राहुल गांधींनी केले 'छात्रों की गूंज' मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी

 

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्यासाठी 'छात्रों की गूंज' ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. पेपर लीक, परीक्षेतील गोंधळ आणि वाढते शैक्षणिक शुल्क यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी शिक्षण प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या थेट सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक हक्काचे व्यासपीठ ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेद्वारे विद्यार्थी आपले विचार मांडू शकतील आणि सरकारला सादर करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेत (Petition) सहभाग घेऊ शकतील. "जर तुम्ही पेपर लीक, परीक्षेतील समस्या किंवा उच्च शुल्कामुळे त्रस्त असाल आणि या शिक्षण प्रणालीने तुमची स्वप्ने मोडीत काढली असतील, तर 'छात्रों की गूंज' हा तुमचा आवाज आहे," असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

शिक्षण व्यवस्था 'रिजेक्शन सिस्टम'

राहुल गांधी यांनी बुधवारी राजस्थानमधील कोटा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर त्यांनी आज या मोहिमेची अधिकृत घोषणा केली. कोटा येथील रॅलीमध्ये त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेला 'निवड प्रणाली' (Selection System) नसून ती 'नकार प्रणाली' (Rejection System) असल्याचे म्हटले होते. ही व्यवस्था मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा टाकणारी आणि विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक तणाव निर्माण करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती मुक्त करण्याऐवजी त्यांना विशिष्ट चौकटीत बांधून ठेवल्याची टीकाही त्यांनी केली. "हे केवळ राजकीय नसून एक राष्ट्रीय संकट आहे," असे म्हणत त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. या मोहिमेचा उद्देश शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, वाजवी शुल्क आणि सन्मानजनक रोजगार संधी उपलब्ध करून देणे हा आहे. अधिक स्वाक्षऱ्या म्हणजे अधिक मोठा आवाज, असे म्हणत त्यांनी जास्तीत जास्त युवकांना या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे.




Latest News