आतिका फारुकी : माध्यमविश्वात प्रगल्भतेचा ठसा उमटवणारी ग्रेसफुल निवेदिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
आतिका फारुकी : माध्यमविश्वात प्रगल्भतेचा ठसा उमटवणारी ग्रेसफुल निवेदिका
आतिका फारुकी : माध्यमविश्वात प्रगल्भतेचा ठसा उमटवणारी ग्रेसफुल निवेदिका

 

विदुषी गौर, नवी दिल्ली :

दोन दशकांहून मोठ्या कारकिर्दीत आतिका फारुकी यांनी स्वतःची एक भक्कम ओळख निर्माण केली आहे. त्या एक उत्तम माध्यम व्यावसायिक, मुलाखतकार, निवेदिका आणि एक कल्पक लेखिका आहेत. विविधता आणि सखोलता या दोन्ही गोष्टींचे उत्तम दर्शन घडवणारा त्यांचा हा प्रवास आहे. 

अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळते. पण आतिका यांची प्रगती सातत्यपूर्ण कामातून टप्प्याटप्प्याने झाली. सॅटेलाइट चॅनेल्सचा वेगवान विस्तार होत असताना त्या भारतीय टेलिव्हिजन विश्वात आल्या. या काळात नव्या गुणवत्तेची मागणी वेगाने वाढत होती.

आतापर्यंत त्यांनी अनेक नामांकित नेटवर्क्ससोबत काम केले. बातम्या आणि मनोरंजन या दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले. या भरगोस अनुभवामुळे त्यांना प्रेक्षकांची नेमकी नस ओळखता आली. प्रेक्षक आशयाशी कसे जोडले जातात, याची समज आली.

https://www.awazthevoice.in/upload/news/1777718821Atika_Farooqui_6.jpg

लष्करी शिस्त आणि संवादाची आवड

आतिका यांच्या जडणघडणीचा पाया शिस्त, संस्कृती आणि भाषेवर आधारलेला आहे. लष्करात काम करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तिथेच त्यांचे पालनपोषण झाले. त्यामुळे विविध प्रदेश, लोक आणि परंपरांशी त्यांचा जवळून संबंध आला. या वातावरणाने त्यांना आत्मविश्वास दिला आणि संयम शिकवला. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या प्रेक्षकांशी सहज जोडले जाण्याची कला त्यांना अवगत झाली.

यातूनच त्यांच्या मनात संवादाची आवड निर्माण झाली. हीच आवड पुढे त्यांच्या कारकिर्दीचा पाया बनली.

 मुलाखतींचा अत्यंत वेगळा आणि प्रगल्भ अंदाज

अगदी सहज आणि कायम लक्षात राहतील अशा मुलाखती घेणे, हे त्यांच्या यशाचे गमक आहे. आजकाल सेलिब्रिटींच्या मुलाखती फारशा उत्स्फूर्त असत नाहीत. अशा काळात आतिका यांनी स्वतःची एक शैली विचारपूर्वक विकसित केली आहे. त्या नेहमीच पूर्ण तयारीनिशी, उत्सुकता आणि आपलेपणा घेऊन पडद्यावर येतात. त्यामुळे त्यांच्याकडे आलेले पाहुणे बचावात्मक भूमिका न घेता मोकळेपणाने बोलतात.

त्यांच्या याच पद्धतीमुळे त्यांना प्रेक्षकांसह चित्रपट आणि माध्यम क्षेत्रातील दिग्गजांची मोठी पसंती मिळते.

त्यांच्या मुलाखती गॉसिप किंवा खळबळजनक मथळ्यांवर अवलंबून नसतात. त्यांचा भर वैयक्तिक प्रवास, कलाकारांचा संघर्ष, कल्पकता आणि प्रसिद्धीमागील मानवी बाजू उलगडण्यावर असतो. याच वेगळेपणामुळे त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. बुद्धिमत्ता आणि साधेपणाच्या जोरावर उत्तम संवाद साधणारी निवेदिका म्हणून त्या आज ओळखल्या जातात.

https://www.awazthevoice.in/upload/news/1777718944Atika_Farooqui_3.jpg

कवयित्री आणि लेखिका म्हणून वेगळी ओळख

टेलिव्हिजनच्या पलीकडे जाऊन आतिका फारुकी यांनी कवयित्री आणि लेखिका म्हणूनही आपली कल्पक ओळख जपली आहे. हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या तीनही भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. यामुळे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला एक वेगळीच खोली मिळाली आहे.

त्यांनी अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांचे भाषेवरचे प्रेम प्रेक्षकांना खूप भावते. आजच्या माध्यम विश्वात अनेकदा आशयापेक्षा सादरीकरणाला जास्त महत्त्व दिले जाते. अशा वेळी आतिका यांची साहित्यिक जाण त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते.

त्यांचे व्यावसायिक यश अँकरिंगपुरते मर्यादित नाही. गेल्या अनेक वर्षांत त्यांना उद्योगमंचांवर, नेतृत्वावर आधारित कार्यक्रमांमध्ये आणि सार्वजनिक व्यासपीठांवर बोलण्यासाठी आमंत्रित केले जाते. माध्यम, ब्रँडिंग आणि महिलांचे नेतृत्व यांसारख्या विषयांवर त्यांचे विचार मोलाचे ठरतात. एक उत्तम संवादक म्हणूनही त्यांना हा सन्मान मिळतो.

डिजिटल युगातील यशस्वी वाटचाल

आतिका यांच्या कामाचा आणखी एक उल्लेखनीय पैलू म्हणजे काळानुसार बदलण्याची त्यांची क्षमता. त्यांनी पारंपारिक टेलिव्हिजनच्या युगात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण त्यानंतर त्यांनी स्वतःला डिजिटल युगातही यशस्वीपणे सामावून घेतले. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आज सतत नवीन गोष्टी शिकणे आवश्यक असते, ते त्या सातत्याने करत आल्या आहेत. 

माध्यमांचे स्वरूप बदलताना अनेक प्रस्थापित चेहऱ्यांना संघर्ष करावा लागतो. पण आतिका यांनी टेलिव्हिजनवरील आपला व्यावसायिकपणा आणि दर्जा कायम राखत नव्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचाही खुल्या मनाने स्वीकार केला. बदल आणि स्वतःची ओळख यातील हा समतोलच त्यांना आजही लोकांच्या पसंतीस उतरवतो. स्वतःची विश्वासार्हता न गमावता काळासोबत कसे राहायचे, हे त्यांना चांगले समजले आहे. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपले मूळ सोडण्याची गरज नसते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

https://www.awazthevoice.in/upload/news/1777718880Atika_Farooqui_2.jpg

तरुण पत्रकारांसाठी मोठा आदर्श

माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी आतिका यांचा प्रवास महत्त्वाचा आहे. हे क्षेत्र आव्हानात्मक आणि स्पर्धेचे आहे. अनेकदा इथे पुरुषांच्या तुलनेत महिलांची जास्त कठोर परीक्षा पाहिली जाते. अशा वातावरणात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी चिकाटी, बुद्धिमत्ता आणि भावनिक शिस्त आवश्यक असते.

अनेक वर्षे यशस्वी कारकीर्द टिकवून ठेवत त्यांनी एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर काय साध्य करता येते, याचा त्या एक आदर्श आहेत.

तरुण पत्रकारांसाठी त्यांचा हा प्रवास एक मोठा धडा आहे. पूर्ण तयारी, उत्तम संवाद कौशल्य आणि कामातील सातत्यातूनच चिरकाल टिकणारे यश मिळते. प्रसिद्धी कदाचित एका रात्रीत मिळेल, पण विश्वासार्हता मिळवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. लोकांचा आदर हळूहळू कमवावा लागतो आणि उत्तम कामातून तो टिकवून ठेवावा लागतो. आतिका फारुकी यांची कारकीर्द याच गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

त्यांचे सादरीकरण त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. काही व्यक्तिमत्त्वे आवाजाच्या जोरावर लक्ष वेधून घेतात. तर काही जण आपल्या संयमातून लोकांची मने जिंकतात. आतिका या दुसऱ्या गटात मोडतात. त्यांचा शांत आत्मविश्वास, स्पष्ट बोलणे आणि नैसर्गिक सादरीकरण यामुळेच त्या या प्रचंड स्पर्धेच्या युगातही नेहमी लक्षात राहतात.


हा लेखही वाचा : हिनाकौसर खान : मुस्लिम समाजाचे अंतरंग उलगडून दाखवणारी पत्रकार आणि संवेदनशील लेखिका


आतिका फारुकी यांची गोष्ट खंबीरपणे टिकून राहण्याची आहे. गुणवत्तेचे रुपांतर यशस्वी कारकिर्दीत आणि व्यावसायिकतेचे रुपांतर स्वतःच्या ओळखीत करण्याची ही कहाणी आहे. टेलिव्हिजन स्टुडिओपासून ते सार्वजनिक आणि सांस्कृतिक मंचांपर्यंत त्यांनी स्वतःचा विकास सुरू ठेवला आहे. हे सर्व करताना त्यांनी आपला साधेपणा आणि कामाचा दर्जा कधीही सोडला नाही. बुद्धिमत्ता, साधेपणा आणि अनेक वर्षांच्या अर्थपूर्ण कामातून त्यांनी हे यश मिळवले आहे. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter