महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १२ जागांसाठी मतदानाला सुरुवात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १२ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १२ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू

 

मुंबई 

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या १२ जागांसाठी आज गुरुवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

महायुतीची पाच जागांवर बिनविरोध निवड

राज्यात एकूण १७ जागांसाठी निवडणूक अधिसूचित करण्यात आली होती, परंतु महायुतीच्या उमेदवारांनी ५ जागा आधीच बिनविरोध जिंकल्या आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अरुण लाखाणी (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली), राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे (पुणे) आणि अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), तसेच शिवसेनेचे रवींद्र फाटक (ठाणे) आणि दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ) यांचा समावेश आहे. त्यामुळे आता उर्वरित १२ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे.

प्रमुख मतदारसंघांत चुरशीची लढत

सातारा-सांगली मतदारसंघात भाजपने धैर्यशील कदम यांना, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) ने अभयसिंह जगताप यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते मैदानात उतरल्याने युतीसमोर पेच निर्माण झाला होता, मात्र वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर ही चुरस काहीशी कमी झाली आहे.

नांदेड आणि उस्मानाबाद-लातूर-बीड या मतदारसंघांतही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, जसे की महानगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदांचे सदस्य मतदान करणार आहेत. विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर दबाव आणि पैशांचा वापर केल्याचा आरोप केला आहे, मात्र महायुतीच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या निवडणुकीचा निकाल २२ जून रोजी जाहीर होणार आहे.