सरफराज खान
डॉ. फिरदौस खान या एक इस्लामी विदुषी, कवयित्री, कथाकार, लेखिका, निबंधकार, पत्रकार, संपादक आणि अनुवादक आहेत. त्यांना ‘लफ़्ज़ों के जज़ीरे की शहज़ादी’ (शब्दांच्या साम्राज्याची राजकन्या) या नावाने ओळखले जाते. त्या जितक्या तीव्रतेने जीवनातील अडचणी मांडतात, तितक्याच नजाकतीने प्रेमाच्या रेशमी आणि मखमली भावना आपल्या शायरीतून व्यक्त करतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
त्यांची शायरी मनावर अशी काही ठसते की ती कधीही विस्मरणात जाऊ शकत नाही. त्यांचा एक-एक शब्द आत्म्यावर कोरला जातो. खूप कमी कलाकारांच्या नशिबात अशी कला असते. त्यांचे साहित्य म्हणजे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यातील पिंपळाची थंड सावली आहे, तहानलेल्या जमिनीवर पडणाऱ्या श्रावणाच्या रिमझिम सरी आहेत आणि हुडहुडी भरणाऱ्या थंडीतील हिवाळ्यातले कोवळे ऊबदार ऊन आहे.
फिरदौस यांचे साहित्य
डॉ. फिरदौस खान यांचा अध्यात्मावर विश्वास असून त्या सुफी संप्रदायाशी जोडलेल्या आहेत. त्या आपली आई दिवंगत खुशनुदी खान उर्फ चांदनी खान आणि वडील दिवंगत सत्तार अहमद खान यांना आपले आदर्श मानतात. त्यांनी 'फहम अल कुरआन' हा ग्रंथ लिहिला आहे. तो त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची कलाकृती (शाहकार) आहे.
त्या म्हणतात- "आमची आई खूप सात्विक आणि ईश्वराची भक्ती करणारी होती. आम्ही लहानपणापासूनच तिला प्रार्थना करताना बघत आलोय. तिला पाहून आमच्यातही भक्तीची आवड निर्माण झाली. तसेच खूप कमी वयात आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याची इच्छाही निर्माण झाली. फहम अल कुरआन लिहिताना मला या गोष्टीचीही जाणीव झाली की, आपण आपले आयुष्य नश्वर गोष्टींसाठी वाया घालवले नाही. खरं तर आपल्या आयुष्याचा उद्देश अल्लाहची इच्छा प्राप्त करणे हा आहे. माझे काम याच ध्येयापर्यंत पोहोचण्याचा रस्ता आहे आणि याच प्रयत्नांचा एक भाग आहे."

त्यांनी सुफी-संतांच्या जीवनावर आणि त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित 'गंगा-जमुनी संस्कृति के अग्रदूत' हे पुस्तक लिहिले आहे. ते २००९ मध्ये प्रभात प्रकाशन समूहाच्या 'ज्ञान गंगा'ने प्रकाशित केले. हे पुस्तक आजही चर्चेत आहे. भक्ती आणि सुफी-संतांच्या जीवन दर्शनावर पीएचडी करणारे संशोधक या पुस्तकाला आवर्जून पसंती देतात.
फिरदौस यांनी बालपणातच लिहायला सुरुवात केली होती. त्या सांगतात- "मी सहावीत असताना एक कविता लिहिली होती. आई-वडिलांना ती कविता ऐकवली, तेव्हा त्यांना ती खूप आवडली. वडिलांनी ती एका सायंदैनिकात दिली आणि ती तिथे प्रसिद्धही झाली. त्या कवितेचे खूप कौतुक झाले. अशा प्रकारे मग लिहिण्याचा आणि छापून येण्याचा सिलसिला सुरू झाला, जो आतापर्यंत सतत सुरू आहे. सायंदैनिकापासून सुरू झालेला हा प्रवास देश-विदेशातील वृत्तपत्रे आणि मासिकांपर्यंत पोहोचला आहे."
मीडियामधील कारकीर्द
डॉ. फिरदौस खान यांनी दूरदर्शन केंद्र, आकाशवाणी आणि देशातील प्रतिष्ठित वृत्तपत्रे व मासिकांमध्ये अनेक वर्षे काम केले आहे. त्या दूरदर्शन केंद्राच्या वृत्त विभागाच्या प्रख्यात संपादक आणि आकाशवाणीच्या मनोरंजन प्रसारक राहिल्या आहेत. त्या म्हणतात- "आकाशवाणीशी आमचे मनाचे नाते आहे. रेडिओ ऐकतच आम्ही मोठे झालो. नंतर रेडिओशी जोडले गेलो. रेडिओवर माझा पहिला कार्यक्रम २१ डिसेंबर १९९६ रोजी प्रसारित झाला होता. त्या दिवशी घरात सर्वजण किती आनंदी होते. वडिलांच्या आनंदाला तर पारावार उरला नव्हता.
रेडिओशी माझ्या कितीतरी सुंदर आठवणी जोडलेल्या आहेत. आजही रेडिओबद्दल तितकीच ओढ आहे. अशाच प्रकारे दूरदर्शनशी सुद्धा माझ्या सुंदर आठवणी जोडलेल्या आहेत. लहानपणी दूरदर्शन पाहायचो, तेव्हा कधी विचारही केला नव्हता की कधी मी स्वतः त्याचा भाग बनेन. नोव्हेंबर २००२ मध्ये निर्माता आणि साहाय्यक वृत्त संपादक म्हणून दूरदर्शनशी जोडले गेले. आयुष्यातील तो काळही खूप सुंदर आणि संस्मरणीय काळ होता."

याशिवाय त्यांनी अनेक न्यूज चॅनेलमध्येही योगदान दिले आहे. त्यांनी अनेक माहितीपट, टेलिव्हिजन नाटके आणि रेडिओ नाटके देखील लिहिली आहेत. त्यांच्या रचना प्रसिद्ध झाल्या नाहीत असे दैनिक क्वचितच असेल. त्या 'पैगामे-मादरे-वतन' या मासिकाच्या संपादक आणि 'वंचित जनता' या मासिकात संपादकीय सल्लागारही राहिल्या आहेत. सध्या त्या 'स्टार न्यूज एजन्सी'मध्ये संपादक आहेत.
मुशायरे आणि कवी संमेलन
डॉ. फिरदौस खान मुशायरे आणि कवी संमेलनांमध्येही सहभागी होत असतात. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायनाचे शिक्षणही घेतले आहे. त्या सांगतात- "सुप्रसिद्ध गीतकार गोपालदास नीरज यांच्या संपादनात निघणाऱ्या 'गीतकार' या साहित्यिक पत्रिकेत माझे गीत प्रकाशित झाले, तेव्हा दूरदूरवरून मुशायरे आणि कवी संमेलनांसाठी आमंत्रणे येऊ लागली. भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे आयोजित राष्ट्रीय कवी संमेलनात सहभागी होण्याची संधीही मला मिळाली. याशिवाय अनेक चर्चासत्रांमध्येही मी भाग घेतला."
कौतुक झाले, सन्मान मिळाले
उत्कृष्ट पत्रकारिता, कुशल संपादन आणि प्रतिभावान लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. न्यूज चॅनेल 'एबीपी न्यूज' द्वारे हिंदी दिनानिमित्त १४ सप्टेंबर २०१४ रोजी दिल्लीत साहित्यिक विषयांवरील लेखनासाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट ब्लॉगर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट'च्या 'प्रोफेशनल विमेन'स ॲडव्हायझरी बोर्ड' द्वारे २००५ सालातील यशस्वी महिलांच्या सूचीसाठी त्यांचे नामांकन करण्यात आले. शासकीय महाविद्यालय, हिसार द्वारे त्यांना सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'हरियाणा लघु वृत्तपत्र असोसिएशन' द्वारे त्यांना 'सर्वोत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार देण्यात आला. या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यामध्ये दोन मानद डॉक्टरेट पदव्यांचाही समावेश आहे. त्या म्हणतात "माझे शब्द माझ्या भावना आणि विचारांचे प्रतिनिधित्व करतात, कारण माझे शब्दच माझी ओळख आहेत. वाचक माझ्या लेखनाला पसंती देतात, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे."

फिरदौस यांनी केलेले अनुवाद
डॉ. फिरदौस खान यांना अनेक भाषांचे ज्ञान आहे. त्या उर्दू, हिंदी, पंजाबी आणि इंग्रजीमध्ये लिहितात. परदेशात त्यांच्या इंग्रजी कविताही आवडीने वाचल्या जातात. त्यांनी 'वंदे मातरम' गीताचा पंजाबी अनुवाद केला. तोही चांगलाच गाजला. त्या शासकीय महाविद्यालय, हिसारच्या 'भोर दा तारा' या पंजाबी मासिकाच्या संपादकही राहिल्या आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर एक कविता लिहिली होती, जिचे खूप कौतुक झाले.
फिरदौस यांचे ब्लॉग
फिरदौस या ब्लॉग सुद्धा लिहितात. 'फहम अल क़ुरआन' हा त्यांचा पवित्र कुरआनचा ब्लॉग आहे. त्यावर त्यांचे 'फहम अल कुरआन' वाचायला मिळते. शिवाय 'फिरदौस डायरी' हा गीत, गझल, कविता, कथा आणि इतर साहित्यिक लेखनाचा ब्लॉग आहे. 'मेरी डायरी' हा समाज, पर्यावरण, आरोग्य, साहित्य, कला-संस्कृती, राजकारण आणि समकालीन विषयांवरील लेखनाचा ब्लॉग आहे. 'द प्रिन्सेस ऑफ वर्ड्स' हा इंग्रजी कविता आणि लेखनाचा ब्लॉग आहे. 'जहांनुमा' हा उर्दू लेखनाचा ब्लॉग आहे. 'हीर' हा पंजाबी लेखनाचा ब्लॉग आहे. 'राहे-हक' हा आध्यात्मिक लेखनाचा ब्लॉग आहे.
देशसेवा
डॉ. फिरदौस खान देशसेवेच्या कामांशीही जोडलेल्या आहेत. त्यांनी नागरी संरक्षण विभाग, हिसारमध्ये 'पोस्ट वार्डन' म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. याशिवाय त्या 'अनुराग साहित्य केंद्रा'च्या संस्थापक आणि अध्यक्षा देखील आहेत.

देशातील सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकारांनी त्यांच्याबद्दल अनेकदा लिहिले आहे. अलीकडेच प्रकाशित झालेल्या श्री यादवेंद्र यादव यांच्या 'भारतीय मुस्लिमांच्या गौरवगाथा' या पुस्तकात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या आणि समाजाला एक नवी दिशा देणाऱ्या लेखिका असा त्यांचा उल्लेख त्या पुस्तकात करण्यात आला आहे.
आपल्या इच्छांबद्दल त्या म्हणतात, "म आयुष्यात जे मागितले ते मिळालेच असे नाही, पण त्यापेक्षा खूप जास्त मिळाले. जमीन मागितली तर आभाळ मिळाले. इतके मिळाले की आता काही अजून मागण्याची 'इच्छा'च उरली नाही." त्या स्वतःबद्दल म्हणतात, "द्वेष, मत्सर आणि वैर माझ्या मनात नाही, कारण देवाने मला माणुसकीच्या साच्यात घडवले आहे..."
(लेखक कवी, लेखक आणि पत्रकार आहेत)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter