नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२३ जानेवारी २०२६) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. नेताजी हे निर्भीड नेतृत्व आणि अढळ देशभक्तीचे मूर्तिमंत प्रतीक होते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या गौरव केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टच्या मालिकेत मोदींनी नेताजींचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी त्यांच्या सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली, तसेच मागील सरकारांनी नेताजींचे योगदान पुसून टाकण्याचे प्रयत्न केल्याची टीकाही केली.
"नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त, जो दिवस आपण 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करतो, आपण त्यांच्या अदम्य धैर्याचे, संल्पाचे आणि देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करतो. त्यांचे आदर्श बलशाली भारत घडवण्यासाठी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील," असं पंतप्रधान म्हणाले. नेताजींनी आपल्याला नेहमीच प्रेरणा दिली असल्याचं सांगताना मोदींनी आठवण करून दिली की, २००९ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नेताजींच्या सन्मानार्थ 'ई-ग्राम विश्वग्राम' योजना हरिपुरा येथून सुरू केली होती. ज्या रस्त्यावरून नेताजी प्रवास करायचे, त्याच रस्त्यावरून हरिपुराच्या जनतेने आपली मिरवणूक काढली होती, तो क्षण कधीही विसरू शकणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.
पंतप्रधानांनी यावेळी मागील सरकारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "दशकांनुशये देशावर राज्य करणाऱ्यांच्या अजेंड्यात नेताजींचे गौरवशाली योगदान बसत नव्हते, म्हणूनच त्यांना विसरण्याचे प्रयत्न झाले. पण आमची श्रद्धा वेगळी आहे. आम्ही प्रत्येक शक्य संधीला त्यांचे जीवन आणि आदर्श लोकांपर्यंत पोहोचवले आहेत." नेताजींशी संबंधित गुप्त फायली आणि दस्तऐवज सार्वजनिक करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्या सरकारने घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
२०१८ सालातील आठवणींना उजाळा देताना मोदी म्हणाले की, लाल किल्ल्यावर आझाद हिंद सरकारच्या स्थापनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करणे आणि अंदमान निकोबारमधील बेटांचे नामकरण करणे हे महत्त्वाचे टप्पे होते. रॉस आयलंडचे नाव बदलून 'नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप' करण्यात आले. तसेच, इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा बसवण्याचा निर्णय हा वसाहतवादी मानसिकता झुगारून देण्याचे आणि नेताजींप्रती आदर व्यक्त करण्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. लाल किल्ल्यातील 'क्रांती मंदिर' संग्रहालयात नेताजींनी परिधान केलेली टोपी आणि आझाद हिंद फौजेचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यात आला असून तो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.