राहुल गांधींकडून मानहानी खटल्यात खेद व्यक्त; मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अर्जाद्वारे दिली स्पष्टीकरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाच्या मानहानी खटल्यात राहुल गांधींनी व्यक्त केला खेद
शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाच्या मानहानी खटल्यात राहुल गांधींनी व्यक्त केला खेद

 

जबलपूर 

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे पुत्र कार्तिकेय सिंह यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात खेद व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्या वकिलांनी बुधवारी उच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला असून, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचे २०१७ मधील ते वक्तव्य कार्तिकेय सिंह यांच्याशी संबंधित नव्हते.

मानहानी खटल्याची पार्श्वभूमी

कार्तिकेय सिंह यांनी भोपाळ येथील खासदार-आमदारांच्या विशेष न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. २०१८ मध्ये झाबुआ येथे झालेल्या एका निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधींनी 'पनामा पेपर्स' लीक प्रकरणाचा उल्लेख करताना कार्तिकेय सिंह यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला होता, ज्यामुळे आपली बदनामी झाली, असा आरोप कार्तिकेय यांनी केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी भोपाळ न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते.

उच्च न्यायालयात पुढील सुनावणी

भोपाळ न्यायालयाचे समन्स रद्द करण्यासाठी राहुल गांधींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती प्रमोद कुमार अग्रवाल गुरुवारी सुनावणी करणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, याचिकाकर्त्याने बुधवारी कनिष्ठ न्यायालयाचे रेकॉर्ड्स सादर केले आहेत. तक्रारदार कार्तिकेय सिंह यांच्यावतीने वकील संकल्प कोचर यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. राहुल गांधींनी आता खेद व्यक्त केल्यामुळे या प्रकरणाच्या कायदेशीर प्रक्रियेला नवी दिशा मिळाली आहे.