दौलताबादच्या शिबिरातून मुस्लिम युवकांनी दिला समाज परिवर्तनाचा नारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
दौलताबाद येथील सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेच्या राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिरातील तरुण आणि पदाधिकारी
दौलताबाद येथील सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेच्या राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिरातील तरुण आणि पदाधिकारी

 

अल्फिया शेख

महाराष्ट्रातील मराठी मुस्लीम तरुणांची एक संघटना नावारूपाला येत आहे. ती म्हणजे-'सकल मुस्लिम युवक, महाराष्ट्र' . विविध उपक्रमांच्या माध्यमातून संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरात समाजाहिताचं कार्य करत आहेत. ‘सामाजिक अस्तित्वासाठी, संवैधानिक अधिकारांसाठी युवकांची वज्रमूठ’ ही त्यांची ओळख आणि त्यांचं उद्दिष्ट आहे.

या संघटनेचं दोन दिवसीय राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिर नुकतंच दौलताबादमध्ये संपन्न झालं. प्रदेशाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिराने मुस्लिम समाजाच्या विचारसरणीत सकारात्मक बदलाची नांदी घडवून आणली आहे.

सोशली स्मार्ट तरुण

शिबिराच्या पहिल्या दिवशी सोशल मीडिया आणि प्रशासकीय समन्वय या विषयांवर तज्ज्ञांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. ज्येष्ठ पत्रकार जिशान शेख यांनी सोशल मीडियाचा वापर हा वाद घालण्यासाठी नसून संघटनेची ध्येयधोरणं आणि लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करावा, असा मोलाचा सल्ला दिला. वाद टाळून संयमी आणि अभ्यासपूर्ण भाषेत आपली बाजू मांडण्याचं आवाहन त्यांनी केलं.

सातारा येथील आमिर शेख यांनी तर प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. "प्रशासन आपलं शत्रू नसून सेवेकरी आहेत. त्यांच्याशी नेहमी सहकार्याने वागलं पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा करून लोकांची कामं करून घेतली पाहिजेत," असं ते म्हणाले.

ख्वाजा गरीब नवाज ट्रस्टचे अध्यक्ष युसुफ अन्सारी यांनी कार्यकर्त्यांना, शासकीय योजना आणि निधीबाबत थेट प्रश्न विचारणारे जागरूक नागरिक बनण्याचा सल्ला दिला.

सामाजिक कार्यकर्ते ॲड. अभय टकसाळ यांनी, ही संघटना एका धर्मापुरती मर्यादित न राहता शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर लढणारी भारतीय युवकांची संघटना बनावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

एकाच छताखाली विविध पक्षांचे पदाधिकारी

या शिबिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राजकीय मतभेदांना मिळालेली तिलांजली. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी जोडलेले होते. भाजपपासून ते एमआयएमपर्यंतच्या सर्वच पक्षांचे मुस्लिम पदाधिकारी इथे एकाच छताखाली बसले होते. मात्र कुठेही पक्षीय मतभेद किंवा वाद पाहायला मिळाला नाही. सर्वांनीच पक्षाच्या वर उठून, सामाजिक हितासाठी आणि घटनात्मक चौकटीत राहून एकत्र काम करण्याचा संकल्प केला.

संमेलनात अस्खलित मराठी

या दोन दिवसीय संमेलनाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. मुस्लिम समाजाचं एखादं संमेलन किंवा शिबिर म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो उर्दू किंवा दखनी भाषेचा वापर. परंतु दौलताबादच्या या संपूर्ण कार्यक्रमात अस्खलित मराठी भाषेचा वापर झाला.

संपूर्ण महाराष्ट्रातून, विशेषतः ग्रामीण भागातून आलेले तरुण इथे मराठीत आपले विचार मांडत होते, चर्चा करत होते. एरवी उर्दू किंवा हिंदीत होणाऱ्या अशा चर्चा इथे मातृभाषेत रंगल्या होत्या.

आजवर मुस्लिमांची राजकीय भूमिका नेहमीच ठराविक पक्षांभोवती फिरताना दिसल्याची छबी समाजात आहे. मात्र कोणताही पक्ष आपला मित्र किंवा शत्रू नसतो. जो समाजाच्या हिताचं काम करेल, त्याला पक्षाच्या पलीकडे जाऊन पाठिंबा दिला जाईल, यावर संमेलनात एकमत झालं. या माध्यमातून नव्या दमाच्या तरुणांनी राजकारणाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दिला.

महिलांचा सहभाग

या कार्यक्रमात महिलांचा सहभाग तुरळक होता. त्यावरून मुंबईवरून आलेल्या ॲड. आस्मा शेख यांनी व्यासपीठावर उपस्थित पुरुषांचे चांगलेच कान टोचले. महिलांचा सहभाग नावापुरता नसावा.  त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर तबस्सुम पटेल यांनी महिलांचं आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला. तर परवेज खान यांनी टीम वर्कवर भाष्य केलं.

नव्या विचारांची आश्वासक वाटचाल

कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी आपल्या समारोपीय भाषणात संघटनेचा ठराव मंजूर केला. "ही संघटना सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी काम करेल. समाजाच्या प्रत्येक प्रश्नांवर कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने लढा दिला जाईल," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांविरोधात घटनात्मक मार्गाने आवाज उठवणं, हक्कांसाठी लढणं आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं, यांसारख्या आश्वासक आणि नव्या विचारांची शिदोरी घेऊन हे तरुण आपापल्या वाटेने निघाले. महाराष्ट्रभरातील मुस्लिम तरुणांची ही धडपड सामाजिक ताण्याबाण्याला नक्कीच नवी दिशा देणारी ठरेल.

राज्यभरातील मान्यवरांची उपस्थिती

प्रदेश उपाध्यक्ष फहीम शेख, सचिव अख्तर हमीद शेख, मराठवाडा अध्यक्ष दानिश कुरैशी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मिरान पठाण, प्रदेश संघटक मुदस्सिर शेख, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकसूद भादी, उद्योजक इरफान शेख, अजमेर मणियार यांच्यासह राज्यातील अनेक जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदेश प्रवक्ते रमजान शेख यांनी केलं.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter