दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील खटवाडा त्रालच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील एक साधी ताडपत्रीची झोपडी आशा आणि चिकाटीचे प्रतीक बनली आहे. काश्मीरच्या बदलत्या वातावरणात टुमदारपणे उभा असलेला परंतु तात्पुरत्या स्वरूपाचा हा निवारा आहे खानाबदोश बकरवाल समुदायातील शबनम सादिक या तरुणीचा.
शबनम सादिक हिने जेके बोसच्या बारावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४६३ गुण मिळवत मोठ्या अडथळ्यांवर मात केली. तिची कहाणी धैर्य, चिकाटी आणि अथक महत्वाकांक्षेची आहे. ही कहाणी काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी आणि समुदायांसाठी प्रेरणा ठरत आहे.
खडतर प्रवास
शबनमचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. तिचा खानाबदोश बकरवाल हा समुदाय पारंपरिकपणे मेंढपाळ व्यवसाय करतो. जम्मू-काश्मीरच्या डोंगरांमध्ये हे लोक आपल्या जनावरांसह हंगामी स्थलांतर करतात.
शबनमच्या कुटुंबाचे नेतृत्व तिचे वडील मोहम्मद सादिक बोकडा करतात. तिच्या कुटुंबाला रोजच्या जगण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. मोहम्मद सादिक मजुरी करून तुटपुंजी कमाई करतात. त्यांचे सध्याचे घर ताडपत्रीचे असून हिवाळ्याच्या थंडीपासून किंवा पावसाळ्याच्या सततच्या पावसापासून फारसे संरक्षण देत नाही. परंतु घराच्या या नाजूक भिंतींमध्ये शबनमने आपल्या शैक्षणिक यशाची स्वप्ने जोपासली.
शबनमच्या इतर साथीदारांपेक्षा तिची परिस्थिती वेगळी होती. तिच्याकडे खासगी शिकवणी, अभ्यासासाठी स्वतंत्र खोली किंवा इंटरनेट नव्हते. आजच्या काळात शैक्षणिक यशासाठी ही साधने आवश्यक मानली जातात. तिचा अभ्यासाचा एकमेव ठिकाण होता तिची ताडपत्रीची झोपडी. तिथे अनेक गोष्टी तिचे लक्ष विचलित करायच्या. शांतता ही तिच्यासाठी दुर्मीळ होती. काश्मीरच्या बदलत्या हवामानाने तिची दिनचर्या अनेकदा खंडित केली. घराच्या छतातून पाणी गळायचे, थंड हवेमुळे लक्ष केंद्रित करणे कठीण व्हायचे. तरीही अशा परिस्थितीत शबनमची जिद्द कायम राहिली.
शबनमची शैक्षणिक वाटचाल तिच्या अटळ चिकाटी आणि परिवर्तनाच्या जोरावर पुढे गेली. स्थानिक सरकारी शाळेत ती शिकली. तिच्या शिक्षकांवर आणि पाठ्यपुस्तकांवर ती पूर्णपणे अवलंबून होती. शिकवणी किंवा ऑनलाइन साधनांशिवाय तिने कठोर अभ्यास केला. उपलब्ध साधनांचा तिने पुरेपूर उपयोग केला. तिचे वडील मोहम्मद सादिक आर्थिक चणचणीत होते. परंतु त्यांनी तिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. परिस्थिती कितीही बिकट असली तरी शिक्षण चालू ठेवण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले.
भावुक होत शबनम म्हणाली, “मी ताडपत्रीच्या तंबूत अभ्यास केला. कधी आत पाऊस यायचा. कधी थंडीमुळे पेन धरणे कठीण व्हायचे. पण मला पुढे जायचे होते." असे ती म्हणाली. अशा परिस्थितीत लक्ष केंद्रित करण्याची तिची क्षमता तिच्या मानसिक ताकदीचा आणि ध्येयाचा पुरावा आहे.
बकरवाल समुदायाला सामाजिक-आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. शबनमची यशोगाथा यामुळे अधिक खास बनली. खानाबदोश समुदायांना शिक्षणाची संधी मर्यादित असते. अनेक मुले कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शाळा सोडतात. विशेषतः मुलींसाठी सामाजिक अपेक्षा आणि लहान वयात लग्नाचा दबाव शैक्षणिक प्रगतीला खीळ घालतो. शबनमच्या जिद्दीने या सर्व बंधनांना आव्हान दिले. चिकाटी आणि मेहनत अडथळ्यांवर मात करू शकते, हे तिने दाखवले.
शबनमची कहाणी काश्मीरसारख्या भागात विशेष महत्त्वाची आहे. या भागाने गेल्या काही वर्षांत सुरक्षा आणि सामाजिक-राजकीय अस्थिरतेच्या अनेक आव्हानांचा सामना केला आहे. निकाल जाहीर होण्याच्या काही दिवस आधी, २२ एप्रिल २०२५ ला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. या घटनेत पुलवामाचा उल्लेख बातम्यांमध्ये झाला. अशा अस्थिरतेतही शबनमचे यश आशेचा किरण बनले. व्यक्तिगत आणि प्रादेशिक अडचणींवर मात करण्याची ताकद तिने दाखवली.
कुटुंब आणि समुदायाची साथ
शबनमच्या यशात तिच्या वैयक्तिक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. परंतु तिच्या कुटुंबाची आणि समुदायाची साथ महत्त्वाची ठरली. आर्थिक अडचणी असूनही तिच्या वडिलांनी तिला भावनिक आधार दिला. त्यांनी तिला पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
तिच्या सरकारी शाळेतील शिक्षकांनीही मोठी भूमिका बजावली. त्यांनी तिला मार्गदर्शन केले. तिच्यासाठी प्रगतीचा मार्ग मोकळा केला. शैक्षणिक सुविधा मर्यादित असलेल्या भागात अशा शिक्षकांचे समर्पण शबनमसारख्या प्रतिभांना घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
तिच्या कहाणीने बकरवालसारख्या उपेक्षित समुदायांसाठी अधिक पाठबळाची गरज अधोरेखित केली. कार्यकर्ते आणि शिक्षकांनी शिक्षणाची अधिक संधी, चांगल्या सुविधा आणि शिष्यवृत्तीची मागणी केली. खानाबदोश आणि वंचित समुदायांतील मुलांना स्वप्ने साकारण्यासाठी योग्य संधी मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शबनमला मिळालेले यश या समुदायांतील मुलांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रेरणादायी प्रवास
शबनम सादिकचा प्रवास इथेच थांबलेला नाही. बारावीचा निकाल तिच्या मोठ्या स्वप्नांकडे टाकलेले पहिले पाऊल आहे. तिने आपल्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले नाही. पण तिच्या शैक्षणिक कामगिरीवरून ती वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा अन्य क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ शकते, हे स्पष्ट आहे. ती तिचे आणि कुटुंबाचे आयुष्य बदलू शकते.
शबनमची ताडपत्री एकेकाळी अडचणींचे लक्षण होता, परंतु आता तिच्या यशाचा पुरावा बनला आहे. कठीण परिस्थितीही महत्वाकांक्षेचा प्रकाश कमी करू शकत नाही, हे ती दाखवते. तिची कहाणी पारंपरिक रूढींना आव्हान देत आहे. तसेच समुदायांना प्रेरणा तर देतेच परंतु नव्या पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ देते.