कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचा अहवाल; खलिस्तानी अतिरेक्यांकडून कॅनडाच्या सुरक्षेला मोठा धोका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडाच्या 'राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका' असल्याचे घोषित केले आहे. हे गट कॅनडामधील संस्थांचा वापर करून आपला हिंसक अजेंडा राबवत असल्याचे एका अधिकृत अहवालात नमूद करण्यात आले आहे.

'कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस'ने (CSIS) शुक्रवारी त्यांच्या २०२५ च्या सार्वजनिक अहवालात ही माहिती दिली. या अहवालानुसार, कॅनडामध्ये राहणारे खलिस्तानी अतिरेकी (CBKE) हिंसक कारवायांमध्ये गुंतले असून त्यांच्यामुळे कॅनडा आणि कॅनडाच्या हिताला मोठा धोका निर्माण झाला आहे. हे अतिरेकी कॅनडातील नागरिकांच्या संपर्कात असून तेथील संस्थांचा गैरवापर करत आहेत. ते सामान्य नागरिकांकडून निधी गोळा करतात आणि तोच निधी नंतर हिंसक कारवायांसाठी वळवला जात असल्याचे उघड झाले आहे.

एअर इंडिया बॉम्बस्फोटाचा संदर्भ

भारतामध्ये खलिस्तानी गटांना त्यांच्या फुटीरतावादी कारवायांमुळे दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. कॅनडाच्या अहवालात एअर इंडिया फ्लाईट १८२ वरील बॉम्बस्फोटाच्या ४० व्या स्मृतीदिनाचाही संदर्भ देण्यात आला आहे. या भीषण हल्ल्यातील संशयित हे खलिस्तानी गटाचेच सदस्य होते. या घटनेत ३२९ लोकांचा बळी गेला होता, ज्यात बहुतांश कॅनेडियन नागरिक होते. कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.

भारत-कॅनडा संबंध सुधारण्याचे प्रयत्न

अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, खलिस्तानच्या निर्मितीसाठी केवळ शांततापूर्ण मार्गाने समर्थन करणे म्हणजे अतिरेक नाही. परंतु, जे मूठभर लोक कॅनडाचा वापर बेस म्हणून करून प्रामुख्याने भारतात हिंसाचार पसरवण्याचे, कट रचण्याचे किंवा निधी गोळा करण्याचे काम करतात, त्यांना खलिस्तानी अतिरेकी मानले जाईल.

२०२३ मध्ये कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप केल्याने दोन्ही देशांचे संबंध अत्यंत ताणले गेले होते. भारताने हे आरोप स्पष्टपणे फेटाळले होते. मात्र, गेल्या वर्षी मार्क कार्ने यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.