हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पिण्याचे पाणी मोफत द्यावे लागणार; महाराष्ट्र एफडीएचे नवीन आदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 58 m ago
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मोफत पिण्याचे पाणी सक्तीचे; महाराष्ट्र एफडीएचे कडक आदेश
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मोफत पिण्याचे पाणी सक्तीचे; महाराष्ट्र एफडीएचे कडक आदेश

 

मुंबई 

महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्री केंद्रांसाठी एक सर्वसमावेशक आदेश जारी केला आहे. यानुसार, आता प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना पिण्याचे पाणी मोफत पुरवणे अनिवार्य करण्यात आले आहे.

एफडीएचे नवीन आदेश

एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर हे कडक आदेश लागू करण्यात आले आहेत. सुरक्षित अन्न आणि पाणी मिळणे हा ग्राहकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करत, आता कोणत्याही हॉटेलला ग्राहकांवर बाटलीबंद पाणी विकत घेण्याची सक्ती करता येणार नाही. एवढेच नव्हे तर, मोफत पाणी उपलब्ध असल्याचा फलक ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे हॉटेल व्यावसायिकांना सक्तीचे आहे.

अन्नासुरक्षेचे नवीन नियम

केवळ पाणीच नव्हे, तर खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी एफडीएने अनेक कडक नियमावली लागू केली आहे. वृत्तपत्रातून अन्नपदार्थ वाढण्यास बंदी घालण्यात आली असून, फक्त फूड-ग्रेड पॅकेजिंग वापरणे बंधनकारक आहे. तसेच, स्वयंपाकाचे तेल वारंवार वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मोठ्या रेस्टॉरंट साखळ्यांना आता मेनू कार्डवर कॅलरीज, संभाव्य ॲलर्जी आणि शाकाहारी-मांसाहारी असल्याची माहिती स्पष्टपणे देणे आवश्यक आहे.

या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी आणि एफओएसटीएसी (FoSTaC) प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. वार्षिक ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना दरवर्षी 'फूड सेफ्टी ऑडिट' करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर कठोर दंडात्मक कारवाई आणि परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा एफडीएने दिला आहे.