हिनाकौसर खान : मुस्लिम समाजाचे अंतरंग उलगडून दाखवणारी पत्रकार आणि संवेदनशील लेखिका

Story by  Sameer D. Shaikh | Published by  admin2 • 3 h ago
मुस्लिम समुदायाचा नवा नॅरेटिव्ह मांडणाऱ्या लेखिका हिनाकौसर खान
मुस्लिम समुदायाचा नवा नॅरेटिव्ह मांडणाऱ्या लेखिका हिनाकौसर खान

 

समीर दि. शेख

आजच्या गदारोळाच्या काळात जिथे पत्रकारिता ही बऱ्याचदा तात्कालिकतेच्या आणि हेडलाईन्सच्या विळख्यात अडकलेली दिसते, तिथे मानवी संवेदनांच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या, समाजमनाचं अंतस्तर उलगण्याचं, विशेषतः मुस्लिम समाजाचे पडद्याआड राहिलेले प्रश्न मुख्य प्रवाहात आणण्याचं महत्त्वाचं काम करणाऱ्या मोजक्या पत्रकारांमध्ये हिनाकौसर खान यांचा उल्लेख करावा लागेल.

हिना यांनी आपल्या लेखणीतून एक अशी शैली आणि दृष्टिकोन जपला आहे जो वाचकाला गुंतवून तर ठेवतोच पण स्वतःच्या पूर्वग्रहांची चिकित्सा करायलाही भाग पाडतो.एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी स्वतःच्या लेखणीवर विश्वास ठेवून पत्रकारितेत आणि साहित्य क्षेत्रात कशी मुसंडी मारते, याचा हा रंजक प्रवास आहे.

विज्ञानाचे शिक्षण ते पत्रकारितेचा प्रवास

हिनाकौसर खान यांचे वडील मूळचे इंदापूर तालुक्यातील बोरी काजळ या गावचे. परंतु शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त ते पुण्यात आले आणि कायमचे तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे हिना यांचे संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण पुण्यातच मराठी माध्यमातून पूर्ण झाले. पुढे त्यांनी बी.एस्सी. ची पदवी घेतली. विज्ञानाची विद्यार्थिनी असली तरी त्यांच्या आत एक लेखिका दडलेली होती.

आपल्या या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल त्या सांगतात, "मला शाळेपासूनच लिहिण्याची आवड होती. त्यामुळे मला वाटायचं की आपण जे प्रोफेशन निवडू, ते लिहिण्याशी संबंधित असावं. असं का वाटायचं हे मला त्यावेळी नीट माहिती नव्हतं. पण आता मागे वळून बघते, तेव्हा लक्षात येतं की कदाचित दुसरा कुठला नोकरी-व्यवसाय केला असता तर आपलं लेखन सुटलं असतं, अशी भीती माझ्या मनात असावी."

याच विचारातून त्यांनी बी.एस्सी. करत असतानाच जर्नालिझमच्या अभ्यासक्रमाचा शोध घेतला. त्यांना पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटच्या जर्नालिझम कोर्सबद्दल समजले आणि त्यांनी तिथे प्रवेश निश्चित केला.

शिक्षकीपेशाची कौटुंबिक परंपरा मोडताना...

हिना यांच्या कुटुंबात आई-वडील आणि तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील शिक्षक आहेत आणि आई गृहिणी असली तरी ती पदवीधर आणि सुशिक्षित आहे. घरातले वातावरण सुरुवातीपासूनच मोकळे होते. आपल्या जडणघडणीबद्दल बोलताना त्या म्हणतात, "माझ्या कुटुंबात इतर नातेवाईकांमध्ये धार्मिकतेचा जास्त प्रभाव होता, पण आमच्या घरात असं कुठलं बर्डन नव्हतं. रूढीपरंपरा फक्त सणापुरत्या असायच्या. त्यामुळे आम्ही मोकळ्या वातावरणात, जिथे स्वतःचा विचार आणि स्वतःचे निर्णय घेऊ शकू, अशा परिस्थितीत वाढलो. अर्थात, हे सगळं खूप सहज झालं असं नाही, पण अपब्रिंगिंगमध्ये तसा स्कोप होता. खूप संघर्ष करावा लागला असंही नाही. टफ कंडिशन्समध्ये सुद्धा संवाद होणं आणि आपलं म्हणणं पोहोचवणं, एवढी स्पेस आणि खुलेपणा होता."

मात्र पत्रकारितेसारखे वेगळे आणि आव्हानात्मक क्षेत्र निवडताना वडिलांचा हलकासा विरोध होता. घरात आत्या, काका, आजोबा असे सगळे शिक्षक असल्याने घरात शिक्षकी पेशाची मोठी परंपरा होती. त्यामुळे मुलीनेही याच सुरक्षित पेशाची निवड करावी असे वडिलांना वाटत होते. पत्रकारितेत कामाच्या वेळा अवेळी असतात, ही त्यांची मुख्य चिंता होती. मात्र सुशिक्षित आईचा मुलीच्या निर्णयाला खंबीर पाठिंबा होता, त्यामुळे पुढे वडिलांचा विरोधही मावळला.

बातमीपलीकडे जाण्याची ओढ

रानडे इन्स्टिट्यूटमधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या ३-४ महिन्यांतच हिना यांनी 'लोकमत' या दैनिकातून आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. हळूहळू त्यांना बातमीच्या चौकटीतील मर्यादा जाणवू लागल्या. या बदलाविषयी त्या सांगतात, "बातमीची स्पेस मुळात कमी असते आणि ती तात्कालिक घटनांवर आधारित असते. फिचरमध्ये तुम्हाला बातमीच्या पलीकडे जाता येतं. फिचरमध्ये तुम्ही घटनेचं ॲनालिसिस करू शकता, विश्लेषण मांडू शकता आणि स्वतःचा दृष्टिकोन देऊ शकता. अनेकांचे दृष्टिकोन गोळा करून, अभ्यास करून मांडायला तिथे जास्त जागा मिळते. त्यामुळे मला फिचर रायटिंगमध्ये रस वाटायला लागला."  

मुस्लिम समाजाचे अंतरंग उलगडताना नव्या नॅरेटिव्हचा शोध

मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये काम करताना हिना यांना जाणवले की, मुस्लिम समुदायाचे प्रश्न आणि त्यांचे विषय खूप कमी हाताळले जातात. विशेषतः मुस्लिम समुदायाविषयी मराठी पत्रकारितेत असलेल्या पोकळीची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली. याबद्दल त्या सांगतात, “मुस्लिम विषयांवर खूप कमी लिहिलं जातं. सणापुरत्या बातम्या किंवा रूढ गैरसमजांवरच चर्चा होते. इतिहासाची चिकित्सा करून ते मांडण्याचे प्रयत्न कमी होतात. मुस्लिम समुदायातील उच्चशिक्षित तरुण, त्यांचे विचार, त्यांचा धर्म आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन मांडण्याची गरज मला जाणवली."

याच जाणिवेतून त्यांनीसाधना साप्ताहिकाच्या 'गोविंदराव तळवलकर फेलोशिप'च्या माध्यमातून या विषयावर सखोल लेखन केलं. मुस्लीम समाजातील त्रुटी आणि समाजातील बदलत्या जाणिवाही त्यांनी टिपल्या. त्या मुस्लिम समुदायाकडे केवळ 'पीडित' किंवा 'आक्रमक' या दोन टोकाच्या चष्म्यातून बघत नाहीत, तर त्यातील मानवी संघर्षाचे सूक्ष्म पदर उलगडतात, ही त्यांच्या लेखनाची ताकद आहे.

साहित्यक्षेत्रातील गरुडझेप: 'इत्रनामा' ते 'इज्तेहाद'

“तीन तलाक विरुद्ध पाच महिला” हा साधना साप्ताहिकासाठी केलेला दीर्घ रिपोर्ताज चांगलाच गाजला. पुढे त्याची पुस्तिकाही आली आणि त्याने हिना यांचे पत्रकार-लेखक वर्तुळात चांगले नाव झाले.

पत्रकारितेत रोजच्या धावपळीत अनेक अशा गोष्टी आणि अनुभव पाहायला मिळतात, जे थेट बातमीत मांडता येत नाहीत. हिना यांनी हे अनुभव साहित्याच्या माध्यमातून मांडायला सुरुवात केली. "पत्रकारितेतला अनुभव आणि फिल्डवर जे दिसत होतं, पण बातमीत मांडता येत नव्हतं, ते मी फिक्शनच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला," असे त्या स्पष्ट करतात.

सुरुवातीला ऑडिओ माध्यमात 'स्टोरीटेल'वर आलेली त्यांची 'इत्रनामा' ही कादंबरी खूप गाजली. नंतर ती पुस्तकरूपानेही प्रकाशित झाली.ही कादंबरी मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा टप्पामानली जाते. नाझिया, असदआणि सुमित या तीन पात्रांभोवती फिरणारी ही कथा हिंदू-मुस्लिम तरुण-तरुणीच्यासंघर्षाचे आणि मैत्रीचे पदर उलगडते. ही कादंबरी म्हणजे आजच्या राजकीय वातावरणातविखुरलेल्या मानवी नात्यांचा शोध घेणारी प्रेमकथा आहे. 

या कादंबरीला वाचकांचा आणि समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या साहित्यकृतीसाठी त्यांना राज्य शासनाचा मानाचा 'ह. ना. आपटे पुरस्कार' आणि  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा 'कविवर्य ना.धो. महानोर साहित्य पुरस्कार मिळाला.

इतकेच नव्हे, तर हिना यांनी लिहिलेल्या ‘ए बिस्मिल्लाह’या नाटकाचे मंचनही झाले असून प्रसिद्ध नाटककार रसिका आगाशे यांनी त्याचे दिग्दर्शन केले असून, त्यांनीच एकपात्री भूमिका बजावली आहे. या नाटकाच्या माध्यमातून मुस्लीम महिलेचे अंतरंग उलगडवून दाखवण्यात हिना यांना यश आले आहे.   

फिक्शनसोबतच हिना यांचे नॉन-फिक्शन लेखनही अतिशय समृद्ध आहे. प्रतिष्ठित साधना साप्ताहिकासाठी घेतलेल्या ‘धर्मरेषा ओलांडताना’ हे आंतरधर्मीय जोडप्यांच्या मुलाखतींचे महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झाले. लोकसत्ता या प्रतिष्ठित दैनिकात मुस्लिम समाजाचे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या त्यांच्या विशेष लेखमालेचे ‘इज्तेहाद’ या नावाने पुस्तक आले आहे.  

पत्रकारितेतील त्यांच्या या योगदानाचा मोठा सन्मानही झाला आहे. बिल्कीस बानो आणि तिच्या नवऱ्याच्या जगण्याच्या संघर्षावर आणि त्यांच्या सहजीवनावर हिना यांनी 'नब्ज' या रमजान विशेषांकासाठी एक अतिशय संवेदनशील लेख लिहिला होता. या विशेष लेखनासाठी त्यांना नुकताच प्रतिष्ठेचा 'लाडली मीडिया पुरस्कार' मिळाला

हिना यांचा फेसबुकसारख्या सोशल मीडिया माध्यमांवरील वावरही विशेष वाखाणला जातो. तिथे त्या केवळ आपली पुस्तकं, लेखन किंवा पुरस्कारांची माहिती देत बसत नाहीत. उलट त्या माध्यमाचा प्रभावी वापर करत समकालीन राजकीय आणि सामाजिक घटनांवर स्पष्टपणे भाष्य करतात. त्यांचे फेसबुक पोस्ट्स बऱ्याचदा समाजातील द्वेषाच्या वातावरणाविरुद्ध प्रेमाचा आणि सहिष्णुतेचा आवाज बुलंद करणाऱ्या असतात. 'भिंतीशी मारलेल्या गप्पा' हे त्यांचं फेसबुकवरील ललित सदरही गाजलं होतं.

वास्तवाचे भान जपणारी लेखणी

आजच्या अस्थिर आणि द्वेषपूर्ण राजकीय-सामाजिक वातावरणात एक लेखिका म्हणून हिना अत्यंत जबाबदारीने व्यक्त होतात. त्यांच्या आगामी योजनांबद्दल बोलताना त्या सांगतात, "सध्या फिक्शनमध्येच जास्त लिखाण येत आहे. पण त्यात आजच्या समकालीन घटनांचा प्रभाव आहे. एक कथासंग्रह, एक ललित संग्रह आणि एक कादंबरी येतेय. मॉब लिंचिंग आणि त्याचे परिणाम यांसारखे विषय त्यात आहेत. मुस्लिम समुदायाचे अंतरंग मी लेखनाच्या माध्यमातून मांडत राहीन."

माझा सहअस्तित्वावर आणि माणुसकीवर ठाम विश्वास"

हिना यांची वैयक्तिक जीवनदृष्टी अतिशय सकारात्मक आहे. त्यांच्या या सकारात्मकतेचं रहस्यत्यांच्या माणुसकीवरच्या विश्वासात दडलेलं आहे. त्या म्हणतात, "माझी फिलॉसॉफी म्हणाल तर माझा प्रेमावर, माणसांमधल्या दयाळूपणावर, एकमेकांशी असणाऱ्या संवादावर आणि सहअस्तित्वावर खूप विश्वास आहे. माणसांमध्ये उणिवा असतात, पण आपण एकमेकांना समजून घेत पुढे जातो.”

त्या पुढे म्हणतात, “एकाच साच्यातल्या माणसांमुळेजीवनात वैविध्यच राहणार नाही. व्यक्तिमत्त्वातल्या भिन्नतेमुळे आणि चांगल्या-वाईट गोष्टींमुळेच आपण एकमेकांशी अधिक चांगलं वागू शकतो आणि एकमेकांच्या सहवासात समृद्ध होऊ शकतो. याच गोष्टींमुळे माझी सकारात्मकता टिकून राहते."

मराठी साहित्यात मुस्लिम लेखकांचं योगदान मोठं आहे. पण हिना खान यांच्या लेखणीत एक वेगळी प्रगल्भता आणि संदर्भांची सखोलता जाणवते. त्या ज्या प्रकारे दखनी, उर्दू शब्दांचा आणि इस्लामिक संस्कृतीतील बारकाव्यांचा वापर मराठी साहित्यात करतात त्यातून एक नवा भाषिक अनुभव वाचकांना मिळतो.


हा लेखही जरूर वाचा : मुस्लीम स्त्रीच्या भावनाकल्लोळाची मराठी रंगमंचावरील पहिली अभिव्यक्ती


मराठी पत्रकारितेत आणि साहित्यात मुस्लिम समुदायाचा एक इनसायडर म्हणून त्यांनी उभा केलेला नॅरेटिव्ह  अत्यंत मोलाचा आहे. हिना यांच्या शब्दांत सांगायचं तर, "जिथे जिथे आपले विचार मांडण्याची गरज आणि जागा असते, तिथे तिथे मी बोलण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करत राहीन." असं त्या म्हणतात. समाजातील 'धर्मरेषा' पुसून माणुसकीची नवी भाषा लिहिणाऱ्या हिना यांची लेखणी येणाऱ्या काळात मराठी साहित्याला अधिक समृद्ध करेल यात शंका नाही.

(लेखक 'आवाज द व्हॉइस - मराठी'चे संपादक आहेत.)


 

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter