इजिप्तमध्ये आयोजित गाझा शांतता परिषदेत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले, तेही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत. या अनपेक्षित घटनेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गाझा युद्धविराम यशस्वी झाल्यानंतर आयोजित या परिषदेत बोलताना, अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, "भारत एक महान देश आहे आणि त्याचे नेतृत्व माझे एक खूप चांगले मित्र करत आहेत. त्यांनी अप्रतिम काम केले आहे." पंतप्रधान मोदी या परिषदेला उपस्थित नसतानाही, ट्रम्प यांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी, त्यांच्या मागे उभे असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे पाहून ट्रम्प म्हणाले, "मला वाटते की, पाकिस्तान आणि भारत भविष्यात खूप चांगल्या प्रकारे एकत्र नांदतील." इतकेच नाही, तर त्यांनी शरीफ यांच्याकडे वळून थेट प्रश्न विचारला, "बरोबर ना?" यावर शाहबाज शरीफ केवळ हसले आणि त्यांनी होकारार्थी मान डोलावली.
या परिषदेत, शाहबाज शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तानमधील आण्विक युद्ध टाळल्याबद्दल आणि गाझामध्ये शांतता प्रस्थापित केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची शिफारस केली.
पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीतही ट्रम्प यांनी त्यांची प्रशंसा करणे आणि त्याच वेळी शाहबाज शरीफ यांना भारत-पाकिस्तान संबंधांवर प्रश्न विचारणे, या घटनेची आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.