहास नेहमीच अन्यायाविरुद्ध लढण्याचा आणि पराक्रमाचा राहिला आहे. नेमका हाच वारसा जपत भुसणीवाडीतील ग्रामस्थांनी लोकोत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड दिली आहे. मोहरमच्या निमित्ताने गावात समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजू रुग्णांना मदत केली जाते. समाजप्रबोधनपर गीतं आणि लोकनृत्यांचं सादरीकरण होतं. नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर थेट भाष्य केलं जातो.

लोकोत्सवाच्या दिवसांत गावात सलोख्याचा माहोल असतो. सगळी कुटुंब एकत्र येतात आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. नोकरी-धंद्यासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात गेलेली तरुण मंडळीही या काळात आवर्जून गावी परततात. त्यामुळे संपूर्ण बेरडवाडीत कौटुंबिक मेळाव्याचं रूप पाहायला मिळतं.

या मोहरमचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बेरडवाडीतील उमेश भोकले या तरुणाने अनोख्या परंपरेविषयीचे दररोजचे व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. ‘आवाज-द-व्हॉईस’ला प्रतिक्रिया देताना उमेश सांगितले की,  “या परंपरेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी मी प्रत्येक दिवसाचा व्हिडीओ बनवला आणि तो माझ्या इंस्टाला शेअर केला. लाखो लोकांनी शेअर केले आणि लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया देखील आल्या.”

उमेश पुढे म्हणाला की, “गावात एकही मुस्लीम नसताना माझ्या गावाने ही प्रथा अजूनही जिवंत ठेवलीय याचा मला अभिमान आहे. आणि आमची पिढी सुद्धा ही परंपरा अशीच पुढे घेऊन जाईल.”  

या अनोख्या परंपरेबद्दल बोलताना बेरडवाडीचे ग्रामस्थ आणि श्री षण्मुखेश्वर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अंकुश मंडले मनापासून सांगतात, "आमच्या बेरडवाडीतील मोहरम उत्सव म्हणजे, आमच्या गावाच्या एकतेची ताकद आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमचे पूर्वज ही परंपरा जपत आलेत, आज आम्ही ती पुढे नेतोय. आमच्या गावात जातीभेदाला काडीइतकीही जागा नाही. सर्वांसाठी ईश्वर एकच आहे, याच भावनेतून आम्ही सगळे एकत्र येतो. बारा इमाम आणि काशीम इमाम साहेबांवर गावाची अथांग श्रद्धा आहे."

गावचे उपसरपंच दशशथ मंडले यांनी गावाची ओळख सांगताना म्हटलं, "खरे तर आमच्या गावाला तीन नावं आहेत. लोक याला अनंतपूर, भुसणीवाडी आणि बेरडवाडी म्हणून ओळखतात. या गावात मोहरममुळे एकमेकांमधील प्रेम आणि बंधुभाव आणखी वाढीस लागलाय. गावात एकही मुस्लिम घर नसतानाही सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन पीर बाबांचा उत्सव साजरा करतात, हीच आमच्या गावाची खरी ओळख आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही रीत आमच्या गावचा अभिमान आहे."

महसूल सेवक शिवशंकर मंडले यांनी सांगितलं की, "बारा इमाम आणि काशीम इमाम साहेब हे आमच्या गावचे मुख्य श्रद्धास्थान आहेत. गावातील कोणताही माणूस चांगल्या किंवा महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना आधी इमाम साहेबांचं नाव घेतो, त्यांना वंदन करतो. त्यांच्या कृपेने प्रत्येक काम फत्ते होतं, अशी आमची श्रद्धा आहे. मोहरमच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले सगळे लोक घरी येतात. त्यामुळे हा सण आमच्यासाठी भावनिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक बनला आहे."

इतिहास पराक्रमाचा असो वा सलोख्याचा, भुसणीवाडीने नेहमीच आपली आदर्श ओळख जपली आहे. एकही मुस्लिम घर नसतानाही, इस्लामच्या पवित्र रीतीरिवाजांचा आदर राखत केला जाणारा हा मोहरम आजच्या पिढीसाठी मोठी प्रेरणा आहे. विखुरलेल्या समाजाला एकत्र आणणारा हा लोकोत्सव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभव आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter