भारताकडून जमैकाला इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्डची खास भेट; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून उद्घाटन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या जमैकाच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि जमैका यांच्यातील संबंध क्रिकेटच्या माध्यमातून अधिक घट्ट झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रविवारी त्यांनी जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू होलनेस यांच्यासोबत सबायना पार्क येथे भारताने भेट दिलेल्या इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्डचे उद्घाटन केले.

सबायना पार्क हे किंग्स्टन येथील जमैका क्रिकेट संघाचे होम ग्राउंड असून या कॅरिबियन बेट राष्ट्रातील ते एकमेव कसोटी क्रिकेट मैदान आहे.

'भारत-जमैकाची कहाणी धावांनी लिहिलेली'

या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर पोस्ट करताना जयशंकर म्हणाले, "भारत-जमैकाची कहाणी धावांनी, आदराने आणि मैत्रीने लिहिली गेली आहे. भारताने भेट दिलेल्या इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्डचे उद्घाटन करताना पंतप्रधान अँड्र्यू होलनेस यांच्यासोबत उपस्थित राहण्याचा आनंद मिळाला." या स्कोअरबोर्डवर भविष्यात अनेक संस्मरणीय खेळी पाहायला मिळतील आणि त्यातून दोन्ही देशांच्या अखंड मैत्रीचे प्रतीक दिसेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला जमैकाचे दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेल उपस्थित नव्हते, त्यांची उणीव भासल्याचे जयशंकर यांनी आवर्जून नमूद केले.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भाग असलेल्या जमैका आणि भारत यांच्यात क्रिकेट हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा राहिला आहे. ख्रिस गेल, कर्टनी वॉल्श आणि मायकल होल्डिंग यांसारख्या जमैकन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेस्ट इंडीज क्रिकेटचा दबदबा निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे. कॅरिबियन देशांसोबत भारताचे धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने जयशंकर नऊ दिवसांच्या जमैका, सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो दौऱ्यावर आहेत.