Assembly Election Results Live: पाच राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू; भाजप, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांची प्रतिष्ठा पणाला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेससाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगालमध्ये २०२६ च्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यासोबतच तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही आज मतमोजणी होत आहे.

बंगालमध्ये अटीतटीची लढत

पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोलचे अंदाज वेगवेगळे आले आहेत. काहींनी भाजपच्या एकतर्फी विजयाचा अंदाज वर्तवला आहे. तर काहींच्या मते दोन्ही प्रमुख पक्षांना जवळपास समान जागा मिळतील आणि लढत अत्यंत चुरशीची होईल. पण या सर्व एक्झिट पोलमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे राज्यात भाजपची वाढलेली ताकद. याच राज्यात १५ वर्षांपूर्वीपर्यंत कम्युनिस्टांनी ३४ वर्षे सरकार चालवण्याचा विक्रम नोंदवला होता.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जी अर्थात 'दीदीं'विरुद्ध जोरदार आघाडी उघडली. गैरकारभार आणि बांगलादेशातील घुसखोरीला पाठिंबा देऊन राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप भाजपने केला. दुसरीकडे, ममता यांनीही आपल्या १५ वर्षांच्या सत्तेचे जोरदार समर्थन केले. भाजपने लोकांमध्ये फूट पाडल्याचा पलटवार त्यांनी केला. ही निवडणूक आतापर्यंतची सर्वात अटीतटीची लढत मानली जात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत इथले वातावरण अत्यंत तापलेले होते.

मतमोजणीपूर्वी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी अध्यात्माचा आधार घेतला. "मी लक्ष्मीनारायण मंदिरात प्रार्थना केली. देव आमच्या पाठीशी आहे. सनातन धर्माच्या हिताचे रक्षण करणारे सरकार येत आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याचा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. तर राज्यात बदलाची लाट येणार असल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला आहे.

दुसरीकडे, ममता बॅनर्जी सहज सत्तेत परततील या दाव्यावर तृणमूल काँग्रेस ठाम आहे. "ममता बॅनर्जी २०० हून अधिक जागा जिंकून पुन्हा येत आहेत," असा दावा पक्षाचे नेते कुणाल घोष यांनी केला. याचवेळी त्यांनी मतमोजणी प्रतिनिधींच्या व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. त्यांच्यासाठी अन्न आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधाही नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने फाल्ता मतदारसंघातील सर्व २८५ मतदान केंद्रांवर फेरमतदानाचे आदेश दिले. ‘गंभीर निवडणूक गुन्हे आणि लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली’ झाल्याचा ठपका आयोगाने ठेवला. या निर्णयावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

तमिळनाडूत द्रमुक आघाडीला आशा

तमिळनाडूतील राजकीय चित्र तुलनेने स्पष्ट वाटत असले तरी तिथेही मोठी चुरस आहे. सत्ताधारी द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्ता टिकवेल, अशी दाट शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर झालेले मतदान आणि अनुकूल एक्झिट पोल हे त्यांचं पाठबळ वाढवणारे आहेत. द्रमुक आघाडी तमिळनाडूत पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास तमिळनाडू आणि पुडुचेरी काँग्रेसचे प्रभारी गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला. "आमची द्रमुक आघाडी सरकार स्थापन करेल आणि तमिळनाडूत इतिहास घडवेल, याची आम्हाला खात्री आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा आम्हाला ठाम विश्वास आहे," असे ते म्हणाले.

राज्यात मतमोजणीची अत्यंत चोख तयारी करण्यात आली आहे. राणीपेट जिल्ह्यात अरिग्नार अण्णा सरकारी महिला कला महाविद्यालयात मतमोजणीच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तिथे ईव्हीएमची मतदारसंघानुसार वर्गवारी करण्यात आली. निवडणूक आयोगाने त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. पहिल्यांदाच क्यूआर कोडवर आधारित ओळख पडताळणी सुरू करण्यात आली आहे. केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच संवेदनशील भागात प्रवेश मिळेल, याची काळजी घेतली जात आहे.

आसाममध्ये सत्ता राखण्याचे भाजपचे प्रयत्न

दुसरीकडे, आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. तिथे पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी पक्ष आपल्या कामगिरीवर अवलंबून आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आत्मविश्वासाने अंदाज वर्तवला. "आसाम आणि पुडुचेरीमध्ये भाजप नक्की जिंकेल," असे ते म्हणाले. मात्र, विरोधी पक्षांचा आवाजही तितकाच ठाम आहे. आमदार अमीनुल इस्लाम यांनी प्रतिक्रिया दिली. "काँग्रेस मोठा विजय मिळवेल, अशी आम्हाला आशा आहे. लोकांनी भ्रष्टाचाराला नाकारले असून एका स्वच्छ चेहऱ्यावर विश्वास ठेवला आहे," असे ते म्हणाले.

राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. मतदान केंद्रांवर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त होती. हा कल अंतिम निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. भाजपच्या हिमंता बिस्वा सरमा यांच्या सरकारने स्थिरतेसाठी आणि सांस्कृतिक अस्मितेसाठी हा कौल असल्याचे म्हणले आहे. तर काँग्रेसने प्रशासकीय प्रश्न आणि कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

केरळ आणि पुडुचेरीत कोण बाजी मारणार?

केरळमध्ये पूर्णपणे वेगळ्या प्रकारची लढत पाहायला मिळत आहे. तिथे सत्ताधारी 'लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट' (LDF) सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. ऐतिहासिकदृष्ट्या आलटून-पालटून सरकारे आणण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या केरळच्या मतदारांनी यावेळी बदलाचे संकेत दिले आहेत. तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांची मतमोजणी आज मार इव्हानियोस कॉलेज कॅम्पसमधील मतमोजणी केंद्रावर होणार असून सकाळपासूनच तिथे लगबग सुरू आहे.

एक्झिट पोलचे अंदाज विभागलेले असले तरी, काँग्रेस आणि 'युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट'ला (UDF) पुनरागमनाची आशा आहे. इम्रान प्रतापगढी यांनी भाजप राज्यात शिरकाव करू शकणार नाही, असे ठामपणे सांगितले. "या पाचही राज्यांपैकी एकाही राज्यात भाजपचे सरकार स्थापन होणार नाही," असा दावा त्यांनी केला. केरळमधील ज्यादाचे मतदान आणि महिला मतदारांचा वाढता सहभाग राजकीयदृष्ट्या जागरूक मतदारांचे लक्षण मानले जाते. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मतदान शांततेत पार पडल्याचे कौतुक केले. तर विरोधी पक्षनेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यातून राष्ट्रीय पातळीवरील चर्चेचीच पुनरावृत्ती होताना दिसते.

पुडुचेरी हे छोटे राज्य असले तरी इथली लढतही महत्त्वाची आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' आपले स्थान भक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. तर काँग्रेस-द्रमुक आघाडी गमावलेली सत्ता परत मिळवण्याच्या तयारीत आहे. देशातील सर्वाधिक मतदान टक्केवारीपैकी एक असलेल्या या प्रदेशातील मतदारांनी आपला स्पष्ट कौल दिला आहे.