तेहरान
इराणमधील सुरक्षा स्थितीत अलीकडच्या काळात सुधारणा झाली असली, तरी भारतीय नागरिकांनी तेथे अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करणे टाळावे, असा सल्ला भारतीय दूतावासाने दिला आहे. दूतावासाने बुधवारी यासंदर्भात एक सुधारित मार्गदर्शक सूचना (ॲडव्हायझरी) जारी केली आहे.
भारतीय मिशनने म्हटले आहे की, आम्ही इराणमधील सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. ताज्या सकारात्मक घडामोडींनंतरही परिस्थिती पूर्णपणे सामान्य होईपर्यंत भारतीयांनी इराणचा अनावश्यक प्रवास करणे टाळावे. जे भारतीय नागरिक सध्या इराणमध्ये वास्तव्यास आहेत किंवा ज्यांना अपरिहार्य कारणांमुळे तेथे प्रवास करणे भाग आहे, त्यांनी उच्च स्तरीय सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी स्थानिक घडामोडींकडे लक्ष ठेवावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही दूतावासाने म्हटले आहे. तसेच, सर्व भारतीय नागरिकांनी त्यांच्या तपशीलांची नोंद लवकरात लवकर भारतीय दूतावासात करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. कोणत्याही मदतीसाठी दूतावासाच्या वेबसाइटवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियमित अपडेट्स तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल आयडी देखील उपलब्ध करून दिले आहेत.
२८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियातील संघर्षानंतर भारताने वेळोवेळी अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यात सामंजस्य करार झाल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, ही पहिलीच सुधारित ॲडव्हायझरी आहे.